Malaika schools teen contestant on dance show : कोणत्याही क्षेत्रात वावरताना इतरांचा आदर करणे आणि कोणतीही सीमा न ओलांडणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नुकतेच ‘हिप हॉप इंडिया सीझन २’मधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गैरवर्तनावरून जज मलायका अरोराने १६ वर्षीय स्पर्धकाला चांगलेच फटकारले. या स्पर्धकाचे नाव नवीन शाह असून तो उत्तर प्रदेशचा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका स्पष्टपणे नाराज दिसत आहे आणि ती स्पर्धकाला म्हणते, “तुझ्या आईचा नंबर दे” तिने पुढे सांगितले की, “तो डान्स करताना माझ्याकडे बघून डोळा मारत होता, तो फ्लाइंग किस देत होता.”
व्हायरल व्हिडीओ
स्पर्धकाने हे सर्व परफॉर्मेन्सचा भाग म्हणून केले असतील, पण तरुणांना योग्य वर्तन, वैयक्तिक सीमा आणि त्यांच्या अशा कृतीच्या परिणामाबद्दल शिक्षित करणे महत्त्वाचे आहे.
शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची
कॅडॅबम्स हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ सायकोलॉजिस्ट आणि कार्यकारी संचालक नेहा कॅडॅबम सांगतात, “तीन किंवा चार वर्षांच्या वयापर्यंत मुले आदर करणे, नीट बोलणे आणि परवानगी घेणे इत्यादी बाबी सोप्या पद्धतीने समजून घेण्यास सुरुवात करतात. जसजशी मुले मोठी होतात, तसतसे सीमा, आदर आणि योग्य वर्तन याविषयी चर्चा करून याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे.”
मुलांना आदरयुक्त वर्तन शिकवण्यास पालक महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराची स्वायतत्ता, वैयक्तिक स्वायतत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता याविषयी घरी संवाद साधला पाहिजे, जेणेकरून मुलांना परिस्थितीनुसार काय योग्य आहे, याची समज निर्माण होईल.
“टेलिव्हिजन शो, चित्रपट, सोशल मीडिया आणि अगदी ऑनलाइन ट्रेंडसुद्धा काही वर्तनांना जरी ते अयोग्य असले तरीही सामान्य वर्तन म्हणून प्रोत्साहन देऊ शकतात. याशिवाय घरातील किंवा समाजातील गैरवर्तनावर वरिष्ठांची प्रतिक्रिया काही कृतींना प्रोत्साहन देऊ शकते किंवा परावृत्त करू शकते.” कॅडबॅम सांगतात, “तरुणांना त्यांच्या कृतीच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यास मदत करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे.
शाळांनी त्यांच्या अभ्यासक्रमात साक्षरता, आदर आणि वैयक्तिक सीमा यावर आधारित धडे पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले पाहिजे. तसेच पालकांनी मुलांबरोबर चर्चा केल्या पाहिजेत, ज्यामुळे तरुणांना योग्य आणि अयोग्य वर्तनामधील फरक समजून घेण्याची क्षमता निर्माण होईल.”
सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता
“तरुणांच्या गैरवर्तनावर उपचार करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता असते, जो त्यांच्या आत्मसन्मानाला हानी न पोहोचवता वर्तन सुधारण्यास मदत करेल. रागाने किंवा अपमान करून सांगण्यापेक्षा शांतपणे समजावून सांगितले पाहिजे की विशिष्ट वर्तन का अयोग्य आहे आणि त्याचा इतरांवर काय परिणाम होतो. प्रश्न विचारून आत्मचिंतनाला प्रोत्साहन देणे तरुणांना त्यांच्या कृतींचे परिणाम समजून सांगण्यास मदत करू शकतात.” कॅडबॅम पुढे सांगतात, “सकारात्मक दृष्टिकोनाने चांगले वर्तन स्वीकारले जाते आणि त्यासाठी प्रोत्साहित केले जाते, हे एखाद्याला अनुचित वर्तनावरून शिक्षा करण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते.”