‘मॅडम गेल्या दोन वर्षांपासून माझे गुडघे आणि कंबर दुखते. सतत हे दुखतं ते दुखतं असं होतं. पूर्वी मी सगळी कामं उत्साहाने करायचे आता दिवसभर थकवा तरी येतो किंवा काही ना काही दुखतं. रात्री झोपताना सांधे जड वाटतात आणि सकाळी उठताना शरीर आखडलेलं वाटतं. ही दुखणी आता कायम माझ्यासोबत राहणार असं वाटतं मला’, ५२ वर्षांच्या एक रुग्ण हाताशपणे मला सांगत होत्या.
हे सगळं होण्याची विशिष्ट कारणं आहेत, तुम्हाला ती कारणं मी समजावून सांगेन. आपण तुमचा व्यायाम आणि जीवनशैली यावर व्यवस्थित लक्ष देऊया. आम्ही त्यांना एरोबिक, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, फलेक्सिबिलिटी आणि बॅलन्स असा समतोल व्यायाम आखून दिला. त्यासोबत त्यांना ऑर्थोपेडिक डॉक्टरकडून योग्य त्या जीवनसत्वांची औषधे सुरू केली, त्यांच्या दिनचर्येत बदल केले. तीन महिने नियमित व्यायाम केल्यावर त्यांच्या सांधेदुखीत लक्षणीय फरक पडला. झोप चांगली लागू लागली, थकवा कमी झाला.
बहुतांशी महिलांना मेनोपॉजनंतर (रजोनिवृत्ती) सांधे आणि स्नायूंच्या वेदना होतात, संप्रेरकांच्या बदलांमुळे भावनिक आणि मानसिक लक्षणं देखील जाणवतात. या सगळ्या बदलांमुळे हा काळ आव्हानात्मक ठरतो. अशावेळी फिजिओथेरपी उपचार घेतल्यास वेदना नियंत्रणात ठेवता येतात आणि रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते.

मेनोपॉजमध्ये सांधेदुखी का वाढते?

  1. ईस्ट्रोजेनची कमतरता: हाडांचे संरक्षण करणाऱ्या एस्ट्रोजेन संप्रेरकाची पातळी कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात.
  2. सांध्यांची झीज आणि ईनफलेमेशन (Inflammation): संप्रेरकांच्या चढ-उतारांमुळे सांध्याची झीज वेगाने होते आणि त्यामुळे वेदना होतात.
  3. हाडांची घनता कमी होणे (Bone Density Loss): शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यासारख्या जीवनसत्वांची कमतरता असेल तर हा त्रास अधिकच वाढतो.
  4. स्नायूंची ताकद आणि लवचिकता कमी होणे: स्नायू कमकुवत झाल्याने सांध्यांवर अधिक ताण येतो.
  5. वजन वाढणे: मेनोपॉजनंतर मेटाबॉलिझम मंदावतो, त्यामुळे वजन वाढते आणि सांध्यांवर अधिक दाब येतो.

फिजिओथेरपी उपचार

सर्वप्रथम आम्ही रुग्णाला त्यांना हा त्रास का होतो आहे हे त्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगतो. त्यामुळे त्यांना येणारी हताशपणाची भावना कमी होते आणि त्यांचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याला होणारा त्रास हा आजार नसून मेनोपॉजमुळे शरीरात होणारे बदल आहेत हे त्यांच्या लक्षात येतं.
लो-इम्पॅक्ट कार्डिओ व्यायाम: रुग्णाच्या गरजेनुसार हे व्यायाम ठरवले जातात, त्यांचं प्रमाण, पद्धत, प्रकार हा प्रत्येक रुग्णागणिक वेगळा असतो. या व्यायामांचा प्रमुख उद्देश हा स्नायू बळकट करणे, हाडांवर योग्य त्या प्रमाणात वजन देणे (म्हणजे त्यांना बळकटी येते), हृदय आणि फुफ्पुसांची कार्यक्षमता वाढवणे, रक्तभिसारण सुधारणे आणि मेंदूमध्ये व्यायामुळे उत्पन्न होणाऱ्या आनंदी संप्रेरकांची निर्मिती होणे हा असतो.


स्ट्रेन्थ ट्रेनिंग (Strength Training)

हे व्यायाम सुद्धा रुग्णाला अनुसरून असतात, सरसकट सगळ्याना ते लागू होत नाहीत. प्रत्येक स्नायू साठी विशिष्ट असणारे हे व्यायाम प्रामुख्याने पायाच्या स्नायूंच्या बळकटी साठी असतात. त्यातही प्रामुख्याने खुबा आणि गुडघ्याच्या स्नायूंची बळकटी हे यांचं उद्दिष्ट असतं.

संतुलन सुधारण्यासाठी प्रॉप्रियोसेप्शन व्यायाम

या व्यायामांमुळे स्नायूंचे बळकटीकरण आणि शरीराचे संतुलन असं दुहेरी फायदा मिळतो. तोल सांभाळण्याची क्षमता सुधारते त्यामुळे पडण्याचा किंवा तोल जाण्याचा धोका कमी होतो. संभाव्य फ्रॅक्चरची शक्यता कमी होते.

स्ट्रेचिंग

स्नायूंची लवचिकता वाढवणारे व्यायाम ज्यामुळे रुग्णाची वेदनादेखील कमी होते आणि सांध्याची हालचाल सुरळीतपणे होते.
फिजिओथेरपी उपचारांचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे गरज असेल तेव्हा रुग्णाला योग्य त्या इतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. योग्य वेळी गरज असेल तेव्हा ओरथोपेडीक डॉक्टर, आहारतज्ञ यांचा सल्ला आम्ही रुग्णाना घ्यायला सांगतो.

थोडक्यात
-मेनोपॉजमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांचा स्वीकार करा
-मेनोपॉजआधी आणि दरम्यान योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या करून घ्या आणि त्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करा.
-व्यायामाला पर्याय नाही हे लक्षात घ्या आणि मनाने व्यायाम करण टाळा.
-आपल्यासाठी योग्य ते व्यायाम कोणते हे फिजिओथेरपी डॉक्टरांना भेटून समजून घ्या.
-अति व्यायाम करू नका
-स्वतःच्या मनाने आहारात बदल करू नका, आहारतज्ञ यांचा सल्ला घ्या.
-व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यामुळे मेनोपॉजमध्ये होणारा त्रास कमी होऊन, तुम्ही आत्मविश्वास पूर्ण आणि स्वावलंबी जीवन जगू शकता.

Story img Loader