मुंबई – ‘पोलिओ’प्रमाणेच देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केला असून याची दखल घेत महाराष्ट्रात आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून हत्तीरोग प्रभावित १८ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहीमेमुळे हत्तीरोग व अंडवृद्धीच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील तीन वर्षात अंडवृद्धी रुग्णांची संख्या ११ हजार ९२९ वरून सात हजार २५६ एवढी झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे हत्तीरोग मुक्तीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
भारतात हत्तीरोगाचे मोठे आव्हान असून २१ राज्यांमधील २५६ जिल्ह्य़ांमध्ये या रोगाची व्याप्ती आहे. डासांच्या माध्यमातून शरीरात परोपजीवी जंतूंची निर्मिती होऊन हात व पाय सुजतात. महाराष्ट्रातही नागपूर, गडचिरोली, चंद्रपूरसह १८ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी नोव्हेंबर व फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यात व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. तसेच यात इव्हरमेकटिन, डायइथिल कार्बाझाईन व अल्बेंडोझोल (आयडीए) ही तीन परिणामकारक औषधे देण्यात येणार आहेत. राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी २००४ पासून वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या असल्या तरी यात दोन प्रकारची औषधे देण्यात येत होती. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार तीन औषधांचे डोस देण्यात येणार आहे. यापूर्वी गडचिरोलीत आयडीएचा प्रयोग करण्यात आला होता.
आगामी दोन महिन्यांत हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या १३ जिल्ह्य़ांत सहा सर्वेक्षण पथक, १६ नियंत्रण पथके, ३४ रात्रकालीन चिकित्सालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात राबविण्यात येत असून यामुळे मोठ्या प्रमाणात हत्तीरोग नियंत्रण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. २०१७ मध्ये हत्तीरोगाच्या रुग्णांची संख्या ४० हजार २०४ एवढी होती. ती कमी होत २०२३ मध्ये ३० हजार ३३७ रुग्ण आढळून आले आहेत. २०१७ मध्ये अंडवृद्धीचे २४ हजार ९५१ रुग्ण होते, त्यात घट होत २०२० मध्ये ११ हजार ९२९ रुग्ण तर २०२१ मध्ये ७८३७ आणि २०२३ मध्ये ७२५६ एवढे अंडवद्धीचे रुग्ण आढळून आले आहेत.
सामुदायिक औषधोपचार मोहीम (एमडीए) आणि केंद्र शासानाच्या सूचनेनुसार टास सर्वेक्षणानंतर हत्तीरोग प्रादुर्भाव असलेल्या बहुतेक जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. दरवर्षी १६ ते ३१ ऑगस्ट या काळात गेले एक तप सातत्याने हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असते. त्याचप्रमाणे सामुदायिक औषधोपचार मोहीमेअंतर्गत हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ्या खाऊ घालण्यात येतात. २०२२ मध्ये ठाणे, पालघर, नंदुरबार, नागपूर आणि यवतमाळ
जिल्ह्यात ४९ लाख ५७ हजार ४१७ लोकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाऊ घालण्यात आल्या होत्या तर फेब्रुवारी २०२३ मध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २७ लाख ३४ हजार २९६ लोकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाऊ घालण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या वेगवेगळ्या उपाययजोनांमुळे राज्यातील १८ हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यापैकी सिंधुदुर्ग, अकोला, जळगाव, अमरावती, वर्धा, सोलापूर, लातुर व उस्मानाबाद हे आठ जिल्हे हत्तीरोग मुक्तीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. आरोग्य विभाग या विषयाबाबत अत्यंत गंभीर असून नियोजनबद्ध हत्तीरोग निर्मूलनाचा कार्यक्रम आरोग्य विभाग राबवत असल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
हत्तीरोगाचा प्रसार ‘क्युलेक्स’ डासाच्या चावण्यामुळे होतो. याचे परिणाम तत्काळ दिसून येत नाही. ८ ते १८ महिन्यांनंतर ते जाणवू लागतात. अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे, वारंवार ताप येणे, अंडवृद्धी होणे, जननेंद्रियावर सूज येणे, ही हत्तीरोगाची लक्षणे आहेत. प्रत्येकाने ‘ट्रिपल ड्रग थेरपी’नुसार दिल्या जाणाऱ्या औषधीचे सेवन केल्यास हा आजार कायमचा संपू शकतो. या औषधीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. अंडवृद्धी (हायड्रोसिल) झालेल्या रुग्णांना शोधून त्यांची शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून जून २०२३ अखेरीस १३६४ अंडवृद्धी रुग्णांच्या हायड्रोसिल शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.