डॉ. जाह्नवी केदारे
ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर बसलेली मुलगी आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी वाचत होती आणि खुदुखुदू हसत होती. मनात वाटले कुठल्या विनोदावर हसते आहे बरे ही? मला पाठवलाय का कुणी हा जोक? मलाही तो वाचायचा आहे आणि हसायचे आहे!
घरी पोहोचले. घरात शिरल्याशिरल्या टीव्हीवर लागलेला कॉमेडी शो पाहत बसलेला माझा मुलगा दिसला. तो खो खो हसत होता. त्याच्या हसण्याचे मला आश्चर्यच वाटले. कसे काय इतके याला हसू येते? इतके हसण्याजोगे काय आहे त्यात? मनातल्या मनात असे म्हणत स्वतःसाठी चहा केला आणि खुर्चीत स्वस्थ बसले. आदल्या दिवशी कपाटातून काढलेली काही जुनी पुस्तके शेजारी पडलेली होती. त्यातलेच हाताला लागले ते पुस्तक उचलले आणि एक पान उघडले. वाचता वाचता मला कधी हसू फुटले ते कळलेच नाही! घरी येताना पार वैतागून आले होते. सकाळपासून एक काम धड झाले नव्हते आणि त्यामुळे नुसती चिडचिड झाली होती. पण हातात विनोदी पुस्तक आले आणि वैताग, चिडचिड सारे विसरून गेले. स्वतःशीच हसत नव्या उत्साहाने स्वयंपाकाला लागले.
हेही वाचा >>>Health Special: शरद ऋतूमध्ये खारट रस प्रबळ का होतो?
हास्य आणि विनोद अशा प्रकारे आपल्याला नेहमी प्रसन्न करतात. मूल सहा आठवड्याचे झाले की पहिल्यांदा आपल्याकडे बघून हसते आणि आपल्या चेहऱ्यावरही आपोआप हसू उमटते. सकाळी सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर कोणी अनोळखी व्यक्ती जरी आपल्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, ‘सुप्रभात’, तर आपले मन प्रसन्न होते. पावसात आपली छत्री उलटी झाली की कोणीतरी आपल्याकडे बघून हसते आणि आपणही सहजच हसू लागतो. आपण भिजून चिंब झालो आहोत, हे ही आपण विसरतो!
हसणे ही क्रिया आपल्याला इतरांशी जोडते. अनोळखी व्यक्तीशी ओळख करून घेणे, नवीन ठिकाणी योग्य ती माहिती मिळवणे, आपले काम करून घेण्यासाठी लोकांचे सहकार्य मिळवणे, दुसऱ्याला धक्का लागला, कोणाची वस्तू आपल्या हातून पडली किंवा अशी काही आपल्या हातून चूक झाली तर एक ‘स्माईल’ दिले की झाले! समाजात वावरताना हास्य अशा प्रकारे एकमेकांमधला दुवा बनते.
एकत्रितपणे काम करतानाही हास्याचा खूप उपयोग होतो. खूप ताण निर्माण करणारे काम करताना काहीतरी विनोद घडतो आणि वातावरण हलकेफुलके बनते. आपोआपच ताण कमी होतो. एकमेकांना काम पूर्ण करण्यासाठी मदत करावीशी वाटते, संवाद सुधारतो, राग लोभ विसरले जातात आणि संघर्ष टळतो. ऑफिसमध्ये पूर्ण करण्याची एखादी जबाबदारी, घरातल्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी, सोसायटीमधला सार्वजनिक कार्यक्रम अशा सगळ्या ठिकाणी घडलेला एखादा विनोदी प्रसंग, कोणीतरी केलेली शाब्दिक कोटी पुढचे अनेक तास काम करण्याचे बळ देते.
हेही वाचा >>>ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ खबरदारीचे उपाय!
हसण्याने आपले शरीर शिथील (relax) होते, हृदयाचे कार्य सुधारते, वेदना कमी करण्यास मदत होते, शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. मेंदूमध्ये स्रवणाऱ्या विशिष्ट द्रव्यांमुळे हास्यविनोदाने मनात आनंद निर्माण होतो आणि अर्थातच हसण्याचा अनुभव पुनः पुनः यावा असे वाटते. मनावरचा ताण कमी करणे हे विनोदाचे खूप मोठे कार्य आहे. ताण तणावाला सामोरे जाताना आपली विनोद बुद्धी शाबूत ठेवली तर कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देणे शक्य होते.
प्रकाशची हृदयावर शस्त्रक्रिया (bypass surgery) दुसऱ्या दिवशी होती. भेटायला त्याचा जिवाभावाचा मित्र आनंद आला होता. त्याच वेळेस त्यांच्या कॉलेजमधल्या वर्गातली मैत्रीण भेटायला आली. ती गेल्यावर आनंद म्हणाला,’ अरे काय लकी आहेस रे! मुद्दाम भेटायला आली तुला! कोण आहे रे तिकडे? माझेही ऑपरेशन आहे असे सांगा रे तिला!’ झाले. गंभीर चेहरा करून बसलेली प्रकाशची बायकोसुद्धा खळखळून हसली आणि वातावरण मोकळे झाले.
बाबा जाऊन दहा दिवसच झाले होते. सगळी भावंडे एकत्र बसली होती. वेगवेगळ्या आठवणी काढून प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येत होते. त्यांच्यातली धाकटी बहीण अचानक भाषण देण्याच्या थाटात उभी राहिली आणि बाबांचे अनेक विनोदी किस्से, उदा. लोकलमध्ये झोप लागून बोरीवली ते चर्चगेट असा दोन वेळा प्रवास करणे, गप्पा मारताना दूध उतू जाणे, मित्रमंडळींवर त्यांनी केलेल्या कोट्या असे एक एक सांगू लागली. सगळे जण खो खो हसू लागले. बाबांच्या अशा स्मृती मनात घोळत राहिल्या आणि दुःख आपोआप हलके झाले.
हेही वाचा >>>Health Special: पित्ताशयातील खडे
एखादा आजार असो की कोणाचा मृत्यू, एखादी चोरीसारखी धक्कादायक घटना असो किंवा एखादे अपयश असो, कोणत्याही प्रसंगात आपली विनोद बुद्धी जागृत ठेवायला हवी. हास्य हे आनंद व्यक्त करण्याचे साधन आहे. एखादी गोष्ट आवडली की आपण हसतो. एखाद्याची कुठली कृती मनाला भावली की, सहजच चेहेऱ्यावर स्मित उमटते. कुठलीही चांगली गोष्ट साजरी करताना आपला आनंद आपल्या मोकळ्या हसण्यातून व्यक्त होतो. शाबासकीची थाप पाठीवर मारताना देखील आपल्या चेहेऱ्यावर हसू असते.
काही वेळेस मात्र विनोद एखाद्यावर टीका करण्यासाठी, चेष्टा करण्यासाठी आणि कुत्सितपणे वापरला जातो. विनोद करणाऱ्याला त्यातून कदाचित आसुरी आनंद मिळत असेल; परंतु अशा विनोदाचे लक्ष्य होणारा माणूस मात्र खजील होतो, अपमानित होतो आणि दुखावला जातो. मानासोपचारांमध्येसुद्धा विनोदाचा परिणामकारक वापर केला जातो. विशेषतः विवेकनिष्ठ मानसोपचारात एखाद्या विचारामधील अविवेकीपणा (irrational) दाखवून देण्यासाठी विनोदाचा वापर केला जातो. सामूहिक मानसोपचारमध्येसुद्धा गटातील रुग्णांमध्ये एक नाते निर्माण होते, तसेच आपले विचार आणि भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी प्राप्त होते. स्किझोफ्रेनिया, उदासीनता, अतिचिंतेचा विकार अशा विविध मानसिक विकारांच्या उपचारांमध्ये विनोदाचा वापर करून मनातील उदासपणा आणि चिंता कमी करता येते.
एकूण काय हास्यविनोद करीत जगत राहिले तर मन आणि शरीर दोन्ही स्वस्थ राहते. ‘चल, हसून टाक’ असे आपलेच आपल्याला सांगता आले की झाले!