Masaba Gupta reveals her Desi hack to cure cold and cough: बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता (Masaba Gupta ) एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. एप्रिल महिन्यात मसाबा गुप्ता व तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी ते दोघे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितली होती. तर मसाबा गुप्ता देसी जुगाड व हॅकची फॅन आहे. तर गर्भवती मसाबा गुप्ताने काही दिवसांपूर्वी असे सांगितले की, तिला खोकला, सर्दी, रक्तसंचय ही सर्व लक्षणे बरे करण्यासाठी ओवा गरम करून तो रुमालात घालून, त्याचा बटवा बनवून त्याचा वास घ्यायला आवडते.
आजीबाईंचा बटवा हे तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल. आई-आजीच्या जुन्या युक्त्यांना आपण कधीच नाही म्हणणार नाही किंवा त्यावर अविश्वासही दाखवणार नाही. पण, या हेल्थ हॅकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला आणि हा घरगुती उपाय वा जुगाड गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही हे शोधून काढले.
ओव्यामध्ये थायमॉल असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. थायमॉल तुमचे नाक साफ करण्यास, घशाची जळजळ कमी करण्यास मदत करते. तर होय, ओवा गरम करून तो रुमालात घालून, त्याचा बटवा बनवून वास घेणे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते; असे पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांनी सांगितले आहे.
आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉक्टर अंशु वात्स्यायन म्हणाले की, हा ओव्याचा बटवा शरीर व डोकेदुखी बरं करू शकते. बाळंतपणानंतर हा उपाय महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. हा बटवा तयार करण्यासाठी तुम्ही ओव्याच्या बिया तव्यावर भाजून किंवा कोमट पाण्यात भिजवून घेऊ शकता. बटवा बनवण्यासाठी ओवा अर्धा चमचापेक्षा जास्त घेऊ नका; अशी त्यांनी शिफारस केली आहे.
ओव्याचा बटवा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे का?
आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉक्टर अंशु वात्स्यायन आणि पोषणतज्ज्ञ ईशा लाल या दोघांनीही मान्य केले की, ओव्याचा बटवा गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.
जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान इंग्रजी औषधे खायची नसतील आणि त्याचे दुष्परिणाम सहन करायचे नसतील, तर ओव्याचा बटवा तुम्हाला ठराविक औषधांशी संबंधित होणाऱ्या दुष्परिणामांपासून आराम देईल. पण, तुम्हाला खात्री नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्यांच्याकडून तपासून घेणे केव्हाही उत्तम ठरेल; असे पोषणतज्ज्ञ ईशा लाल म्हणाल्या आहेत.
ओव्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत?
पचनास मदत : ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस्ट्रिक रस स्राव करते, अपचन आणि ब्लोटिंग (पोट फुगण्याची समस्या) कमी करण्यास मदत करते.
श्वसनास आराम : ओव्याचे प्रतिजैविक गुणधर्म सर्दी, खोकला आणि रक्तसंचय कमी करण्यास मदत करतात.
वेदनांपासून त्वरित आराम : ओवा त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखी, स्नायू, पायात पेटके येणे शांत करू शकते.
अँटीमायक्रोबिल : ओव्यातील थायमॉल संइन्फेक्शनचा सामना करते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.
गर्भवती महिला हे किती वेळा वापरू शकतात?
पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांनी सांगितले की, गर्भवती महिला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सुरक्षितपणे ओव्याचा बटवा वापरू शकतात. पण, अस्वस्थता टाळण्यासाठी अतिवापर करणे टाळा; असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.