आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात का? तर नुसते असत नाहीत, सगळीकडे खच्चून भरलेले असतात. लहानपणी अजिबात इच्छा नसताना अभ्यास करायला लागणं, आवड नसली तरी करिअर करायचं म्हणून जिथं जास्त पैसा आहे ते शिक्षण घेणं, घर घेणं आणि ईएमआय भरत राहणं, लग्न करणं, लग्नाचे सुरुवातीचे नाविन्याचे व मजेचे दिवस सरले की एकमेकांची अडचण होणं, नको असलेली कामं, जबाबदाऱ्या अंगावर पडणं, मुलांच्या व घरातल्या वृद्धांच्या नानाविध समस्यांना तोंड देणं… हे कमी की काय म्हणून नोकरी टिकवण्यासाठी, उद्योगधंदा सांभाळण्यासाठी करायला लागणाऱ्या तडजोडी, आजारपणं, दैनंदिन प्रवासाच्या, रस्त्यातील खड्ड्यांच्या, पाण्याच्या समस्येच्या, प्रदूषणाच्या… एक ना दोन असंख्य अडचणींनी आपलं आयुष्य ओथंबून भरलेलं आहे. जिथं शोधू तिथं प्रॉब्लेम दाखवता येतील असंही म्हणता येईल. त्यामुळे आयुष्यात प्रॉब्लेम असतात का, या प्रश्नाचं उत्तर ‘भरभरून असतात हो’असंच आहे, हे मान्य करायला हवं. आणि गंमत अशी आहे की, एकदा हे मान्य केलं की मग त्याची उत्तरं शोधायला सुरुवात करता येते. प्रॉब्लेम आहे हे एकदा कळलं की प्रॉब्लेम कुणाचा आहे, आपला की दुसऱ्याचा? आपला की सरकारचा? आपला की जगाचा? हे कळायला लागतं.
या आधीच्या भागात आपण उपभोग विलंबन किंवा delaying gratification म्हणजे काय ते बघितलं. या भागात आपण ‘जबाबदारीचा स्वीकार’ हे तत्त्व समजून घेऊया. एक गृहिणी होती, जी आपला मुलगा अभ्यासच कसा करत नाही, सतत खेळात कसा रमलेला असतो, कुणाचंही ऐकत नाही, क्लास लावला तर नेमानं क्लासला जात नाही, कितीही मारलं तरी निगरगट्टासारखं वागतो, हल्ली हल्ली तर मार खायलाही घाबरत नाही, निर्ढावलाय, लक्षणं काही ठीक दिसत नाहीत… अशा प्रकारच्या तक्रारी करत होती. तुम्हीही आजुबाजूला पाहिलंत तर अशा अनेक माऊली वा वडील दिसतील जे आपल्या चिरंजीवांपुढे हतबल झालेले असतात. या सगळ्याच्या मुळाशी गेलं तर अनेक प्रकरणात दिसतं, की मुलाला शाळेत घातलं (ते ही आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे मराठी वा इंग्रजी माध्यम), त्याला क्लास लावले, वह्या पुस्तकं आणि अभ्यासाला जे जे लागतं ते आणून दिलं की यापुढची अभ्यासात निपुण होऊन पहिला नंबर आणण्याची जबाबदारी मुलाचीच असते असं मानून सगळे पालक मोकळे होतात.
हेही वाचा… Mental Health Special: आयुष्य म्हणजे त्रासच, पण सुटका शक्य आहे!
मुलाचा केवळ अभ्यासच नाही, तर त्याचं एकूण व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी तन, मन व धन तिन्ही वर्षानुवर्षे खर्च करणं ही आपलीच जबाबदारी आहे, हे अनेकदा पालकांच्या लक्षातही आलेलं नसतं. जबाबदार पालक, मुलांना केवळ सोयीसुविधा देत नाहीत, तर त्यांना क्वालिटी टाइम किंवा दर्जात्मक वेळ देतात. त्यांच्या लहान-मोठ्या प्रत्येक समस्या, स्वत:च्या समस्या असल्याचं मानतात आणि त्या सोडवण्यासाठी मुलांबरोबरच गुंतून जातात. मुलांच्या समस्या या केवळ मुलांच्या समस्या राहिल्या नाहीत, त्या मुलांबरोबरच पालकांच्या समस्या झाल्या की मुलांचीही समस्येकडे पाहण्याची दृष्टी बदलते. पालक जबाबदारी घेताना दिसत असतील, तर कळत-नकळत मुलांच्या मनावरही त्याचा परिणाम होत जातो की जबाबदारी स्वीकारणं, त्रास स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे. पालकच जर समस्येपासून पळत असतील, तर नकळत मुलांच्याही मनावर समस्येपासून पळणं बिंबतं.
अशी जबाबदारी कोण घेतं, कोण टाळतं हे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधूनही दिसतं. तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर लक्षात येईल की एकदा प्रवासाला जायचं ठरल्यानंतर…. उदाहरण द्यायचं झालं तर, मुंबईवरून पुण्याला जायचं ठरलं असेल तर, अनेक लोक ते ठरल्यावरही काहीच करत नाही. काही लोक लगेच, कुठल्या गाड्या आहेत, आपल्याला कधी पोहोचायचंय, ऑनलाइन तिकिट काढायचं की स्टेशनला जाऊन काढायचं… असा सारासार विचार करून तिकीट आरक्षित करून मोकळे होतात. तर अनेक जण काढू की, घाई काय आहे… अजून बरेच दिवस हातात आहेत, असं म्हणत चालढकल करतात. नंतर गळ्याशी येतं तेव्हा तत्काळमध्ये काढू… ते ही मिळालं नाही तर चार्ट प्रिपेअर झाल्यावर, शिल्लक जागा कळतात तेव्हा काढू. ते ही नाही मिळालं मग, टीसीला पैसे दिले की तिकिट मिळतं असं करत करत शेवटी अव्वाच्यासव्वा पैसे मोजत वा धक्के खात प्रवास करतात. आणि प्रवास संपल्यावर भारतातल्या प्रचंड गर्दीला, रेल्वेच्या गैरव्यवस्थापनाला, भारतातल्या अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या नावानं लाखोली वाहतात. त्यांचे अनेक मुद्दे बरोबर असतात, चुकीचे असतात अशातला भाग नाही, पण खूप वेळा मुख्य प्रॉब्लेम या गृहस्थाचाच असतो. वाहतुकीचे प्रचंड प्रॉब्लेम असतानाही हजारो लोक रिझर्व्हेशन करून त्याच अपुऱ्या पायाभूत सुविधांचा फायदा घेत सुखाने प्रवास करतात, पण काही व्यक्ती या आनंदाला मुकतात.
हेही वाचा… Delaying Gratification: सुदृढ मनासाठी अत्यावश्यक तत्त्व, तुम्ही वापरता का?
तर, आपल्या प्रॉब्लेम्सची जबाबदारी आपली आहे, याची जाणीव होणं आणि ती एकदा झाल्यावर मग या समस्येचं निराकारण करण्याच्या मार्गाला लागणं, असं ‘जबाबदारीचा स्वीकार’ हे बघायला गेलं तर साधं-सोपं पण तरीही अनेकांना पचनी न पडलेलं तत्त्व आहे. आपण आधी उपभोग विलंबन तत्त्व बघितलं. म्हणजे नंतर मिळणाऱ्या मोठ्या सुखासाठी, आत्ता थोडा वेळ दु:ख किंवा त्रास सहन करणं. तर हे तत्त्व अंगी न बाणवलेल्या व्यक्तींचा या जबाबदारीचा स्वीकार न करण्याशी संबंध आहे. वरचंच रिझर्व्हेशनचं उदाहरण बघितलं, तर नंतरचा काही त्रासांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आत्ता काही मिनिटं त्रास भोगण्याचा कंटाळा, ‘आपला प्रवास, आपली जबाबदारी’चा स्वीकार करण्याच्या आड येतो.
घरचं बक्कळ असल्यानं पैशाची ददात नसलेल्या व काहीही कामधाम नसलेला एक चाळिशीतील तरुण मद्याच्या आहारी गेला होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची दोनदा वेळ आली होती. बाहेर आल्यावर पुन्हा हा तरूण दैनंदिन कामाचा भाग असल्यागत पुन्हा मद्याच्या आहारी गेला. त्याला विचारलं की रोज सकाळ- संध्याकाळ दारू प्यायची काय गरज आहे? तुझ्या तब्येतीला झेपत नाही, उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, घरच्यांचे हाल होतात. काय गरज आहे इतकी दारू पिण्याची. त्याचं उत्तर होतं, मग काय करू? वेळच जात नाही… म्हटलं सिनेमे-नाटकं बघ. तर म्हणतो, त्यात काय दर्जा राहिलेला नाही. सगळे हाणामारीचे सिनेमे आणि थिल्लर नाटकं असतात. चांगल्या दोन तीन नाटकांची नावं त्याला सांगितली, म्हटलं चांगली आहेत की नाटकं, थिल्लर नाहीत, बघितलीस का? ती असतील कदाचित, पण अपवादानंच. बाकी सगळी थिल्लरच असतात. म्हटलं ठीक आहे मग लायब्ररी का नाही लावत, चांगली पुस्तकं वाच. तर म्हणतो, वाचण्यासारखी पुस्तकं हल्ली लिहिली कुठं जातात. मग वेगवेगळ्या विषयातल्या अनेक पुस्तकांची नावं सांगितल्यावर तो म्हणाला, खरंतर मला वाचायचा कंटाळा आहे. एका जागी बसून वाचणं मला शक्य नाही. म्हटलं ठीक मग जिम किंवा क्लब लाव. व्यायाम, पोहणं, सायकलिंग, बॅडमिंटन अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यावर त्याचं उत्तर तयार होतं, की आता व्यायाम करायचं माझं वय आहे का? वीस वर्षांचा असताना जायचो मी जिममध्ये. म्हटलं ठीक मग बागेमध्ये जात जा, फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत समुद्रापासून ते म्युझियमपर्यंत… तिथं जात जा, वेळही जाईल, नी काही नवीन ओळखी होतील, शिकायला मिळेल. त्यावर त्याचं उत्तर होतं, सगळीकडे इतकी गर्दी असते की अंगावर काटा येतो. म्हटलं ज्या बारमध्ये जातोस तिथं गर्दी नसते का? यावरही त्याचं उत्तर तयार होतं, की आपण आपला ग्लास घेऊन बसलं की गर्दीचा काही त्रास होत नाही.
थोडक्यात, अति दारू पिणं हा आपला प्रॉब्लेम आहे, हेच तो मान्य करायला तयार नाही. त्याला बाकी सगळ्या ठिकाणी असंख्य प्रॉब्लेम दिसत होते, आणि त्या प्रॉब्लेम्समुळे आपल्याला दारू पिण्याखेरीज कुठलाही पर्याय राहिलेला नाही, अशी मनाची सोयीस्कर पण ठाम समजून त्यानं करून घेतली होती. आपल्या वेळेचं चांगलं नियोजन, आपल्या तब्येतीची चांगली काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, हेच त्याला मान्य नव्हतं.
तर, जबाबदारीचा स्वीकार हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे. ते प्रत्येकानं अंगी बाणवायलाच हवं असं आहे. त्याचा अभाव अनेक मानसिक समस्या निर्माण करतो, ज्याची फळं आयुष्यात भोगायला लागतात. ‘जबाबदारीचा स्वीकार’ या तत्त्वाशी निगडीत न्युरॉसिस व कॅरेक्टर डिसऑर्डर या दोन मनोवस्था आहेत, ज्यांच्या बद्दल जाणून घेऊ, पुढच्या भागात.
contact@loksatta.com