पावसाळा सुरू झाला की, सर्दी, खोकला, ताप येणं सामान्य गोष्ट आहे. सर्दी व खोकला झाला की, बरेच जण दूध पिणे टाळतात. कारण- यामुळे श्लेष्मा (कफ) {म्युकस प्रॉडक्शन / mucous production} होतो, असे म्हटले जाते. पण, हे खरं आहे का? हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.

बंगळुरूमधील स्पर्श हॉस्पिटलच्या सल्लागार व पोषणतज्ज्ञ रेश्मा ए. एम. यांच्या मते, या थिअरीमागचे कारण असे आहे की, दुधाच्या सेवनामुळे तोंडात व घशात एक आवरण पडते; ज्याला श्लेष्मा (कफ) समजले जाऊ शकते. पण, शारदा हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या डॉक्टर श्रेय श्रीवास्तव म्हणाल्या की, लॅक्टोज असहिष्णुता किंवा दुधाच्या ॲलर्जीच्या लक्षणांमुळे रक्तसंचय किंवा कफ यासारख्या समस्या उदभवू शकतात. पण, हे श्लेष्माच्या उत्पादनामुळे होत नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

फरिदाबादच्या अमृता हॉस्पिटलचे डॉक्टर अर्जुन खन्ना यांनी याबाबत स्पष्ट केले की, छातीचे आजार असलेल्या भारतीय रुग्णांमध्ये कफ असल्याचे निदर्शनास येते. केळी, भात, दूध यांसारखे बरेच पदार्थ कफनिर्मितीशी संबंधित आहेत. पण, सध्याच्या काळातील औषधे ही कफ उत्पादनाशी अन्नाचा संबंध जोडण्यास समर्थन देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासातही गाईचे दूध पिणाऱ्या लोकांच्या श्लेष्मा उत्पादनात सोयाआधारित पेय सेवन करणाऱ्यांमध्ये फरक आढळला नाही.

हेही वाचा…भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? मधुमेही रुग्णांसाठी ठरेल का धोक्याची घंटा? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

तसेच काहींना वैयक्तिक संवेदनशीलतेमुळे किंवा दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर कफ किंवा श्लेष्मा वाढणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. अर्थात, हे सर्वांसाठी लागू होत नाही. दमा किंवा ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनविषयक समस्या असलेल्यांच्या घशात दुधाचे काही अंश राहिल्यामुळे अशा लक्षणांमध्ये वाढ होऊ शकते. पण, यामुळे श्लेष्मा उत्पादनात वास्तविक वाढ होत नाही, असे तज्ज्ञ रेश्मा म्हणाल्या आहेत.

जर तुम्हाला श्वसनाशी संबंधित विकारांसह कफाचासुद्धा त्रास होत असेल, तर नियमितपणे औषधे घ्या, बाहेर जाताना फेस मास्क वापरा, भरपूर द्रवपदार्थ प्या आणि स्वतःला हायड्रेट ठेवा. तसेच, जर कफ पिवळा किंवा दुर्गंधी असेल, तर ते तुमच्या छातीत संसर्ग झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित फुप्फुस तज्ज्ञांना भेटले पाहिजे, असे डॉक्टर अर्जुन खन्ना बजावून सांगितले. दूध पिण्याने श्वासोच्छ्वास घेण्याच्या स्थितीत वाढ होत नाही किंवा वैज्ञानिक पुराव्यांनुसार कफसुद्धा होत नाही. ज्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आवडतात, त्यांनी चिंता न करता, या पदार्थांचे सेवन करावे, असे तज्ज्ञ रेश्मा सांगितले.