-डॉ प्रदीप आवटे.

Heat Wave In Maharashtra: हिट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती ( सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान सलग दोन दिवसांसाठी ४५ डिग्री सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते. वातावरणात होणा-या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा येतात. हे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढताना दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवी शरीर किती तापमान सहन करू शकते?

१९९२ ते २०१५ या काळात भारतात उष्णतेच्या लाटेमुळे २२, ५६२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. माणसांसह पक्षी , प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सूनपूर्व काळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात. वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तो पर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही मात्र त्या नंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदाहरणार्थ प्रत्यक्ष तापमान ३४ डिग्री सेल्सियस असेल पण आर्द्रता ७५ टक्के असेल तर तापमान निर्देशांक ४९ डिग्री सेल्सियस इतका असतो म्हणजे व्यक्तीला ते तापमान ४९ डिग्री सेल्सियस इतके त्रासदायक ठरते.

उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेता उष्णतेमुळे होणारी हानी टाळण्याकरिता हिट ऍक्शन प्लान अर्थात उष्मा प्रतिबंधक कृतियोजना आखणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्हा आणि शहर या अनुषंगाने आपला हीट ॲक्शन प्लॅन तयार करते.
या कृतियोजनेचे चार मुख्य घटक आहेत –

  1. उष्णतेची लाट ही महत्वाची आपत्ती आहे, हे मान्य करणे.
  2. उष्णतेच्या लाटेमुळे नुकसान होणारे समाजगट कोणते आहेत, ते ओळखणे.
  3. सार्वजनिक थंडाव्याच्या जागा निर्माण करणे.
  4. विविध माध्यमातून जनतेला उष्णतेच्या लाटेबाबत सावधानतेचे इशारे देणे.

जनतेला संभाव्य उष्णतेच्या लाटेची आगाऊ कल्पना देण्यासाठी हवामान खात्याच्या मदतीने एक यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे आणि असे इशारे विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मेसेज पासून टीव्ही पर्यंत अनेक माध्यमे वापरण्यात येतात. सर्वसामान्य लोकांना हे इशारे सहज समजावेत या करिता कलर कोडींगची कल्पना वापरण्यात येते.

उदाहरणार्थ –

  • पांढरा रंग – सर्वसामान्य दिवस ( नेहमीच्या कमाल तपमानापेक्षा कमी तपमान)
  • पिवळा अलर्ट – उष्ण दिवस ( जवळपास नेहमीच्या कमाल तपमानाएवढे तपमान)
  • केशरी अलर्ट – उष्णतेची मध्यम स्वरुपाची लाट (नेहमीच्या कमाल तपमानापेक्षा ४ ते ५ डिग्री सेल्सियस जास्त तपमान )
  • लाल अलर्ट – अत्यंत उष्ण दिवस (नेहमीच्या कमाल तपमानापेक्षा ६ डिग्री सेल्सियस किंवा त्या पेक्षा जास्त तपमान )

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे , हे लक्षात घेणे देखील आवश्यक आहे. उष्मा खाली नमूद केलेल्या व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरु शकतो –

  1. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक
  2. वृध्द लोक आणि लहान मुले
  3. स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक
  4. गरोदर महिला
  5. अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक.
  6. काही विशिष्ट औषधावर असलेले लोक
  7. निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक

या अतिजोखमीच्या लोकांची उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारिरिक त्रास मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा त्रास किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. या मध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. साधारणपणे उष्णतेमुळे होणारा त्रास आणि त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेली आहे.

सनबर्न

लक्षणे: कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी
प्रथमोपचार: साध्या साबण वापरुन आंघोळ करावी, घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा. कातडीवर फोड असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येणे(हिट क्रॅम्पस)

लक्षणे: हातापायात गोळे, पोटाच्या स्नायूत मुरडा, खूप घाम
प्रथमोपचार: रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा. दुख-या स्नायूला हलका मसाज द्या. थोडे थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देऊ नका.

उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिट एक्झॉस्टेशन)

लक्षणे: खूप घाम, थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, डोकेदुखी, चक्कर, उलटी
प्रथमोपचार: रुग्णाला थंड जागी शक्यतो ए सी मध्ये झोपवा. अंगावरील कपडे सैल करा, ओल्या, थंड फडक्याने अंग पुसून घ्या. थोडे थोडे पाणी पाजत रहा. उलटी होत असेल तर पाणी देऊ नका. दवाखान्यात हलवा.

उष्माघात ( हिट स्ट्रोक)

लक्षणे: ताप ( १०६ डिग्री फॅ) , कातडी – गरम आणि कोरडी, नाडीचे ठोके – वेगात आणि जोरात, घाम नाही, अर्धवट शुध्दीत
प्रथमोपचार: या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड जागी / ए सी मध्ये न्या. कपडे काढा. थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिग. तोंडाने पाणी देऊ नका.

उष्माघाताने मृत्यू का होतो ?

उष्माघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सियस एवढया तापमानास १५ मिनिटाकरता राहते तेव्हा त्याचे अत्यंत विपरित परिणाम शरीरावर होतात. शरीराचे सामान्य तापमान नियंत्रण यंत्रणा काम करत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात. विविध प्रकारचे लायपोप्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिडस अस्थिर होतात. शरीरातील पातळ पडद्यामध्ये असणारे मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते आणि विविध अवयवांचे कामकाज ठप्प होऊ लागते. या रुग्णाला वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास त्याचा मृत्यू ओढवतो.

उष्णतेचे विविध विकार आणि त्या वरील उपचार याबाबत डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेण्यात येते .सर्व विभागांना एकत्रित घेऊन या अनुषंगाने शहरात खालील बाबी करणे आवश्यक आहे –

  • सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे – बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा , धार्मिक ठिकाणी, बॅंका, पेट्रोल पंप, मुख्य रस्ते इ.
  • उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे.
  • बागा, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर लोकांसाठी खुल्या ठेवणे.
  • टेरेसना उष्मा विरोधी रंग लावणे.
  • पत्र्याचे छत असेल तर त्यावर गवत किंवा कडब्याच्या पेंढ्या टाक़ण्यात याव्यात.
  • कार्यालये, शाळा महाविद्यालये यांचे कामाच्या वेळा बदलणे.
  • उष्णतेपासून संरक्षण कसे करावे याबाबत लोकांचे प्रबोधन करणे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये या संदर्भात जनतेला खालील सूचना देणे आवश्यक आहे –

हे करा.

  • पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
  • उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.
  • पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
  • कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत.
  • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करु नका.

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
  • कष्टाची कामे उन्हात करु नका.
  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
  • गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.
  • उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
  • मद्य , चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.
  • खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.

एकूण काय आपण ज्या पध्दतीने पर्यावरणाचा विनाश करत चाललो आहोत, त्या मुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. उष्माघातापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला स्वतःची काळजीही घ्यायला हवी आणि आपल्या पूर्ण समाजाचे संरक्षण व्हावे , या करिताही प्रयत्न करावे लागतील.

आपली सावली आपल्यालाच व्हावे लागेल, हेच खरे !


मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra heat wave alert coming days are hot how to prevent suburn heat stroke death by heat what to eat doctor advise svs
Show comments