मासिक पाळी किंवा पीरियड्स या विषयावर आजही उघडपणे बोलले जात नाही. अगदी पाळी आली हे सांगण्यापासून पॅड विकत घेण्यापर्यंतच्या गोष्टी दबक्या आवाजातच बोलल्या जातात. या विषयावर उघडपणे चर्चा होत नसल्याने अनेक संभ्रम निर्माण होतात. मासिक पाळीबद्दल असाच समज एक फार पूर्वीपासून चालत आला आहे आणि तो म्हणजे मासिक पाळीतील रक्त खराब किंवा अस्वच्छ असते. आजही अनेक तरुणी, महिला मासिक पाळीतील रक्त हे शरीरातील अस्वच्छ रक्त असते, असे मानतात. त्यात घरातील वृद्ध स्त्रियाही तसे मानत असल्यामुळे वयात आलेल्या मुलींनाही तेच वाटते. पण, मासिक पाळीतील रक्त खरोखर अस्वच्छ किंवा खराब असते का याविषयी आपण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मासिक पाळी म्हणजे नेमके काय?

डॉ. निखिल दातार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी जेव्हा वयामध्ये येते त्यावेळी निसर्गाने तिच्या शरीरात प्रजोत्पादन (रिप्रॉडक्शन) म्हणजे मुलाला जन्म देण्यासाठी एक सिस्टीम बनवली आहे; ज्याला आपण रि-प्रॉडक्टिव्ह सिस्टीम किंवा प्रजोत्पादनाची सिस्टीम, असे म्हणतो. त्यात युट्रस (गर्भाशय), फलोपियन ट्युब (गर्भनलिका), ओव्हरीज (अंडाशय) या गोष्टींचा समावेश होतो.

सर्वसाधारणपणे मुलगी वयात आल्यानंतर दर महिन्याला तिच्या अंडाशयातून एका वेळेला एक अंडे बाहेर पडते. हे बाहेर पडलेले अंडे नळीमध्ये जाते. यावेळी अंडे आणि शुक्राणू एकत्र आले, तर त्यातून गर्भ राहू शकतो. जर ते एकमेकांना भेटले नाहीत, तर हे फलित न झालेले अंडे गर्भाशयात येऊन पोहोचते; पण गर्भाशयात असे न फलित झालेले अंडे ठेवण्याची काही गरज नसते. कारण- त्याचा प्रजोत्पादनाच्या दृष्टीने पुन्हा तसा काही उपयोग नसतो. म्हणून हे अंडे गर्भाशयातून बाहेर टाकून देण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याच प्रक्रियेला आपण मासिक पाळी, असे म्हणतो.

थोडक्यात मासिक पाळीचा उद्देश असा की, ज्या अंड्याचे शरीरात काही काम नाही, ते शरीराबाहेर टाकून देणे आणि पुढच्या महिन्यासाठी नवीन अंड्याची निर्मिती करणे. त्यात संपूर्ण रि-प्रॉडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याचबरोबर असणारे इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रोन ही हार्मोन (संप्रेरके) त्यात काम करीत असतात. त्यामुळे गर्भाशयाच्या आतील जे आवरण असते ते आवरण बाहेर पडते आणि न फलित झालेले अंडेही बाहेर पडते; ज्यामुळे जे घडते, त्याला आपण ब्लड लॉस, असे म्हणतो. या सर्व प्रक्रियेला आपण मासिक पाळीचा रक्तस्राव, असेही म्हणतो.

म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की, मासिक पाळीदरम्यान महिलेच्या शरीराबाहेर पडणारे रक्त हे कुठल्याही वेगळ्या प्रकारचे रक्त नसते. त्याला कुठल्याही प्रकारचे दूषित रक्त म्हणण्याचे काही कारण नाही.

मग हा गैर समज कसा पसरला असावा?

पूर्वीच्या काळात जगभरात वैज्ञानिक संशोधन तितकेसे प्रगत नव्हते, त्यावेळी काही ट्रीटमेंटमध्ये जळू लावणे किंवा ब्लड लेटिंग यांसारखे उपचार केले जायचे. ब्लड लेटिंग म्हणजे कोणताही आजार झाल्यानंतर शरारीतील एक नस कापून त्यातून काहीप्रमाणात रक्त बाहेर घालवले जायचे. त्या काळी असा एक समज होता की, रक्त दूषित झाल्यामुळे मानसिक आजार, ताप आणि इतर गंभीर आजार होतात. त्यामुळे शरीरातील रक्त बाहेर काढून टाकले जायचे. त मासिक पाळीतील रक्तही दुषित असल्याचे गैरसमज तेव्हा पसरला असावा

पण, काळानुरूप या समजुतीही चुकीच्या असल्याचे सिद्ध झाले. त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचेही समोर आले. ज्याची शरीरात गरज नाही, ते बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणून मासिक पाळीची रचना आहे. त्यामुळे पाळीतील रक्त दूषित किंवा खराब असते, असे म्हणण्याला काही अर्थ नाही.

उदाहरण- तुमच्या घरात एखादे एक्स्पायर झालेले औषध आहे म्हणून ते तुम्ही टाकून देता आणि एखाद्या औषधाला बुरशी आली आहे म्हणून ते तुम्ही टाकून देता. या दोन्ही बाबींमध्ये फरक आहे. पाहिल्या केस मध्ये निरुपयोगी असल्याने आपण टाकून देऊ अणि दुसर्‍या केस मध्ये ते दूषित झाल्याने.

शरीरातल्या ज्या भागातून मासिक पाळी येते, त्यावर मूत्रनलिकेचा भाग आहे आणि त्याखाली गुदद्वाराचा भाग आहे.त्यातून मल आणि मूत्र हे शरीरातील नको असलेले टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे कार्य होते. शरीरातील हे दोन्ही भाग मासिक पाळी येण्याच्या भागाच्या पुढे-मागे असल्याने पाळीतील रक्तही मल आणि मूत्राप्रमाणे टाकाऊ असते, असा अनेकांचा गैरसमज आहे.

आणखी एक उदाहरण म्हणजे आपले मूत्र, थुंकी, लाळ, श्लेष्मल कोणा दुसऱ्याच्या अंगावर पडले, तर ते कोणाला चांगले वाटणार नाही; पण तरीही त्या गोष्टी दूषित आहेत, असे आपण समजत नाही. हा समजुतींतील फरक आहे. हे चांगले वाटणार नाही हे बरोबर आहे; पण ते दूषित किंवा खराब रक्त आहे, अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. त्यामुळे व्यक्तीच्या शरीरात जसे मूत्र, थुंकी, लाळ, श्लेष्मल आहे, त्याप्रमाणे मासिक पाळी हादेखील एका प्रक्रियेचा भाग आहे. त्याचा दूषित गोष्टीशी काहीही संबंध नाही. हा शरीरातील इतर स्रावांसारखा एक स्राव आहे; ज्याचे एक स्वतंत्र कार्य आहे. किंबहुना पाळीच्या रक्त मध्ये स्टेम सेल्स सापडतात अणि यांवर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Menstruation blood is impure a scientific take on myths facts of menstrual discharge period related myths in india sjr
Show comments