मुक्ता चैतन्य- समाज माध्यम अभ्यासक
करोना महासाथ आली आणि आपल्यापैकी प्रत्येकाचं जगणं बदलून गेलं. करोनाने संपूर्ण जग थांबवून टाकलं होतं त्याचप्रमाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ऑनलाईन जगण्यास भागही पाडलं. शाळा, कॉलेज, वेगवेगळे क्लासेस, ऑफिसेस सगळंच ऑनलाईन झालं. माणसं घरात आणि स्क्रीनसमोर डांबली गेली. तुमची इच्छा असो नसो, आपण सगळेच ऑनलाईन जगात अडकून गेलो. सतत स्क्रीन समोर असल्याचे फायदे तोटे सगळ्याच वयोगटातल्या माणसांनी अनुभवले. पण लॉकडाऊनच्या या दोन वर्षांच्या कालावधीत ज्या मुलांनी पौगंडावस्थेत पाऊल टाकलं त्यांची गोची सगळ्यात जास्त झाली.
या मुलांना ‘लॉकडाऊन टीन्स’ म्हणू शकतो आपण. म्हणजे अशी मुलं जी ‘लॉकडाऊन’च्या काळात वयात आली, मोठी झाली. ही मुलं करोना आला तेव्हा सातवीत होती आणि करोनाची भीती पूर्णपणे जाऊन आयुष्य सुरळीत झालं तेव्हा दहावीत गेलेली होती. मधली दोन वर्ष शाळा, क्लास सगळंच ऑनलाईन जगत होती. आता ही परिस्थिती बाकी मुलांची नव्हती का? होतीच! मग याच मुलांबद्दल का आपण बोलतोय? याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पौगंडावस्थेत पाऊल ठेवल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या वेळी जगाची दारं खुली व्हायला सुरुवात होते, मुलं स्वतःला शोधायला लागतात, आपण कोण आहोत, आपण लहान आहोत की मोठे झालो आहोत, आपला लैंगिक अग्रक्रम काय आहे, कोण आवडतंय कोण नाही, आपल्या सभोवतालचं आणि जगाचं ‘निराळं’ भान यायच्या वयात ही मुलं घरात अडकून पडली. त्यांच्या आधीच्या पिढीला निदान एखादं ‘ऑफलाईन’ वर्ष स्वतःला शोधायला मिळालं होतं, मागून येणाऱ्या पिढीलाही ते मिळणार आहे. पण सातवीतून डायरेक्ट दहावीत गेलेल्या मुलांना ते मिळालं नाही.
हेही वाचा… प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी काय करावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
म्हणजे बघा, या मुलांकडे करोना महासाथ सुरु होऊन लॉकडाऊन लागेपर्यंत मोबाईल नव्हते. असले तरी ही सहावी सातवीत असलेली मुलं/मुली शाळा, क्लासेस, खेळ या सगळ्यातून वेळ मिळाला की मग फोनवर जाणारी होती. मग लॉकडाऊन आलं. आणि जग ऑनलाईन झालं. शाळा, शालेय अभ्यासाचे क्लासेस इथपासून चित्रकलेचे, नाचाचे इतकं कशाला फुटबॉल आणि स्विमिंग शिकवणारे क्लासेस ही ऑनलाईन झाले. ऐन टीनएजमध्ये शिरलेली मुलं, पूर्णवेळ घरात बसून, शरीरात-मनात होणारे निरनिराळे बदल, त्यातून निर्माण होणारे प्रश्न-समस्या-शंका आणि या सगळ्यांबरोबर हातात पूर्णवेळ मोबाईल आणि त्यात इंटरनेट. हे किती ‘डेंजरस कॉकटेल’ आहे. हे असलं खतरनाक कॉम्बिनेशन असल्यावर जे होऊ शकतं तेच या ‘लॉकडाऊन टीनएजर्स’चं झालं आहे. त्यांचा नुसता स्क्रीनटाईम जास्त आहे अशातला भाग नाही, त्यांच्या आयुष्यातला बराचसा भाग हा ऑनलाईन जगानेच व्यापलेला आहे.
हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात काय खावे? काय टाळावे?
या मिश्रणातून जे काही घडू शकतं ते आता गेल्या सहा आठ महिन्यात समोर येऊ लागलं आहे. सहावी- सातवीत शेवटची शाळेत गेलेली मुलं जेव्हा एकदम नववी संपताना आणि दहावीत शाळेच्या आवारात शिरली तेव्हा त्याच्या मना मेंदूत काय काय होऊ शकतं, काय काय होऊन गेलेलं असू शकतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मोबाईलचा कुठल्याही मार्गदर्शनाशिवायचा अमर्याद वापर, माध्यम शिक्षण नाही, ‘डिजिटल वेलनेस’चा विचार नाही अशा परिस्थितीत दोन वर्ष काढलेल्या आणि परत शाळेत जाताना मूल म्हणून नाही तर टिनेजर्स म्हणून गेलेल्या मुलांचे आणि मुलींचे प्रश्न जटील आहेत. या मुलांचं मनोरंजन, प्रेम, डेटिंग, भांडणं सगळं ऑनलाईन आहे. त्यातली अनेक जण त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ऑनलाईन जगातच शोधतात. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मोठ्यांना विचारण्याच्या भानगडीत ते पडत नाहीयेत.
हेही वाचा… किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल व रक्तातील साखर योग्य प्रमाणात राहते? तज्ज्ञांचं उत्तर वाचा
या लॉकडाऊन टिनेजर्सना समजून घेण्याची, त्यांचे प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. सायबर बुलिंग का करायचं नाही, सायबर जगातले शिकारी कसे ओळखायचे, आभासी जगातले धोके काय आणि कोणते आहेत, डिजिटल वेलनेसचा विचार का करायला हवा आहे इथपासून त्यांच्या वर्तणुकीत झालेले बदल यांची जाणीव त्यांना करुन द्यावी लागणार आहे. हायब्रीड आयुष्य जगणं म्हणजे नेमकं काय हे नीट समजावून सांगावं लागणार आहे.
करोना होता तेव्हा काळजी शाळा-कॉलेज ऑनलाईन झाली याची नव्हती तर, माध्यम अशिक्षितपणातून जे प्रश्न शाळा-कॉलेज परत ऑफलाईन सुरु झाल्यावर येणार आहेत त्याची होती. करोना काळात ज्या ऑनलाईन जगण्याच्या सवयी लागल्या त्यांची होती आणि आहे. हे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत, किचकिट आहेत. आपल्या टीन्ससाठी, जेन झीसाठी समाज म्हणून हे प्रश्न आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे सोडवावे लागणार आहेत.