दररोज सकाळी चालायला जायचं तर किती पावलं चालणे योग्य ठरते यावरून सतत कुणीतरी चर्चा करत असतात. या चर्चेच्या शेवटी आठ ते दहा हजार पावलांदरम्यान चालणे योग्य ठरते असे म्हटले जाते. पण, शेवटी चालण्याचा व्यायाम हा प्रत्येकाने स्वतःचे वजन सांभाळून, त्यांना जमेल तितका वेळ, परंतु नियमित करायला हवा. चालण्यामुळे हृदयाचे, फुफ्फुसांचे आरोग्य उत्तम राहून कोणत्याही प्रकारच्या हृदयासंबंधित समस्या दूर राहण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या शरीराचे वजन कमी होते, मसल्सदेखील निरोगी राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु, या सर्व चांगल्या गोष्टी आपण व्यायाम नियमितपणे केल्यानेच होऊ शकतात. आता ही रोज चालण्याची सवय आपल्या शरीराला कशी बरं लावावी? तर सगळ्यात पहिले, कुठलाही कंटाळा न करता सकाळी लवकर उठून, थोडा कवायतीचा प्रकार करून शरीराला व्यायामासाठी तयार करा. व्यायाम कंटाळवाणा कधीच नसतो, पण त्याला मजेशीर बनवण्यासाठी या काही गोष्टींमधूनदेखील तुम्ही तुमच्या व्यायामाचे ध्येय गाठू शकता, कसे ते बघा.

सर्वांगीण आरोग्यतज्ज्ञ [होलिस्टिक हेल्थ एक्स्पर्ट], डॉक्टर मिकी मेहेता यांनी सांगितलेल्या या गोष्टींमधून तुम्ही दिवसभरात तुमचा स्टेप काऊंट कसा वाढवू शकता हे पाहा :

१. इतर कामे करताना जागेवर चालणे/धावणे [स्पॉट जॉगिंग]

तुम्ही दात घासत घासत घरात फेऱ्या मारू शकता किंवा चहा बनवताना मध्ये मध्ये स्पॉट जॉगिंग करू शकता.

२. ब्रिस्क वॉकिंग

ब्रिस्क वॉकिंग या प्रकारात आपल्या चालण्याच्या वेगात थोड्या थोड्या वेळाने बदल केला जातो. सुरुवातीला आपल्या नेहमीच्या वेगामध्ये चालल्यानंतर काही सेकंद आपल्या चालण्याचा वेग थोड्या वेळासाठी वाढवावा. हे असं अधून मधून केल्याने, चालताना कंटाळा येणार नाही.

हेही वाचा : काम करून डोळ्यांवर ताण आलाय? पाहा, निरोगी डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतील हे सात योगा…

३. खेळ खेळा

फुटबॉल किंवा बास्केटबॉलसोबत खेळल्यानेदेखील चांगला व्यायाम होतो. चेंडू एका हाताने जमिनीवर आपटत खेळल्याने तुम्ही नकळत बरीच पावलं चालत राहता.

४. काम करत असताना व्यायाम करा.

कामावर असताना, शक्य असल्यास काही वेळासाठी उभे राहून काम करा. याने तुम्ही जागच्याजागी थोडी पावलं चालू शकता.

५. काम करता करता चाला

सतत खुर्चीवर बसून राहण्यापेक्षा, तुमच्यासोबत काम करणाऱ्या मंडळींसोबत बोलता बोलता सहज ऑफिसमध्ये एखादी चक्कर मारू शकता.

६. तंत्रज्ञानाचा वापर

फोनमध्ये असणाऱ्या फिटनेस ऍपच्या मदतीने तुम्ही किती चालत आहेत यावर लक्ष ठेऊन ठराविक अंतरानंतर चालण्यासाठीचे गजर लावून ठेवा.

७. बोलता बोलता चालणे

बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीशी तासनतास फोनवर गप्पा मारत असतो. अशावेळी फोन हातात घेऊन एका ठिकाणी न बसता, फोनवर बोलता बोलता फेऱ्या मारत राहा.

८. मित्रांसोबत चालायला जा

तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा पाळीव प्राण्यांसोबत चालायला जावे. आपल्या आवडत्या किंवा जवळच्या व्यक्तीसोबत चालायला गेल्याने त्यांना वेळ देता येतो आणि सोबत काही मिनिटे जास्तीचा व्यायामदेखील होतो.

९. बाजारातून सामान आणणे

सध्या फोनवरून कोणतेही सामान सहज घरी मागवता येत असल्याने आपण तोच मार्ग स्वीकारतो. पण, असे न करता भाजीचा बाजार जवळ असल्यास बाजारात चालत जाऊन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू घरी आणाव्यात.

हेही वाचा : दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाऊन शरीर झालेय सुस्त? पाहा हे सात सोपे उपाय करतील तुम्हाला तंदुरुस्त

१०. शतपावली

जेवण झाल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी किंवा इतर बैठ्या गोष्टी करण्याऐवजी शतपावली घालावी. यामुळे खाल्लेल्या अन्नपदार्थांचे चांगल्याप्रकारे पचन होण्यास मदत होऊन तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

११. आवडत्या गाण्यांची मदत घ्यावी

घरामध्ये असताना तुमच्या आवडीची उत्साही गाणी लावून त्यावर मनसोक्त नाचावे. असे केल्याने मनावरचा थकवा, मरगळ दूर होण्यास मदत होऊन चांगला व्यायाम होतो.

१२. कुठल्यातरी ठराविक गोष्टीसाठी चाला

एखाद्या ठराविक भागातील गरीब मुलांच्या मदतीसाठी, त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे यासाठी स्वतः चालत जाऊन त्यांना आपल्या हातांनी मदत करावी. यामुळे व्यायामासोबत तुमच्या हातून समाजकल्याणदेखील होईल.

१३. नवनवीन जागांचा शोध घ्या

सुट्टीच्या दिवशी जवळच्या किंवा तुम्हाला माहीत नसलेल्या लहानशा टेकडी किंवा पार्कमध्ये जाऊन नवीन जागांची माहिती घ्या.

१४. स्वतःला बक्षीस द्या

तुम्ही ठरवलेले सर्व दिवस जर तुम्ही व्यायाम केला असले, तर त्याचे बक्षीस म्हणून तुम्हाला आवडत असलेली वस्तू स्वतःलाच भेट म्हणून द्या, यामुळे तुम्ही पुढची आव्हाने अगदी आवडीने स्वीकाराल.

१५. ध्यान

जर तुम्हाला ध्यान लावायचे असेल तर जवळच्या बागेत किंवा जिथे तुम्हाला निसर्गाचा सहवास मिळेल अशा ठिकाणी जाऊ शकता. अशा ठिकाणी गेल्याने आपोआपच मनाला शांती मिळते.
व्यायाम करताना शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे चालण्याच्या व्यायामाआधी आणि नंतर पाणी पिण्यास विसरू नका. तुम्ही जर बऱ्याचवेळासाठी किंवा लांब कुठेतरी चालायला जाणार असल्यास, पाण्याची बाटली कायम सोबत ठेवा.

कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्याआधी, तुम्हाला आरोग्यविषयक कोणता त्रास तर नाही ना हे तपासून पाहावे. तसा काही त्रास असल्यास सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरसोबत बोलून मगच व्यायामात बदल करावे किंवा सुरुवात करावी. त्यासोबतच, व्यायामासाठी चालायचे आहे म्हणून त्याचा अतिरेक करू नका. शरीराला आणि तुम्हाला जमेल, झेपेल तितकेच चालावे; परंतु त्यात खंड पाडू नये.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make walking a regular habit complete 8000 to 10000 steps a day easily here are some tips and tricks dha
Show comments