Man Killed By Brain Eating Amoeba: फ्लोरिडाच्या शार्लोट येथील एका व्यक्तीचा नळाच्या पाण्याने नाक धुतल्यावर मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. फ्लोरिडा आरोग्य विभागाने या व्यक्तीचा मृत्यू मेंदू खाणारा अमिबा नाएग्लेरिया फॉउलरीच्या संसर्गामुळे झाल्याची पुष्टी केली आहे. हा अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि नंतर मेंदूकडे जातो व मेंदूच्या ऊतींचा नाश करतो ज्यामुळे प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस नावाचा धोकादायक संसर्ग होतो. हा संसर्ग प्राणघातक आहे.
प्राप्त माहितीनुसार, या संसर्गाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या, संतुलन गमावणे, दिशाभूल होणे, चक्कर येणे यांचा समावेश होतो. ही स्थिती जर गंभीर झाली तर मानसिक स्थितीत वारंवार बदल, भ्रम जाणवू शकतो तसेच व्यक्ती कोमात सुद्धा जाऊ शकते.
रेकॉर्डमध्ये म्हंटल्याप्रमाणे, हा आजार झालेल्यांपैकी ९७ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १९६२ ते २०२१ दरम्यान यूएसमध्ये आढळलेल्या १५४ पैकी फक्त ४ रुग्ण या संसर्गापासून वाचले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लोरिडीयन व्यक्तीचा मृत्यू हे यूएसमध्ये घडलेले पहिले प्रकरण आहे. रोग तज्ञ डॉ मोबीन राठौर यांनी सर्व शार्लोट काउंटी रहिवाशांना, नळाचे पाणी नाक व चेहरा धुण्यासाठी न वापरण्याचा सल्ला दिला आहे. अपरिहार्य परिस्थितीत, रहिवाशांना प्रथम पाणी उकळून नंतर ते वापरण्यास सांगितले जाते.
मेंदू खाणारा अमिबा म्हणजे काय? (What Is Brain Eating Amoeba)
नाएग्लेरिया फॉउलरी ज्याला मेंदू खाणारा अमिबा म्हणूनही ओळखले जाते, हा एक पेशी असलेला जीव आहे जो केवळ सूक्ष्मदर्शकाखाली दिसतो. हा तलाव, नद्या, गरम पाण्याचे झरे यांसारख्या उबदार गोड्या पाण्यात आढळते.
मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग कसा होतो?
तलाव आणि नद्यांमध्ये पोहताना किंवा डुबकी मारताना माणसांच्या संपर्कात आल्यानंतर या अमिबाचा संसर्ग होतो. जर लोकांनी नाक आणि सायनस स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर केला तर हा संसर्ग लगेच होऊ शकतो. एकदा अमिबा नाकातून मानवी मेंदूपर्यंत पोहोचला की तो मेंदूच्या ऊतींचा नाश करतो आणि प्राथमिक अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (PAM) होतो.
हे ही वाचा<<फळं खाताना ‘या’ ३ चुका केल्यास ब्लड शुगर १०० च्या वेगाने वाढू शकते; डायबिटीजचा धोका कसा टाळावा?
फ्लोरिडा आरोग्य विभागाने शुक्रवारी ट्विट केले की, “नाएग्लेरिया फॉउलरीचा संसर्ग अत्यंत दुर्मिळ आहे आणि जेव्हा अमीबाने दूषित पाणी नाकातून शरीरात प्रवेश करते तेव्हाच हा आजार होऊ शकतो. दूषित पाणी नाकात गेल्यावरच हा संसर्ग होऊ शकतो, दूषित पाणी पिऊन व्यक्तीला संसर्ग होणार नाही, असे विभागानेही स्पष्ट केले आहे.
नाएग्लेरिया फॉउलरी साठी लस आहे का?
सध्या PAM साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. अमिबाच्या दुर्मिळतेमुळे आणि योग्य निदान चाचण्यांच्या अभावामुळे संसर्गाचे निदान करणे कठीण होऊ शकते. सध्या, यावर औषधांच्या संयोगाने उपचार केले जातात, ज्यात बहुतेकदा अॅम्फोटेरिसिन बी, अजिथ्रोमाइसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथासोन यांचा समावेश होतो.