सगळ्याच गृहिणी भाज्या बनवताना त्यात वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, मसाले टाकत असतात. भाजीची चव वाढवण्यासाठी त्या नेहमी सॉस, मसाले वापरतात. हे मसाले जेवणाची चव वाढवत असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक तर नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही कधी दुकानातून सॉस घेताना सॉसच्या बाटलीची मागची बाजू पाहिली आहे? घटकांचे लेबल तपासले आहे का? नाही ना… ? हे लेबल योग्यरित्या वाचणे खूप महत्वाचे आहे. लेबलमध्ये सामान्यतः प्रथिने, चरबी, फायबर सामग्री, कार्बोहायड्रेट्स यांचा उल्लेख असतो. यापैकी बहुतेक सॉसमध्ये किंवा मसाल्यांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते, त्यामुळे सॉस खूप कॅलरीज वाढवते. याबाबत आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी “द इंडियन एक्स्प्रेस”शी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

मधुमेह हा असा आजार आहे जो झाल्याचे रुग्णाला समजतही नाही. हा आजार होण्यामागे बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि वाढलेला ताण इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात. आपण कितीही पथ्य पाळली तरी आपल्या नकळत काही पदार्थ आपण खातो आणि त्याचे परिणाम शरीरावर होतात. मधुमेह हा एका रात्रीत होणारा आजार नाही. आपल्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार जास्त बळावतो. मधुमेहाचा आजार इतक्या झपाट्याने पसरत आहे की, आजकाल लहान मुलेही या आजाराला बळी पडत आहेत.

शुगर-फ्री उत्पादनांची तपासणी

शुगर-फ्री म्हणून मार्केटिंग केलेली उत्पादनं तुम्ही कितीतरी वेळा विकत घेतली असतील. पण, ती खरंच शुगर-फ्री आहेत का हे तपासलंय का. नाही तर याउलट शुगर-फ्री म्हणून त्याचा जास्तच वापर केलाय. सॉस किंवा चटपटीत मसाले जे तुम्ही पौष्टिक म्हणून खाता, त्यामध्ये साखर असते हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ज्या गोष्टीकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ते म्हणजे बहुतेकवेळा पौष्टिक म्हणून खातो खरं, पण त्यात सुमारे तीन ग्रॅम साखर असते, काहींमध्ये आठ ग्रॅम साखर असते. त्यामुळे तुमच्या आहारात सॉस तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चटपटीत मसाल्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

चवीसोबतच फॅट्सही

प्रत्येकवेळी तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये हे सॉस टाकता तेव्हा तुमच्या शरीरात चवीसोबतच फॅट्सही जातात, हे लक्षात ठेवा. तुमच्या शरीराचे जास्त नुकसान होते. त्यामुळे फॅटी लिव्हर, खराब त्वचा आणि केस, हृदयविकार, नैराश्य, चिंता इत्यादींशी संबंधित समस्या होऊ शकतात. तसेच यामुळे वजन वाढू शकते आणि मधुमेह वाढू शकतो. साखरेमुळे ही उत्पादने घातक ठरू शकतात, त्यामुळे हे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गरजेपेक्षा जास्त तहान, जास्त भूक, कोरडे तोंड, जखम भरण्यास वेळ लागणे आणि वारंवार लघवीला होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत.

हेही वाचा >> मधुमेह, हृदयविकारासाठी मेथी फायदेशीर, पण त्याचे प्रमाणात सेवन करावे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

निरोगी आहार आणि जीवनशैली

निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची सामान्य पातळी ९० ते १०० mg/dL दरम्यान असते. जर एखाद्याने निरोगी आहार आणि जीवनशैलीचे पालन केले तर साखरेची सामान्य पातळी राखणे सहज शक्य आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे मोठे आव्हान असते. साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेहासोबतच उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी विविध समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे बहुतेक लोक रक्तातील साखरेच्या पातळीबाबत जागरूक असतात.