Made In Heaven 2 Beauty Treatment: कालानुरूप तीव्रता बदलली असली तरी गोऱ्या त्वचेचं भारतीयांचं वेड काही केल्या कमी झालेलं नाही. गोरीच्या ग्लोइंग असे शब्दप्रयोग होऊ लागले पण प्रत्येकजण आपापल्या त्वचेचा रंग हलका असावा यासाठी अनेक प्रकार केले जातात. आयुर्वेदिक/नैसर्गिक फेसमास्कच्या पलीकडे जाऊन अनेकदा केमिकल वापरलेल्या ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात. आपण कसं दिसावं हा सर्वस्वी खाजगी प्रश्न आहे त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की तुमची त्वचा गोरी दिसावी तर त्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही पण तुम्ही कोणत्या पद्धतीने आणि किती प्रमाणात या गोष्टींना महत्त्व देताय हे पाहणे फार गरजेचे आहे. ऍमेझॉनची गाजलेली वेबसिरीज मेड इन हेवन च्या दुसऱ्या पर्वात याच ब्युटी ब्युटी ट्रीटमेंट्सचे धोके अधोरेखित करण्यात आले आहेत.
वेब सिरीजमधील नववधूचे एक पात्र अशाच एका ब्युटी क्लिनिकमध्ये ग्लूटाथिओनच्या जास्त डोसमुळे उपचार घेते आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर- अंगावर पुरळ उठते. ग्लूटाथिओन म्हणजे नेमकं काय आणि त्यामुळे खरंच कोणी उजळ दिसू शकतं का? तसेच या ट्रीटमेंटचा उपयोग कोणाला होऊ शकतो कोणाला नाही याविषयी आपण आज त्वचातज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
ग्लुटाथिओन म्हणजे काय?
डॉ दीप्ती राणा, वरिष्ठ सल्लागार, लेझर आणि सौंदर्य चिकित्सक त्वचाविज्ञान, मॅक्स मल्टी स्पेशालिटी सेंटर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ग्लुटाथिओन मुळात एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते सिस्टीन, ग्लाइसिन आणि ग्लूटामेट या तीन अमीनो ऍसिडपासून बनलेले आहे. “हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे पेशी व स्नायूंच्या दुरुस्तीमध्ये मदत करते आणि कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वेदना कमी करण्यासाठी म्हणून वापरले जाते. हे एक अँटिऑक्सिडंट असल्यामुळे, ते मेलेनिनचे स्तर दाबून ठेवते जे त्वचेचे रंगद्रव्य ठरवते. त्यामुळे त्वचेची क्रीम, सीरम आणि लोशनमध्ये त्याचा वापर केला जातो.
कॅन्सर रुग्णांना देण्यात येणाऱ्या सिस्प्लेटिन या औषधापासून मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यासाठी IV इंजेक्शनद्वारे ग्लुटाथिओन दिले जाते. IV उत्पादने तज्ज्ञांकडूनच घेणे अनिवार्य आहे. ग्लूटाथिओन त्वचा कायमस्वरूपी गोरी करण्यासाठी उपयुक्त आहे का हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी विश्वसनीय माहिती किंवा वैज्ञानिक डेटा उपलब्ध नाही. खरं तर, कोणताही त्वचाशास्त्रज्ञ इंजेक्शनचा सल्ला देत नाही.”
डॉ सीमा ओबेरॉय लाल, सल्लागार, त्वचाविज्ञान, सीके बिर्ला हॉस्पिटल, गुरुग्राम यांनी सांगितले की, “ग्लुटाथिओन हे क्रीम, ओरल टॅब्लेट, ओरल स्प्रे म्हणून वापरल्यास सुरक्षित आहे, मात्र मी कधीही इंजेक्शनची शिफारस करत नाही. इंजेक्टेबल ग्लूटाथिओन यकृतातील विकृती आणि ऑटिझमसाठी एकेकाळी वापरले जात होते, मात्र आता कोणत्याही नियमाविना ब्युटी क्लिनिकद्वारे अनेकदा ते वापरले जाते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान झाल्याची प्रकाराने वाढत आहेत.”
ग्लूटाथिओनच्या वापराने काय नुकसान होऊ शकते?
ग्लूटाथिओन इंजेक्शन्सच्या सततच्या वापराने शरीरावर गंभीर पुरळ, पित्ताच्या गाठी येऊ शकतात. याशिवाय थंडी वाजून येणे, वेदनादायक फोड आणि त्वचेवर acne रूपात जखम होणे असे त्रास वाढू शकतात. अनेकांना हे समजत नाही की ग्लूटाथिओन इंजेक्शन्स शरीराच्या वजनानुसार योग्य प्रमाणात वापरले जाणे आवश्यक आहे.
डॉ राणा सांगतात की, “त्वचा गोरी करण्यासाठी ग्लूटाथिओनच्या वापरावर आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतींद्वारे केलेल्या चाचण्यांचे खात्रीशीर परिणाम मिळालेले नाहीत. काही चाचण्यांनी दर्शविले आहे की जरी गोळ्या- औषधांच्या रूपात ग्लूटाथिओन घेतले गेले तरी त्यांची प्रभावीता (विशेषत: दीर्घकालीन) शंकास्पद आहे. ग्लूटाथिओन इंजेक्शन्स अत्यंत महाग असूनही खूप लोकप्रिय आहेत आणि अनेक ब्युटी क्लिनिकद्वारे वापरली जातात. ग्लूटाथिओनचा अतिप्रमाणात वापर शरीरावर विषासारखे काम करू शकतो.
हे ही वाचा<< एक महिना मैदा न खाल्ल्यास वजन, शुगर खरंच कमी होते का? मैदा बंद करण्याचे शरीरासाठी तोटे व फायदे वाचा
सुरक्षित मर्यादा काय आहे?
सुरुवातीपासून आपण ज्या योग्य प्रमाणाविषयी वाचत आहोत ते योग्य प्रमाण नेमकं काय हे आता आपण जाणून घेऊया. जर आपण गोळ्यांच्या रूपात ग्लूटाथिओनचा डोस घेत असाल तर प्रौढांसाठी हे प्रमाण प्रतिदिन ५०० ते २००० मिली ग्रॅम आहे. जर ग्लूटाथिओन इंजेक्शनद्वारे देण्यात आले तर १०- २० मिलिग्रॅम प्रति किलो हे पुरेसे प्रमाण आहे. शिवाय दररोज एक मोठा डोस घेण्याऐवजी डोस विभाजित करणे चांगले आहे. ग्लूटाथिओन ला US FDA ने नियमित इंजेक्शन म्हणून मान्यता दिलेली नाही. इंजेक्टेबल म्हणून नियमित डोस देखील दुष्परिणामांना ट्रिगर करू शकतो. इंजेक्टेबलसाठी सुरक्षित डोस आठवड्यातून १२०० ते २४०० मिलीग्राम आहे. सात किंवा आठ आठवड्यांनंतर, डोस महिन्यातून एकदाच घेणे पुरेसे ठरेल. पण कोणत्याही निर्णयापेक्षा किमान चार वर्षांचा अनुभव असणाऱ्या त्वचातज्ञांचा सल्ला घेणे हे हुशारीचे ठरेल.