पावसाळ्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्वचा तेलकट असेल तर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. केवळ चेहऱ्यावरील त्वचा नव्हे, तर संपूर्ण शरीरावरील त्वचेची पावसाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते. मेट्रो हॉस्पिटल्स आणि हार्ट इन्स्टिट्यूट, नोएडाचे सल्लागार डॉ. शाझिया झैदी यांनी सर्वांनी पावसाळ्यात त्वचेची काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मान्सूनचे आगमन होताच उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळतो. तथापि, पावसासह येणारी आर्द्रता आणि ओलसरपणा आपल्या त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. सर्व वयोगटातील लोकांना निरोगी आणि चमकदार त्वचा राखण्यासाठी पावसाळ्यात योग्य त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मेट्रो हॉस्पिटल्स आणि हार्ट इन्स्टिट्यूट, नोएडाचे सल्लागार डॉ. शाझिया झैदी यांनी केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.

त्वचा स्वच्छ ठेवणे

पावसाळ्यात अतिरिक्त तेल, घाण आणि घाम जमा होत असतो. यासाठी त्वचेची वारंवार स्वच्छता करणे आवश्यक असते. यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य क्लीन्सर वापरा आणि दिवसातून किमान दोनदा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुण्यासाठी साबणाचा किंवा रासायनिक घटक असणाऱ्या फेसवॉशचा वापर करू नका.

सौम्य स्क्रबचा वापर करावा

त्वचा एक्सफोलिएट करावी, असे डॉक्टर सांगतात. त्वचा एक्सफोलिएट करणे म्हणजे त्वचेवरील घाण, धूळ, काढून टाकणे. त्वचेवरती मृत पेशींचाही थर जमा झालेला असतो. या थरामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते. यासाठी आठवड्यातून दोन वेळा सौम्य स्क्रबचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. स्क्रब करताना त्वचेला मसाज केल्यामुळे त्याभागातील रक्तपुरवठाही व्यवस्थित होतो. एक्सफोलिएट केल्यावर मॉश्चरायझर नक्की वापरावा.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करणे

पावसाळ्यात सूर्य कुठे असतो, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. परंतु, ढगाळ हवासुद्धा त्वचेवर परिणाम करते. एसपीएफ ३० असणारे सनस्क्रीन लोशन वापरणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात येणारे ऊन हे अधिक तीव्र असते.

बुरशीपासून त्वचेला दूर ठेवा

पावसाळ्यात आर्द्रता वाढते. आर्द्रता, ओलसरपणा त्वचेवर बुरशी आणण्यास कारण ठरतो. तसेच त्वचेवर, केसांमध्ये बुरशी किंवा बॅक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या काळात ‘जॉईंटस’ म्हणजे जिथे दोन अवयव जोडले जातात, त्यातील मधला भाग, सांध्यांचा भाग यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते. पायाची बोटे ही लवकर संसर्गास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या जागा कोरड्या ठेवाव्यात. अंघोळीनंतर अँटीफंगल क्रीम किंवा पावडर लावावी.

टिश्यू पेपरचा वापर करावा

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्वचेचा तेलकटपणा हा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे पिंपल्स, लहान फोड येऊ शकतात. यासाठी त्वचा कोरडी ठेवणे आवश्यक आहे. याकरिता टिश्यूचा वापर करावा.

सतत चेहऱ्याला स्पर्श करू नये

अनेकांना चेहऱ्याला सतत हात लावण्याची सवय असते. आपले हात अनेक गोष्टींना स्पर्श करत असतात. त्यामुळे तेथील जंतू चेहऱ्याला लागण्याची शक्यता असते. बॅक्टेरिया चेहऱ्यावर सहज पसरू शकतात. तसेच ऍलर्जीही चेहऱ्यावर येऊ शकते, त्यामुळे निर्जंतुक केल्यावरच हात चेहऱ्याला लावावेत.
त्वचेची काळजी घेण्यासाठीच्या या काही मूलभूत गोष्टी आहेत. तरीही त्वचेचे काही विकार उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon and skin diseases these remedies can keep your skin healthy vvk
Show comments