गोवर (measles) हा एक वेगाने पसरणारा आजार आहे. हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. साधारणपणे सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. संसर्ग झाल्यानंतर दहा-बारा दिवसांनंतर लक्षणे जाणवू लागतात. यात लहान मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं, अंग दुखणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल होणं अशी लक्षणं दिसून येतात. तसेच काही मुलांना जुलाब, उलटीचासुद्धा त्रास होतो.
दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील चार वर्षांची अर्चिता नावाची मुलगी आपल्या घरी वडिलांसोबत खेळता खेळता अस्वस्थ वाटू लागल्यानं अचानक कोसळली. त्या मुलीचे शरीर अनियंत्रितपणे थरथरले अन् तिचे डोकेही बाजूला लोटले. हात पाय सुन्न झाले. अर्चिताला झटके येण्याच्या भीतीने तिच्या वडिलांनी कोणताही विलंब न करता तिला राजधानी लखनौच्या रुग्णालयात नेले आणि तिला Subacute Sclerosing Panencephalitis (SSPE) चे निदान झाले. हा आजार गोवरच्या विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवतो.
Subacute Sclerosing Panencephalitis (SSPE) म्हणजे काय?
एसएसपीई हा गोवरच्या विषाणूमुळे होतो. हा आजार जीवघेणा ठरू शकतो. एसएसपीई ही गोवरच्या विषाणूमुळे उद्भवणारी दुर्मिळ परंतु घातक स्थिती आहे. एसएसपीई हा एक संथ अन् महत्त्वाचा म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार आहे. या आजारामुळे मेंदूची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याची लक्षणे तात्काळ दिसत नसून काही महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर या आजाराची लक्षणे दिसून येतात. यामुळे मेंदूला जळजळ, सूज येते. गोवरमधून बरे झाल्यानंतर अनेक वर्षांनी हा आजार होऊ शकतो.
SSPE हा घातक मेंदूचा विकार आहे. एसएसपीई हा दुर्मिळ आजार आहे. हे सहसा मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेमध्ये आढळते. सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटिस हा एक प्रगतिशील न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो मेंदूच्या जळजळद्वारे दर्शविला जातो. गोवर विषाणू पुन्हा सक्रिय झाल्यामुळे किंवा गोवरच्या विषाणूला अयोग्य रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे हा रोग विकसित होऊ शकतो, असे दिल्ली AIIMS मधील बालरोग विभाग प्रमुख डॉ. शेफाली गुलाटी यांनी सांगितले असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
डाॅक्टर सांगतात, एसएसपीईसाठी गोवर लसीकरणाच्या स्वरूपात प्रतिबंध हा एकमेव खरा उपचार ठरु शकतो. तुम्हाला फेफरे येत असल्यास, त्या दरम्यान होणार्या दुखापती टाळण्यासाठी तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. SSPE रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गोवर विरुद्ध लसीकरण करणे.
तर त्याच संस्थेतील न्यूरोलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. मंजरी त्रिपाठी सांगतात की, दर महिन्याला किमान दोन SSPE प्रकरणे आढळून येतात. खरंतर SSPE साठी इलाज उपलब्ध नाही. पण, फेफरे नियंत्रित करण्यासाठी तुमचे डाॅक्टर्स अँटीकॉनव्हल्संट औषधेदेखील लिहून देऊ शकतात. काही अँटीव्हायरल औषधे लिहून देऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या रोगाची प्रगती कमी होऊ शकते.