स्वैच्छिक रक्तदानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जवळपास दशकभराहून अधिककाळ देशात सर्वप्रथम राहिले आहे. महाराष्ट्राच्या आसपासही स्वैच्छिक रक्तसंकलन देशातील कोणतेही राज्य करू शकलेले नाही तर महाराष्ट्रात मुंबई कायमच अग्रेसर ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या दोन वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राने ५० लाखाहून अधिक रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले असून एकूण जमा झालेल्या रक्तापैकी ९९ टक्के रक्तदान हे स्वैच्छिक रक्तदानाद्वारे जमा झाले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात करोनाकाळात मुंबईने सर्वाधिक रक्तदान शिबीरांचे आयोजन करून सर्वाधिक रक्तसंकलन केले होते. यात मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा वाटा होता तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवसैनिकांनी राज्यात जागोजागी रक्तसंकलनासाठी शिबिरांचे आयोजन केले होते.

रक्तदानाच्या क्षेत्रात गेल्या दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राने बजावलेल्या उत्तुंग कामगिरीच्या आसपासही देशातील एकही राज्य येऊ शकलेले नाही. देशभरात २०२१ मध्ये सुमारे ८५ हजार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन सुमारे सव्वा कोटी रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राने २८,९२६ रक्तदान शिबीरांचे आयोजन केले असून १६ लाख ७३ हजार ९४७ रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या आहेत. याकाळात जमा करण्यात आलेल्या एकूण रक्तापैकी केवळ ०.१५ टक्के रक्त हे बदली रक्तदानाद्वारे घेण्यात आले असून स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण हे ९९.१० टक्के एवढे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या टप्प्यातही महाराष्ट्रात २६,१०४ रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येऊन त्यामाध्यमातून १५ लाख २८ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. २०२२- २३ मध्ये देशभरात १.६३ कोटी रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले तर याच काळात महाराष्ट्रात १९ लाख २८ हजार रक्तसंकलन करण्यात आले. यासाठी ३४,५०८ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या काळात महाराष्ट्रात २६,८६८ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन त्याद्वारे ११ लाख ८१ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे यात स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण ९९.५७ टक्के एवढे आहे.

आणखी वाचा: राज्य रक्त संक्रमण परिषद स्वेच्छिक रक्तदान मोहीम राबविणार; पंतप्रधानांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत मोहीम

२०२२ जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईत ११३७ रक्तदान शिबीराच्या माध्यमातून ९१,३९३ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. त्या पाठोपाठ पुण्यामध्ये १२७९ रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून ९१,३७७ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या असून सोलापूर जिल्ह्यात ४७,१३१ रक्ताच्या पिशव्या ,ठाणे ३७,६४२ तर नागपूर येथे ३७,०२६ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या.

राज्यात जमा होणाऱ्या रक्तापैकी ११,८९० थेलेसेमीयाच्या रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. त्याचप्रमाणे हिमोफेलियाच्या ५७४३ तर सिकलसेलच्या १०,८६१ रुग्णांना मोफत रक्त देण्यात येते. राज्यात ३७१ रक्तपेढ्या असून यातील ३२५ रक्तपेढ्यांमध्ये रक्तघटक विलगीकरणाच्या सुविधा आहेत तर १३८ रक्तपेढ्यांमध्ये अफेरेसीसच्या सुविधा असल्याचे राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र केंद्रे यांनी सांगितले. देशात एकूण ३८४० रक्तपेढ्या आहेत तर देशातील अनेक राज्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत उदासिन असल्याचे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

अर्थात आरोग्य विभागाने म्हणजेच आरोग्यमंत्री व सचिवांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने शासकीय रक्तपेढ्यांचा कारभार दुर्बल झाला आहे. स्वैच्छिक रक्तदानाला गती येण्यासाठी कागदावर आरोग्य विभागाच्या अनेक योजना आहेत मात्र त्याला गती देण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. आज आरोग्य विभागाला आरोग्य संचालक नाहीत तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेसाठी पूर्णवेळ सहाय्यक संचालकही नेमण्यात आलेले नाही. परिषदेतील अनेक पदे रिक्त असून सर्व कारभार हंगामी पद्धतीने सध्या सुरु आहे. याचा मोठा फटका ‘जे जे महानगर रक्तपेढी’ला बसत आहे.

मुंबईतील जे.जे. महानगर रक्तपेढीत सुमारे ४० हजार रक्ताच्या पिशव्या संकलित करण्याची क्षमता असून अपुरे कर्मचारी तसेच या कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा तसेच आर्थिक सोयीसवलती देण्यात येत नसल्यामुळे गेल्या काही वर्षात रक्तसंकलन घसरणीला लागले आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रक्तदान शिबीरासाठी पुरेसा भत्ताही दिला जात नाही तसेच कामाच्या तुलनेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देतानाही आरोग्य विभागाकडून हात आखडता घेण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आरोग्यमंत्री तसेच आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे मात्र त्याची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही.

याच्या परिणामी सध्या येथे वार्षिक सरासरी ३० हजार रक्तसंकलन होताना दिसते. करोनाच्या दोन वर्षात म्हणजे २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे १९,३४९ व २०,८६४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. अपुरे कर्मचारी असूनही करोनाकाळात केलेल्या या कामगिरीसाठी जागतिक रक्तदान दिवसानिमित्त आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जे. जे. महानगर रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र जे जे महानगर रक्तपेढी सक्षम करण्याबाबत आरोग्य विभाग उदासीनता बाळगून आहे.