वाढती स्पर्धा आणि कामाचा ताण अशा धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. त्यामुळेच कधी नव्हे ती इतकी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक झालं आहे. ही काळजी घेताना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला व मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच लोकसत्ता डॉटकॉम तुमच्यासाठी ‘हेल्थ स्पेशल’ लेखांची मालिका घेऊन येत आहे. या लेख मालिकेत काय असणार याचा हा आढावा…
लोकसत्ता डॉटकॉमच्या हेल्थ कॅटेगरीमध्ये ‘हेल्थ स्पेशल’ लेखांची सुरुवात आजपासून झाली असून आता दररोज विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर्स यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवस आता असेल हेल्थ स्पेशल. दर रविवारी विख्यात जठरांत्रतज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे खाण्या-पिण्याच्या सवयींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉ. अश्विन सावंत ऋतचर्येनसार दररोजचा दिवस कसा व्यतित करावा ते सांगणार आहेत. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. जाह्नवी केदारे मनोव्यापार समजावून सांगतानाच मनोविकारांबद्दल दर रविवार आणि गुरुवारी मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा : आपले मन कुठे आहे? ते कसे चालते?
याशिवाय दर मंगळवारी विख्यात त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. किरण नाबर त्वचेचे सौंदर्य आणि त्याच्याशी संबंधित विकार या बद्दल तर प्रसिद्ध दंतशल्यचिकित्सक डॉ. विजय कदम दातांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करतील. या शिवाय डॉ. नितीन पाटणकर हे वाढत्या जीवनशैलीव्याधी अर्थात रक्तदाब आणि मधुमेहावर तर डॉ. राजेश पवार डोळ्यांचे आरोग्य, त्यांची काळजी याविषयी लिहिणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत- पटवर्धन या आहारविहार यावर लिहिणार असून विविध रोगांच्या घरगुती उपायांवर प्रसिद्ध वैद्य विनायक वैद्य खडिवाले लिहिणार आहेत. दर दिवशी किमान तीन वैद्यक तज्ज्ञ ‘हेल्थ स्पेशल’मध्ये वाचकांच्या भेटीस येणार आहेत.