अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात १६ वर्षांखालच्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. असा कुठलाही मीडिया जो १६ वर्षांखालील मुलांना फोटो-व्हिडीओ अपलोड करण्याची, परस्पर संवाद साधण्याची आणि सोशल मीडियाचं व्यसन निर्माण करणारी फीचर्स वापरण्याची संधी देतो तो मीडिया मुलं वापरू शकत नाहीत. ‘फ्लोरिडा बिल’नुसार असं कुठलंही प्रोफाइल जे ‘मायनर’ आहे, म्हणजे वयाची सोळा वर्षे पूर्ण झालेले नाही असे प्रोफाइल सोशल मीडिया कंपन्यांनी डिलीट केले पाहिजे. हे विधेयक मांडणारे टायलर सिरॉईस यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की वाढीच्या मुलांचा ही माध्यमे गैरफायदा घेत आहेत. वापरणाऱ्याने खिळून राहावे असेच या माध्यमाचे बिझिनेस मॉडेलच तसे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थातच यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्यात मेटाचे म्हणणे आहे की अ‍ॅप्स डाउनलोड करण्याआधी पालकांची परवानगी हे यावर उत्तर असू शकतं. त्याचबरोबर मेटाने असंही म्हटलं आहे की जर फ्लोरिडामधल्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून वंचित ठेवलं गेलं तर कदाचित योग्य माहिती, नोकऱ्या, समवयीन आणि सामाजिक कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि हा त्यांच्यासाठी मोठा तोटा असेल.

हेही वाचा – Health Special : चॉकलेटचा कुठला प्रकार तुम्हाला ठेऊ शकतो फिट?

इथे सोशल मीडियाचे वापरकर्ते म्हणून आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे सोशल मीडियाच्या बिझनेस मॉडेलचा.

काय आहे सोशल मीडिया बिझिनेस मॉडेल?

सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया किंवा कुठला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण फुकट वापरत नाही. मेटाचे निरनिराळे प्लॅटफॉर्म्स किंवा इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरण्यासाठी आपल्याकडून पैसे घेतले जात नसले तरीही आपण त्याची किंमत मोजतोच. ऑनलाईन जगात किंमत दरवेळी पैसा असेलच असं नाही. आपला डेटा, वेळ, भावनिक गुंतवणूक, त्यावरील अवलंबत्व ही सगळीच करन्सी आहे हे लक्षात घेऊया. म्हणजेच आपण कितीवेळा हे प्लॅटफॉर्म्स वापरतो यावर कंपन्यांचा फायदा तोटा अवलंबून आहे. थोडक्यात आपण पुन्हा पुन्हा या प्लॅटफॉर्म्सवर येणं अपेक्षित आहे तरच या कंपन्या चालतील आणि त्यांना नफा होईल. त्यातूनच तयार होतं व्यसनांचे मॉडेल, ज्याविषयी फ्लोरिडा बिल प्रामुख्याने नमूद करते आहे.

व्यसनांची साखळी काय आहे?

आपण परत परत आलो तरच ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नफ्याचे गणित आहे. म्हणजे इथे असं काहीतरी पाहिजे जेणेकरुन ग्राहकाला म्हणजे आपल्याला परत परत यावंसं वाटेल. त्यातूनच लाईक, लव्हसारखी बटणं निर्माण झाली आहेत. किती लाईक्स मिळाले याचा ट्रॅप जर नसेल तर आपण पुन्हा पुन्हा कशाला येऊ सोशल मीडियावर? आणि कॉमेंट्स हाही त्याचाच एक भाग आहे. चर्चा झाली तरच परत परत यावंसं वाटेल. इथे गणित प्रसिद्धीसारखं आहे. प्रसिद्धी चांगली की वाईट हे महत्वाचं नाही. ती होणं महत्वाचं. तसंच वापरणारे महत्वपूर्ण विषयांवर आणि दर्जेदार चर्चा करतायेत की एकमेकांना अर्वाच्य भाषेत ट्रोल करतायेत हे महत्वाचं नाही त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘एंगेज’ राहणं आवश्यक आहे.

हेही वाचा – तुम्हाला चाट खायला आवडते? कोणते चाट आरोग्यासाठी चांगले ते जाणून घ्या आहारतज्ज्ञांकडून….

आता हे सगळं प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत कुणालाही आक्षेपार्ह वाटण्याचे कारण नाही. कारण प्रौढ व्यक्ती जे काही करतात ते विचार करुन आणि स्वेच्छेने करतात असं आपण गृहीत धरलेलं आहे. पण हेच सगळं मुलांच्या हातात जातं तेव्हा त्यांचे विपरीत परिणाम दिसायला सुरुवात होते. सायबर बुलिंगपासून बॉडी शेमिंगपर्यंत आणि सायबर गुन्ह्यांपासून डिजिटल व्यसनापर्यंत..

सोशल मीडियाचे बिझिनेस मॉडेल आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाची साखळी मुलांना कशी व्यापून टाकते, जखडून टाकते याबाबत जाणून घेऊया पुढच्या भागात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental health special how is the model of addiction created hldc ssb
Show comments