मुक्ता चैतन्य
अपेक्षित वय १३ वर्ष पूर्ण आहे, पण हल्ली मुलं वयाच्या सातच्या, आठव्या वर्षांपासून इन्स्टाग्रामवर असतात. इतक्या लहान वयात त्यांना स्वतंत्र अकाउंट सुरू करण्याची परवानगी इन्स्टाग्राम देत नाही म्हणून अनेक मुलं किंवा अनेकदा त्यांचे पालकही मुला/ मुलीचं खोटं वय टाकून इन्स्टाग्रामचं अकाउंट उघडून देतात. हे सगळं करत असताना अर्थातच ते म्हणजे मुलं आणि पालक माध्यम साक्षर नसतात आणि इतक्या लहान वयात मुलांच्या हातात सोशल मीडिया गेला तर काय होऊ शकतं याचा अंदाजही त्यांना नसतो. म्हणजे मुलांना तर नसतोच पण पालकांनाही तो लावता येत नाही हे मोठं काळजी करावी असंच आहे.
इन्स्टाग्रामचे अनेक फायदे आहेत, पण प्री- टीन आणि टीनएजर मुलामुलींचा विचार करायचा झाला तर इन्स्टाग्रामचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे स्व -प्रतिमेविषयी आणि स्व -देहाविषयी तयार होणाऱ्या समस्या. इन्स्टाग्रामचाच उल्लेख इथे एवढ्यासाठी करते आहे कारण, आताची पिढी म्हणजे जेन झी आणि जेन अल्फा फक्त इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट याच प्लॅटफॉर्म्सवर आहेत. ते फेसबुक, ट्विटरवर तितक्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे तयार होणारे प्रश्नही याच माध्यमांशी निगडित आहेत. इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप असल्याने स्व -देहाचे प्रश्न इथे अधिकच टोकदार होतात आणि त्यावर माध्यम शिक्षण आणि डिजिटल विस्डम व्यतिरिक्त उपाय शोधणं आजच्या घडीला तरी अवघड आहे.
बहुतेक सगळ्यांच्या इन्स्टाच्या वॉल्स देखण्या असतात. फोटो सुंदर असतात. ते सुंदर करण्यासाठी अनेक प्रकारचे फिल्टर्स, फोटो एडिटिंग अॅप्स यांचा वापर झालेला असतो. इन्स्टा फोटो शेअरींग अॅप असल्याने जे फोटो शेअर होतील ते परफेक्ट असले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटत असतं. पण या चढाओढीच्या वाढीच्या वयातल्या मुलामुलींच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असतो, हे अनेकदा लक्षात येत नाही. वयात येण्याच्या किंवा आलेल्या टप्प्यातल्या मुला – मुलींना चेहऱ्यावरच्या एका पिंपलमुळे आणि शरीराच्या वळणांमुळे अनेक प्रकारच्या टीकेला, टोमण्यांना, हेट -कमेंट्सना, बुलिंगला सामोरं जावं लागतं हे अनेकदा मोठ्यांच्या जगाला ठाऊक नसतं.
हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात वातप्रकोप का होतो?
तू किती जाड आहेस, तू किती बारीक आहेस, तुला बूब्ज नाहीये, तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स नाहीयेत, तुला सिक्स पॅक्स नाहीयेत, तुझी बॉडी अशीच आहे नि तशीच आहे. हे सतत मुलं एकमेकांशी आणि अनोळखी माणसं टीनेजर्सशी या स्पेसमध्ये बोलत असतात. फॅशन, मेकप, स्टायलिंग या गोष्टी इन्स्टावर सगळ्यात जास्त सर्च केल्या जातात. इन्फ्लुएन्सर्स सुंदर दिसण्याचा सतत आटोकाट प्रयत्न करत असतात. वजन आणि त्वचा हे इथले हॉट विषय आहेत. आणि या सगळ्या कलकलाटात आपली मुलं सैरभैर होत त्यांना हे जग जसं समजून घेता येईल तसं समजून घेत भटकत बसतात.
कोण कसं दिसतंय, याला मुलांच्या इन्स्टाच्या जगात प्रचंड महत्व आहे आणि त्यामुळे त्याचे मानसिक परिणामही मुलांवर आता दिसू लागले आहेत. आपण सुंदर आहोत का? आकर्षक आहोत का? एखादा पिंपल चेहऱ्यावर आला तर काय? डेटिंग करणाऱ्या मुलामुलींना पिंपल आला तर जोडीदार आपल्याशी ब्रेकअप करेल का असले प्रश्न पडतात. वजन वाढू नये यासाठी इन्स्टावरुन मिळणारे डाएट सल्ले ऐकण्याकडे आणि ते वापरात आणण्याकडे मुलामुलींचा कल वाढतो आहे. सतत सुंदर, आकर्षक दिसत राहण्याचं प्रेशर भयंकर असतं. या सगळ्या ‘बॉडी शेमिंग’ मधून मी नक्की कशी दिसायला हवी याच्या भयावह कल्पना हळूहळू तयार व्हायला सुरुवात होते. आधीच टीनएज मध्ये स्वतःविषयीचे अनेक प्रश्न मुलांच्या मनात उपस्थित होत असतात. आपण नक्की लहान की मोठे इथपासून आपल्याला काय आवडतं, आपला लैंगिक अग्रक्रम काय असे अनेक प्रश्न मनात गोंधळ माजवून द्यायला पुरेसे असताना, त्यात पुन्हा सुंदर दिसण्याच्या ताणाची भर पडते.
स्वतःच्या दिसण्याविषयी सतत नाराज किंवा त्याविषयीच्या अवाजवी कल्पनांमध्ये रमलेली पिढी या सगळ्यातून तयार होते आहे. कालपर्यंत फक्त टीव्ही आणि इतर माध्यमातील जाहिराती सौंदर्याच्या अवाजवी कल्पना मुलांपर्यंत पोचवत होत्या आता त्यात सोशल मीडियाची भर पडलेली आहे. आणि अडचण अशी आहे की सोशल मीडिया सतत बरोबर आहे. २४ तास, बारा महिने. आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियावर कुठलीच गोष्ट चटकन संपत नाही. एखाद्या मुलीला तिच्या वजनावरुन बुली करणं सुरु झालं तर तेही पुढचे अनेक दिवस सुरु राहतं. DM मधले मेसेजेस परत परत डोळ्यासमोर नाचत राहतात. बुली करणारे थांबत नाहीत. आणि या सगळ्याचा परिणाम स्व -प्रतिमा भंजनाने होतो. त्यातून आत्मविश्वास कमी होणं, निराश वाटू लागणं अशा अनेक समस्या तयार होतात. इतकंच नाही तर बॉडी डीसमॉर्फिक डिसऑर्डर बीडीडी आणि इटिंग डिसऑर्डर सारख्या समस्याही विकसित होऊ शकतात.
हेही वाचा… खोकल्यावर कफ सिरप घेताना फक्त एक्सपायरी डेट नव्हे तर ‘या’ गोष्टी तपासा; DCGI चा सावधानतेचा इशारा
गेल्या काही वर्षात झपाट्याने या सगळ्याचे प्रमाण वाढल्यावर इन्स्टाग्रामवर ‘बॉडी पॉझिटीव्ह’ चळवळही सुरु झाली आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत जे कुठलेही फिल्टर्स न वापरता फोटो शेअरिंग करतात. काही टीनएजर मुली त्यांच्या चेहऱ्यावरच्या पिंपल्सपासून अगदी बारीक अंगकाठीपर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल खुलेआम बोलायला लागल्या आहेत. नव्याने येणाऱ्या म्हणजे जेन अल्फा जनरेशनने तरी बॉडी शेमिंगमध्ये अडकू नये आणि बॉडी पॉझिटिव्हचा विचार करावा असं आता इन्स्टावर असलेल्या अनेकांना वाटू लागलं आहे. पण अर्थातच याचं प्रमाण कमीच आहे. अजूनही बहुतेक इन्स्टाग्राम स्त्री पुरुष सौंदर्याच्या अवाजवी कल्पनांनी व्यापलेले आहे.
म्हणूनच आपलं मूल वयाच्या कितव्या वर्षी इन्स्टाग्रामवर येतंय, त्याचं अकाउंट प्रायव्हेट आहे की पब्लिक, तिथे ते कुणाशी काय विषयांवर बोलतंय या सगळ्याकडे पालकांचं लक्ष असणं आवश्यक आहे. आपलं मूल सोशल मीडिया वापरतंय या आनंदात आपण मुलांना एका अंधाऱ्या गुहेत तर ढकलून देत नाहीयोत ना याकडे लक्ष ठेवायला हवंय.