Masaba Gupta’s Winter Breakfast Secret : ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक, लोकप्रिय अभिनेत्री, फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही सोशल मीडियावर फिटनेसविषयी नवनवीन माहिती शेअर करते आणि आहार, व्यायामाविषयी माहिती सांगते. नुकतेच तिने हिवाळ्यातील नाश्त्याविषयीची माहिती सांगत एक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर बाजरीच्या धिरड्याचा (Chilla) फोटो शेअर करत मसाबाने लिहिलेय, “हिवाळ्यातील नाश्ता- भोपळा, बाजरी, तीळ, पालक, मिरची, आले व लसणाचा समावेश असलेल्या बाजरीचे धिरडे.”
बाजरी व भोपळ्याचा नाश्त्यामध्ये समावेश करणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर?
गुरुग्राम येथील नारायण हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात, “बाजरी आणि भोपळा हिवाळ्यात आरोग्यासाठी पोषक आहे. बाजरीमध्ये पौष्टिक घटक आहेत आणि भोपळा ही हंगामी पौष्टिक भाजी आहे. त्या सांगतात, “बाजरीचे धिरडे हा भारतीय पारंपरिक पदार्थ शरीरासाठी उबदार आणि चविष्ट आहे; पण त्याचबरोबर हिवाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.”
हेही वाचा : नाश्ता किंवा रात्रीचे जेवण न करणे; उपवास करण्याची कोणती पद्धत तुमच्या आरोग्यासाठी आहे उत्तम?
बाजरीच्या सेवनाचे फायदे
बाजरी हे पौष्टिक घटकांनी समृद्ध धान्य आहे; ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि खनिजे असतात. बाजरीचे सेवन केल्याने ऊर्जा स्थिर राहून, हिवाळ्यातही शरीराला ऊब मिळते.
बाजरीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मॅग्नेशियम आहे. शरीराच्या तापमानासह अनेक शारीरिक कार्यांमध्ये मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावते. पटपरगंज येथील मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ ज्योती खनिओझ (Jyoti Khaniojh) सांगतात, “बाजरीतील खनिजे शरीरातील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत करतात; ज्यामुळे शरीराला ऊब मिळते. त्यामुळे हिवाळ्यात बाजरी हा एक उत्तम पर्याय ठरतो”
भोपळ्याच्या सेवनाचे फायदे
मोहिनी डोंगरे सांगतात, “बाजरीबरोबर भोपळ्याचे सेवन अधिक फायदेशीर ठरते, जे शरीराला अ व क जीवनसत्त्व पुरविते. ज्यामुळे हिवाळ्यात शरीराला रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते.
ज्योती खनिओझ सांगतात, “निरोगी त्वचा आणि डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी अ जीवनसत्त्व खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसून येते. हिवाळ्यात लोकांना सर्दी आणि इतर संसर्ग होण्याची भीती असते तेव्हा क जीवनसत्त्व हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते”
बाजरी आणि भोपळा
तसेच बाजरी आणि भोपळा यांचे मिश्रण पचनास फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने हिवाळ्यात पचनाशी संबंधित समस्या दूर होते. डोंगरे सांगतात, “बाजरीतील फायबरमुळे आतडे निरोगी राहते.”
ज्योती खनिओझ यांच्या मते, बाजरी आणि भोपळ्याच्या सेवनाने ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, जो रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.
डोंगरे पुढे सांगतात, “बाजरीच्या धिरड्यामध्ये आले, हळद यांसारख्या मसाल्यांचा समावेश असतो. हे मसाले फक्त चवच वाढवत नाहीत, तर शरीराला ऊब देऊन, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.”
बाजरी आणि भोपळ्याचे धिरडे हा एक पौष्टिक पदार्थ आहे आणि तो हिवाळ्यात उबदार, पचनास सोपा, व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो. हिवाळ्यात तुम्ही आहारात या पदार्थाचा समावेश करू शकता.