मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या कॅफेमध्ये बसतो. अनेकदा एअरपोर्टवर फ्लाईटला वेळ असतो. काम करता करता आपला मोबाईल किंवा लॅपटॉपची बॅटरी संपते आणि आपण ती त्या कॅफेतल्या किंवा एअरपोर्टमधल्या किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणच्या चार्जिंग पोर्टला लावतो. आपला फोन व्यवस्थित चार्ज होतोय हे बघून आपण परत आपल्या कामाला लागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशा सार्वजनिक ठिकाणच्या चार्जिंग पोर्टमधून तुमचा फोन हॅक होऊ शकतो? यालाच म्हणतात ज्यूस जॅकिंग !

ज्यूस जॅकिंग हा शब्द २०११ मध्ये पहिल्यांदा ब्रायन कर्ब्स यांनी पहिल्यांदा वापरला होता. दुसऱ्या माणसाच्या फोनमधला सगळा डेटा त्या व्यक्तीच्या नकळत चार्जिंग पॉईंट वरुन चोरून घेण्याच्या प्रकाराला हे नाव देण्यात आलं.

आपल्याला समजतही नाही की आपला फोन हॅक झालेला आहे. अचानक बँकेच्या खात्यातून पैसे गेले किंवा तुमच्या फोन गॅलरीतला एखादा फोटो अचानक मॉर्फ होऊन व्हायरल झाला. किंवा तो मॉर्फ फोटो तुम्हालाच पाठवून पैसे उकळण्यासाठी धमक्या सुरु झाल्या की अचानक हे सगळं काय सुरु झालं हा प्रश्न पडतो आणि आपला फोन हॅक झालाय हे लक्षात येतं. पण तो कसा आणि कुठे हॅक झाला हे समजत नाही, त्यावेळी एकदा विचार करायला हवा की आपण आपला फोन कुठल्या सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगला लावला होता का?

कारण हॅकर्सच्या हातात एकदा का तुमचा डेटा गेला की ते त्याचं काय करतील हे आपल्या हातात राहत नाही. त्यामुळे काळजी घेतलेली बरी!

हे कसं घडतं?

जेव्हा आपण आपला फोन सार्वजनिक ठिकाणच्या चार्जिंग पोर्टवर चार्ज करायला लावतो तेव्हा त्या चार्जिंग पॉईंटवरुन हॅकर्स फोनमधला डेटा यूएसबी पोर्ट वापरून चोरतात. अनेकदा हे पोर्ट्स एकीकडून गॅजेट चार्ज करत असतात तर दुसरीकडून डेटा चोरत असतात. पण हे आपल्याला समजत नाही. आपल्याला फक्त फोन किंवा गॅजेट चार्ज होतानाच दिसतं. माणसांचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. त्यांच्या जाळ्यात अडकायचे नसेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

१) शक्यतो सार्वजनिक ठिकाणच्या चार्जिंग पोर्टवर फोन किंवा कुठलंही गॅजेट चार्ज करु नका. समजा चार्ज करण्याची वेळ आलीच तर फोनमधील डेटा ट्रान्स्फर करण्याचा ऑप्शन बंद करुन मग फोन चार्जिंगला लावा.

२) प्रवासात असताना किंवा घराबाहेर, ऑफिसबाहेर बराच काळ जायची वेळ येणार असेल तर पॉवर बँक जवळ बाळगा.

३) डेटा डिसेबल करणाऱ्या किंवा चार्जिंग ओन्ली कॉर्ड्स हल्ली मिळतात. तशी एखादी जवळ ठेवा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वापरायची वेळ आलीच तरी तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

४) जर तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पोर्टवर फोन लावला आणि “share data” किंवा “trust this computer” किंवा “charge only,” असे पर्याय तुमच्या फोनवर आले तर त्यातील “charge only.” हा पर्याय निवडा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental health special have you charged your phone tab at public places hldc asj
Show comments