राज्यसभेत राष्ट्रीय दलाचे (आरजेडी) सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी हा काही आजार नाही, त्यामुळे या काळात भरपगारी रजा योजनेची काही गरज नसल्याचे विधान केले.
तसेच मासिक पाळी हा अडथळा नसून, महिलांना समान संधी नाकारल्या जातील अशा समस्या आपण मांडू नयेत, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यात आता स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सच्ची सहेलीच्या अध्यक्ष डॉ. सुरभी सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महिलांना मासिक पाळीदरम्यान रजा देण्याची गरज आहे का? तसेच ती देण्यामागची कारणं काय? महिलांना यादरम्यान कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते? अशा अनेक प्रश्नांची उत्तर सविस्तररित्या दिली आहेत.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिंग यांच्या मते, मासिक पाळीदरम्यान भरपगारी रजा देण्याबाबत अतिशय व्यापकपणे विचार होणे गरजेचे आहे. विशेषत: एंडोमेट्रिओसिस किंवा डिसमेनोरियाने ग्रस्त असलेल्या काही महिलांना वेदनादायी आणि शारीरिकदृष्ट्या अर्धांगवायूचा अनुभवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे याविषयातील अनेक गोष्टींवर नीट विचार झाला पाहिजे, असेही डॉ. सुरभी सिंग म्हणाल्या.
मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्ट्यांची गरज आहे का?
डॉ. सुरभी सिंग म्हणाल्या की, मासिक पाळीदरम्यान प्रत्येक स्त्रीला वेगवेगळे अनुभव येत असतात, तसेच होणारा त्रासही वेगळा असतो. बऱ्याच महिला काहीवेळ विश्रांती किंवा औषध घेऊन आपली कामं नीट करू शकतात, परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना मासिक पाळीदरम्यान अतिशय गंभीर लक्षणं जाणवतात, तर काहीवेळा रुग्णालयात दाखल करण्याचीदेखील गरज भासते. यामुळेच मासिक पाळीसंदर्भात एकसमान धोरण विकसित करणे कठीण होऊ शकते. तसेच, ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान रजेची आवश्यकता असते, अशा महिलांना वेतन कपात न करता सुट्टी घेण्याचा अधिकार द्यायला हवा.
डॉ. सुरभी सिंग पुढे म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी महिलांसाठी विश्रांती घेण्यासाठी निवास व्यवस्था केली पाहिजे. जन्म देणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु प्रसूतीनंतरच्या रक्तस्त्रावामुळे अनेक महिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे सरकार आता महिलांची हॉस्पिटलमध्येच प्रसूती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचप्रकारे मासिक पाळीदरम्यानही महिलांना विश्रांतीसाठी निवासाची व्यवस्था करायला हवी. एका गोष्टीच्या जशा चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू असतात, तोच प्रकार यातही दिसून येऊ शकतो. म्हणजे काही महिला या गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेऊ शकतात. परंतु, आपल्या देशातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वे ही देखील तत्त्वावर आधारित आहेत, त्यामुळे बहुतेक लोकांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे या सुट्ट्यांचा अनेक महिलांना फायदाच होऊ शकतो.
मासिक पाळीदरम्यान जाणवणारी गंभीर लक्षणे?
मासिक पाळीदरम्यान सर्वात सामान्य लक्षणं म्हणजे वेदना, जास्त रक्तस्त्राव, हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे एकाग्रता कमी होणे, ओटीपोट फुगणे; ज्यामुळे काम करताना अस्वस्थता जाणवू शकते, झोपेची समस्या, उलट्या आणि ताप.
पण, काही महिलांना विशेषत: ज्यांना एंडोमेट्रिओसिससारख्या समस्येने ग्रासले आहे, त्यांना तीव्र वेदना आणि चक्कर येणे अशी समस्या जाणवते.
तर एंडोमेट्रिओसिस ही अशी स्थिती आहे, जिथे गर्भाशयाच्या आतील बाजूस उती गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागते. हे सामान्यत: अंडाशय, आतडी आणि आतील अस्तरावर वाढू लागतात.
काही महिलांना मासिक पाळीच्या अगोदर डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD) ची गंभीर लक्षणं दिसून येतात. यात मूडमध्ये सतत बदल होणे अशी लक्षणे दिसतात. .
यावर फरिदाबादमधील अमृता हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा मित्तल म्हणाल्या की, मासिक पाळीदरम्यान विशिष्ट रजा देण्याबाबत माझे मत वेगळे आहे. पण, एंडोमेट्रिओसिससारख्या समस्येचा सामना करणाऱ्या स्त्रियांना वैद्यकीय रजा घेण्याची परवानगी दिली पाहिजे.
सरकारचे धोरण काय आहे?
दुसरीकडे, सरकारने अलीकडेच जारी केलेला मासिक पाळी धोरणाचा मसुदा प्रगतशील आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, महिलांना घरून काम किंवा सपोर्ट लिव्ह उपलब्ध असायल्या हव्यात, जेणेकरून त्यांच्याबरोबर कोणताही भेदभाव होणार नाही.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाला प्रतिबंध करण्यासाठी अशा व्यवस्था सर्व महिलांसाठी उपलब्ध असाव्यात यावर जोर देणे महत्त्वाचे आहे”, असे धोरण सांगते.
ट्रान्स आणि नॉन-बायनरी लोकसंख्येमध्ये मासिक पाळी मान्य करून धोरणदेखील सर्वसमावेशक केले गेले आहे. सरकार यापुढे जन औषधीसारख्या योजनेवर काम करत आहे, ज्यात अतिशय स्वस्त म्हणजे एक रुपयात पॅड विकले जात आहे.
यावर इराणी यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, त्यांचे विधान हे वैयक्तिक आहे. “आज महिला अधिकाधिक आर्थिक संधींचा पर्याय निवडत आहेत हे लक्षात घेता, मी याविषयी माझे वैयक्तिक मत मांडणार आहे, कारण मी अधिकार मंत्रालय नाही. मासिक पाळी न येणार्या व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असल्यामुळे स्त्रियांना समान संधी नाकारली जाते, अशा मुद्द्यांचा आपण प्रस्ताव ठेवू नये”, असंही जनता दल खासदार मनोज कुमार झा यांच्या प्रश्नावर उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या.