Monstrous Bodybuilder Lllia Yefimchyk Dies Of Heart Attack : जगप्रसिद्ध बेलारशियन बॉडीबिल्डर इलिया गोलेम येफिमचिक याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो अवघा ३६ वर्षांचा होता. शरीराच्या भारदस्त आकारामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात तो प्रचंड लोकप्रिय होता. यासाठी त्याला ‘वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस बॉडीबिल्डर’ही पदवीदेखील मिळाली होती. सोशल मीडियावरही त्याचे लाखो फॉलोवर्स होते. तो जिममधील फोटोदेखील अनेकदा शेअर करायचा. इलिया ‘गोलेम’ येफिमचिक याला ‘340lbs बीस्ट’, ‘द म्युटंट’ म्हणूनही ओळखले जात होते.
येफिमचिक दिवसातून सात वेळा जेवायचा. अशाप्रकारे तो दिवसाला जवळपास १६,५०० कॅलरीजचे अन्नपदार्थ खायचा, ज्यात सुशीचे १०८ तुकडे आणि २.५ किलोग्रॅम स्टेक समावेश होता. तो दररोज ६०० पौंड बेंच प्रेस आणि ७०० पौंड डेडलिफ्ट करायचा. इलिया येफिमचिक ६ फूट १ इंच उंच होता. त्याचे वजन ३४० पौंड (सुमारे १५४.२२१ किलो) होते. त्याची छाती ६१ इंच होती, तर बायसेप्स २५ इंच होती. कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि व्यायामाचे मानसशास्त्र आणि पोषण यांचे योग्य आकलन, यामुळे तो स्वत:ला इतका मजबूत बनवू शकला.
Dailystar.co.uk च्या रिपोर्टनुसार, येफिमचिकला ६ सप्टेंबर रोजी राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. रुग्णवाहिका येईपर्यंत त्याची पत्नी सीपीआर करत राहिली, त्याला एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, हृदयविकाराचा झटका आल्याने तो कोमात गेला, पण काहीवेळाने त्याचे हृदय पुन्हा धडधडू लागले. पण, सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. कारण तो ब्रेन डेड झाला होता. ११ सप्टेंबर रोजी त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली. या दु:खद घटनेनंतर त्याची पत्नी ॲनाने लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, बॉडीबिल्डर इलिया गोलेमच्या मृत्यूनंतर आता लोक जिम, प्रोटीन याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच बॉडीबिल्डर गोलेमच्या आहाराबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच विषयावर बंगळुरूच्या नगरभवीमधील फोर्टिस हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ, भारती कुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
आहारतज्ज्ञ भारती कुमार यांच्या मते, बॉडीबिल्डर इलिया गोलेमच्या खाण्याच्या पद्धतीमुळे शरीरात अत्यंत तणाव निर्माण होतो. आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
एकाचवेळी अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
१) एकाचवेळी सर्वाधिक कॅलरी सेवन केल्यामुळे वजन वेगाने वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा, इन्सुलिन रेसिस्टेंट आणि टाइप २ मधुमेह होऊ शकतो.
२) पचन संस्थेवर दबाव येतो, ज्यामुळे पोट फुगणे, अस्वस्थता आणि गॅस्ट्रिक समस्या निर्माण होतात. अशावेळी जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.
३) यकृत आणि मूत्रपिंडावर तणाव येतो, ज्यामुळे अवयवांचे नुकसान होते आणि रोगाचा धोका वाढतो.
४) हृदयाला कठोर परिश्रम करावे लागतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक होण्याची शक्यता असते.
५) पोषक असंतुलन आणि कमतरता उद्भवू शकतात, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि न्यूरोलॉजिकल डॅमेजपर्यंत अनेक लक्षणे उद्भवतात.
आहारतज्ज्ञ भारती कुमार पुढे म्हणाल्या की, एवढ्या अधिक प्रमाणात अन्न खाल्ल्याने खाण्यासंबंधित विकार, मानसिक आरोग्य समस्या आणि सामाजिक अलगाव होऊ शकतो. जर खाण्याची ही पद्धत चालू राहिली तर व्यक्तीचे आयुष्य कमी होते आणि त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीरपणे परिणाम करू शकते.
डॉ. कुमार यांच्या म्हणण्यानुसार,अशा परिस्थितीत वैद्यकीय मदत घेणे आणि संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.