डॉ. जाह्नवी केदारे

दिवाळी जवळ आली. आता रस्ते फुलून जातील. रंगीबेरंगी आकाश कंदील, वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या, रांगोळ्या, दिव्यांच्या माळा, फटाके यांनी बाजार भरून जाईल. दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडेल. घरोघरी साफसफाई, काही नवीन खरेदी अशी लगबग सुरू होईल. फराळाच्या पदार्थांची रेलचेल होईल. नुसती अशी सगळी कल्पना केली तरी मन आनंदित होते! आपल्याकडे श्रावण महिना सुरू झाला की सणांचे दिवस सुरू होतात. आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी परंपरा, रूढी पाळण्याचा तो महिना असतो. तिथून मग सगळे उत्सव सुरू होतात.

p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार

गणपती, नवरात्र, दसरा करता करता दिवाळी कधी येते ते समजतही नाही. सण हे घरोघरी साजरे होणारे, तर उत्सवांना एक सामूहिक रूप असते. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांचे वातावरण महिना पंधरा दिवस आधीच सुरू होते आणि गल्लीतले, आळीतले, मंडळातले सगळे जण उत्साहाने सजावट, आरास, कार्यक्रम यांच्या तयारीला लागतात. घरच्या सणांच्या तयारीमध्येही लहान मोठे सगळेच सामील होतात. ‘दरवर्षीप्रमाणे’.. असे म्हणत पाळायच्या अनेक पद्धती मनोभावे पाळल्या जातात. घराची साफसफाई, सजावट, रंगरंगोटी, पूजेची तयारी, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई, या सगळ्याची नुसती धांदल होते. शाळा कॉलेजेस, ऑफिसेस सर्वत्र वातावरणात एक उत्साह निर्माण होतो. नवरात्रातल्या ठरवलेल्या विविध रंगांच्या पेहरावांमधून तो व्यक्त होतो. सुट्टीचेही वेध लागतात.गजबजलेली बाजारपेठ, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल, सामाजिक चहलपहल अशा सगळ्या गोष्टी सण उत्सवांमध्ये होतात. त्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येतो.

हेही वाचा >>> मधुमेही व्यक्तीने धावू नये का? धावण्यामुळे गुडघ्यांचे नुकसान होते का? काय मिथक आणि काय तथ्य, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

हल्ली उत्सव म्हटले की गर्दी, खेचाखेच असतेच. खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विकले जातात. फटाके, मोठे माईक या सगळ्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांची चर्चा तर सर्वत्र होतेच. यातून पचन, श्वसन संस्थेचे विकार बळावतात. दरवर्षी उत्सवांच्या काळात आरोग्यविषयक सूचनांना उधाण येते. यात मानसिक आरोग्याविषयी आपण कधीच चर्चा करत नाही, परंतु सण- उत्सव यांचा आपल्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम होतो. थोडा चांगला तर थोडा वाईट!

सण आणि उत्सव मनात आनंद निर्माण करतात. घरातल्या घरातसुद्धा सणांची तयारी सगळे एकत्र मिळून करतात. सामूहिकतेचा उत्तम अनुभव यातून मिळतो. मनावरचा ताण आपोआप कमी होतो. आपापसात गप्पा होतात, विचारांची, भावनांची देवाणघेवाण होते आणि मन मोकळे होते. सगळे नातेवाईक एकत्र जमतात. नातेसंबंध दृढ होतात आणि आपल्या मागे असलेल्या भक्कम मानसिक आधाराची जाणीव होऊन मन निर्धास्त होतं. मन आशादायी होते. 

सण म्हणजे देवदेवतांची पूजाअर्चा! मनोभावे केलेली पूजा, मनःपूर्वक केलेली प्रार्थना यातून मनाला समाधान प्राप्त होते. सश्रद्ध व्यक्तीला प्रार्थनेतून मनोबल प्राप्त होते आणि संकटांना सामोरे जायची शक्ती मिळते. जो श्रद्धाळू नाही त्यालासुद्धा स्वतःशी संवाद करण्याची संधी मिळते, मनःशांती लाभते. सगळ्यांनी मिळून केलेल्या आरतीमधूनही आनंद मिळतो. आपण समूहाचा भाग आहोत ही भावना मनाला आधार देते, तसेच स्वतःला ओळखही (identity) प्राप्त करून देते. त्यामुळेच उत्सव संपताना वाईट वाटते, पण पुढच्या वर्षीची अशाही मनात निर्माण होते. म्हणूनच ‘गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणेने आपण बाप्पाला निरोप देतो. नवीन उत्साहाने कामाला लागण्याची प्रेरणा उत्सवातून मिळते.

हेही वाचा >>> ८ महिन्यांच्या गरोदर टीव्ही अभिनेत्रीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू! गरोदरपणात धोका का वाढतो व काय काळजी घ्यावी?

मानसिक आरोग्य जतन करताना सण उत्सवांचा असा उपयोग होतो, हे जाणून त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. रुग्णालयात रक्षाबंधन, दसरा, दिवाळी असे सण रुग्णांसाठी  आवर्जून साजरे केले जातात. मनोरुग्णांना यामुळे समाजात मिसळण्याची संधी मिळते. एकत्रितपणे सण साजरे केले की सामूहिकतेचा अनुभव मिळतो. यातून नवीन नाती, मैत्री जुळते आणि मनोविकारातून बरे होण्याच्या मार्गावर पुढचे पाऊल टाकण्यास मदत होते. पुनर्वसनाच्या अनेक प्रयत्नांमध्ये समाजात सरमिसळ होणे हा महत्त्वाचा टप्पा असतो.

सण उत्सवांचे असलेले धार्मिक आणि अध्यात्मिक स्थान आपत्तीनंतरच्या काळात लोकांमध्ये मनोबल वाढवते. एकत्रितपणे साजरे केलेल्या उत्सवांमधूनही आपण सारे मिळून संकटांना सामोरे जाऊया असा धीर एकमेकांना देण्याचे बळ येते. तसेच आपले आयुष्य पुनः एकदा सुरळीत सुरू झाले आहे असेही यातून वाटते. भूकंप, त्सुनामी, पूर अशा अनेक प्रकारच्या आपत्तीनंतर मनोसामाजिक उपचारांचा भाग म्हणूनही उत्सव साजरे करण्यावर भर दिला गेला आहे. १९९३च्या किल्लारीच्या भूकंपानंतर, २००४मध्ये झालेल्या त्सुनामीनंतर असे अनेक प्रयत्न यशस्वीपणे राबवले गेले.

कोणताही सण म्हटला की त्याचा मानसिक ताण असतो. होणारा खर्च, करावे लागणारे कष्ट, सततची धावपळ याचा मनावर चांगलाच ताण जाणवतो. ऑफिसचे काम, मुलांच्या परीक्षा, कधी कधी घरातली आजारपणे हे सगळे बाजूला ठेवून सणांची तयारी करावी लागते, त्याचा आर्थिक भार सोसावा लागतो. आपली स्थिती चांगली नाही म्हणून एखद्या वेळेस कमी खर्च करायचे ठरवले तर ’लोक काय म्हणतील?’ असे दडपण येते. अशा अनेक गोष्टींमुळे कधी कधी सण उत्सावासारख्या आनंददायी घटनेनेसुद्धा अतिचिंता निर्माण होते. झोप लागत नाही, भूक मंदावते. मनात आनंदच निर्माण होत नाही. माणसांची गर्दी, अवेळी झोपणे, अतिश्रम या सगळ्याचा परिणाम होऊन आधीपासून असलेले मानसिक विकार बळावण्याची शक्यता असते. उदा. स्किझोफ्रेनियासारखा आजार असलेल्या रुग्णाला उत्सवात सामील व्हावेसे वाटले तर होऊ द्यावे. अन्यथा त्याला त्याचा त्रास होऊ शकतो. भीती वाटू शकते, मनातला संशय वाढू शकतो.

हेही वाचा >>> Health Special: दिवाळीचा फराळ कोणत्या तेलात करावा?

सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अनेक दिवस जागरण केले तर मेनियासारखा विकार डोके वर काढू शकतो. ध्वनिप्रदूषणाचा आणि गर्दीचाही परिणाम होतो, चिडचिड वाढते, वृत्तीतली आक्रमकता वाढते. काही जण तर परिसरातले आवाज टाळण्यासाठी बाहेर गावी निघून जातात. भारतीय समाजात सण उत्सवांचे फार महत्त्व आहे. वैयक्तिक आणि सामूहिक पद्धतीने ते साजरे करण्यातून आपण सारे नेहमीच आनंद मिळवत आलो आहोत. आपली नाती दृढ करून, मनःशक्ती वाढवून वर्षभरातल्या विचिध प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळही प्राप्त करत आलो आहोत. मानसिक स्वास्थ्य म्हणजे मनोविकारांचे परिणामकारक उपाय, मनोरुग्णांचे पुनर्वसन आणि त्या बरोबरच मनःस्वास्थ्य वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न! सण उत्सवांचा सुद्धा यासाठी पुरेपूर उपयोग करून तेच करण्याची आवश्यकता आहे.