‘मी इतकं कमी खातोय – तरीही माझं वजन हलत नाहीये आणि आताशा थकवा येऊ लागलाय’. मोजून ८०० कॅलरीज आहेत माझ्या डाएटमध्ये- प्रितेश काहीसा वैतागून सांगत होता. गेल्या वर्षी मी सुरुवात केली होती तेव्हा १८०० कॅलरीज खाऊन वजन कमी झालं होत आणि फ्रेश वाटायचं. नंतर माझं मी कमी कॅलरीज म्हणून ६०० पर्यंत नेलं डाएट. आणि तेव्हाही कमी झालं वजन पण मला आताशा सगळे आजारी आहेस का? असंच विचारतायत. केस पण गळतायत.
‘८०० कॅलरीज मध्ये थकवा येणारच’, मी विचारलं. प्रितेश म्हणाला, ‘पण मी एकदम क्लीन आणि पोषक खातोय. म्हणजे जसा ८०किलोच्या वेळी होतं तसं नाही अगदी पण जेव्हा भूक लागेल तेव्हाच खातोय’.
कॅलरीज फक्त नंबर म्हणून ८००. कमीच असेल अॅक्च्युअली. प्रितेश कॅलरीजच्या आणि पोषक आहाराच्या गणितात थोडा अडकलेला वाटला.
नियमित मैदानी खेळ खेळणारा आणि धावायला जाणारा प्रितेश गेल्या २ वर्षात ८० वरून थेट ६० किलो वजनावर आला होता.
सुरुवातीपासूनच कॅलरीज आणि त्याचं वेगळे सख्य होतं. आणि आता मात्र कॅलरीजचं गणित चुकत होतं.
वजन आणि कॅलरीज याचा विचार करताना चयापचय क्रिया, पचन, रक्ताभिसरण, ऊर्जेचा शरीरात होणारा वापर हे सगळंच महत्वाचं असतं. त्यातून शरीराला पूरक वजन असताना अतिरिक्त कॅलरी कमी करणं हे कुपोषणाचं कारण होऊ शकतं. प्रितेशचं नेमकं हेच झालं होतं.
आहारनियमन करताना कॅलरीज सर्वप्रथम विचारात घेतल्या जातात. कॅलरीज म्हटलं की आता अंदाजे १८०० ते २००० इतकं तर सगळ्यांनाच माहीत असतं. अलीकडेच कॅलरीजचा हा अंदाज आशियाई वर्गासाठी १५०० ते १८०० इतका करण्यात आला आहे. याचं मुख्य कारण सरासरी बैठं काम करणाऱ्यांची वाढलेली संख्या !
आपल्या शरीराला श्वास घेण्यासाठी, रक्ताभिसरणासाठी देखील काळजीची आवश्यकता असते त्यामुळे आहारातील कॅलरीजच्या क्षमतेचा विचार करताना त्यातील सूक्ष्म घटकांचा आणि मुख्य अन्न घटकांचा विचार होणे आवश्यक ठरते. खरंतर कॅलरी या संकल्पनेचा उगम १९०० सालापासून झाला आणि हळूहळू पदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचं एकक म्हणून कॅलरीजचा वापर होऊ लागला.
आयुर्वेदामध्ये प्राण या नावाने कॅलरीचा उल्लेख केलेला आढळतो. प्राण म्हणजे ऊर्जाच नव्हे तर त्या पदार्थामधून शरीराला मिळणारी सूक्ष्मपोषक तत्त्वे आणि इतर घटक.
अनेक जण कॅलरीचा विचार करताना मी एवढाच व्यायाम करतो त्यामुळे एवढेच कॅलरीज बर्न करतो (मराठीत जाळतो किंवा उपयोग करतो ) त्यामुळे माझ्या आहारात अमुक अमुक कॅलरी पाहिजेत असा समज असतो. जे कॅलरीजचं गणित सोपं करण्यासाठी उपयोगी आहेच. मात्र या कॅलरीज कशापासून मिळणार याचा विचार करणं जास्त सोयीचं आहे.
हेही वाचा >>>आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ७ पदार्थ? बद्धकोष्ठतेचा त्रास पुन्हा होणार नाही!
आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण
शरीरातील स्नायूंचे प्रमाण
आपल्या भुकेची वेळ आणि प्रमाण
आपल्याला मिळणारी झोप
आपल्या काम करण्याची वेळ
व्यायामाची वेळ आणि प्रकार
या सगळ्याचा विचार होणं आवश्यक आहे.
यातील मुख्य घटकांचा विचार करता कर्बोदकांपासून (प्रत्येकी १ ग्राम पासून )४ कॅलरीज , प्रथिने (प्रत्येकी १ ग्राम पासून ) ४, स्निग्ध पदार्थ (प्रत्येकी १ ग्राम पासून ) ९ कॅलरीज अशा प्रमाणात आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मात्र ज्या पदार्थांपासून हे अन्न घटक आपल्याला मिळतात त्यावर होणाऱ्या प्रक्रियेमुळे ही ऊर्जा बदलू शकते. शिवाय या ऊर्जेचे रूपांतर खाद्य पदार्थात होत असताना त्यातील पोषक तत्वांचा आणि मूळ ऊर्जेचा ऱ्हास देखील होऊ शकतो.
अनेकदा एम्प्टी कॅलरीज म्हणून लेबल असणाऱ्या अशा अनेक पदार्थांमधून शरीराचे कुपोषण होण्याची संभावना असते. त्यामुळे कॅलरीजचे गणित उलगडताना त्यातील पोषकतत्त्वं विसरायला नकोत.
कॅलरी आणि त्यासंबंधी इतर घटकांविषयी पुढच्या भागात जाणून घेऊ.