Ghee For Weight Loss :गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे स्त्रीचे वजन लक्षणीय वाढते. त्याच वेळी प्रसूतीनंतर स्त्री बाळाच्या काळजीत इतकी अडकली जाते की, ती स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकत नाही. यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. कधी कधी प्रसूतीनंतर घेतलेल्या हेल्दी आहारामुळेही वजन वाढतं. सी सेक्शन डिलिव्हरी म्हणजेच सिझेरियननंतरही महिलांचं वजन जास्त वाढायला लागतं. या वजनावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर, कायमचा लठ्ठपणा येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉडी फॅट एकदा वाढल्यानंतर कमी करणं अतिशय कठीण असतं. अशावेळी महिला वेगवेगळे उपाय करत असतात. मात्र, आम्ही तुम्हाला जर सांगितलं की वजन कमी करण्यासाठीचा उपाय तुमच्या किचनमध्येच आहे तर… हो, आपल्या रोजच्या वापरातलं तूप. अर्थातच हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जास्त वजन कमी करण्यास तूप खूप प्रभावी असते. तूपात पर्याप्त प्रमाणात पोषक तत्वदेखील असतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात; तर वजन कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे हा एक मोठा गैरसमज आहे की, तुपामुळे वजन वाढते. तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरातील मुख्य पदार्थ म्हणजेच तुपाचा आहारात समावेश केल्यानंतर गर्भधारणेनंतर वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. पोषणतज्ज्ञ, कल्याण सल्लागार आणि संस्थापक भक्ती कपूर आणि बाल पोषणतज्ज्ञ मोना नरुला यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना यावर सविस्तर माहिती दिली आहे.

बाल पोषणतज्ञ मोना नरुला यांच्या मते, तूप मेटाबॉलिज्म वाढवते, मेटाबॉलिज्मने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार करण्यास मदत मिळते. लालसा कमी होते आणि चांगले पचन देखील होते.

रोजच्या आहारामध्ये आपण तूप वापरतो, पण स्वयंपाकासाठी वापरण्यापलीकडे तुपाचे बरेच गुणधर्म आहेत. त्यापैकी एक म्हणजे तूप गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यास मदत करते.
चरबी : आपल्या शरीरातील सर्व प्रकारची चरबी ही वजन कमी करण्यास अडथळा आणते हा गैरसमज आहे. ओमेगा ३ फॅट (डीएचए) आणि ओमेगा ६ (सीएलए) या तत्वांनी तूप समृद्ध आहे. म्हणून वजन कमी करण्यासाठी तूप खूप चांगले मानले जाते. ओमेगा ६ फॅट चरबीचे प्रमाण कमी करून शरीर बारीक करते. तुपात आवश्यक अमीनो ॲसिड असते, जे चरबीच्या पेशींचा आकार कमी करते. जर आपल्या शरीरात चरबी जलद गतीने जमा होत असेल तर तूप खाणे फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्त, तुपात असलेले ओमेगा ३ फॅटी ॲसिड शरीराची चरबी कमी करण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन शोषण वर्धक: गर्भधारणेनंतर पोषक तत्व आवश्यक असतात. तूप D, A, E आणि K सारख्या चरबी-विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचे शोषण वाढवते. ही जीवनसत्त्वे हाडांचे आरोग्य राखतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हार्मोनल संतुलन नियंत्रित करतात. तुपाने जमलेली चरबी जळून जाते आणि मेटाबॉलिझम वाढतं. त्यामुळे योग्य प्रमाणात तूपाचे सेवन केल्यास वजन वाढण्याऐवजी नक्कीच कमी होतं

आतड्याचे आरोग्य संरक्षक: ब्युटीरिक ॲसिडने समृद्ध असलेले तूप हे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच बद्धकोष्ठतासारख्या समस्यांनाही दूर ठेवते.

हेही वाचा – हळदीचे सेवन ‘या’ पद्धतीने करणे करू शकते शरीराचे नुकसान; यकृत जपायचं असेल तर आधी वाचा 

हे लक्षात ठेवा

व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबतच प्रमाणात तुपाचं सेवन करणे गरजेचे आहे. तूप स्वादिष्ट असण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य आणि त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे अनेक लाभ मिळवून देण्यासोबतच तूप वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looking to lose postpartum weight experts swear by this one kitchen ingredient ghee ghee for weight loss pregnancy weight loss srk