आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करावा. अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगले असतात; ज्यात शेवग्याच्या शेंगांचादेखील समावेश आहे. अनेकजण शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शेवगा आरोग्यासाठी अमृत मानला जातो. शेवग्याच्या शेंगाचा उपयोग अधिकतर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये केला जातो. शेवग्याच्या झाडाच्या प्रत्येक भागात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असल्याने त्याझाडाची पाने, फुले, मुळ आणि झाडावर येणाऱ्या शेंगा इत्यादी सर्वांचा खाण्यामध्ये समावेश केला जातो.
शेवग्याची पाने, ज्याला ड्रमस्टिक पाने म्हणून ओळखली जातात. शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही तर याच्या पानांचा देखील भाजीसाठी वापर केला जातो. शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पाने ही अतिशय आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. शेवग्याला ड्रमस्टिक असे संबोधले जाते.
ड्रमस्टिकच्या उच्च पौष्टिक मूल्यामुळेच ते सुपरफूड मानले गेले आहे. नाश्ता करताना ड्रमस्टिक किंवा शेवग्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे पेय जेवणासोबत किंवा नंतर घेतल्यास ते पचनास मदत करते, असे मानले जाते. ड्रमस्टिक किंवा शेवग्याचे पाणी सुपरफूड का मानले जाते, शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते का, याच विषयावर हैदराबाद येथील पोषणतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
(हे ही वाचा : महिलांमध्ये वाढतोय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; तुम्हाला दरवर्षी टेस्ट करणे गरजेचे आहे का? डाॅक्टरांनी दिलं उत्तर )
डॉ. रोहिणी पाटील सांगतात, “शेवग्याचे पाणी हे आवश्यक पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या खनिजांसह जीवनसत्त्वे यांचे समृद्ध मिश्रण आहे. शेवग्याच्या शेंगांचा वापर अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. सर्दी-खोकला, घश्यातील खवखव आणि छातीत कफ झाल्यावर शेवग्याचा वापर करणे फायदेशीर असते. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून किंवा शेंगा उकळून याचा वापर करु शकता. यासोबतच तुम्ही हे पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून हे पाणी पिऊ शकता, त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.”
“शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. ड्रमस्टिक सूप संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते. त्याच्या पानातही अनेक गुणधर्म आढळतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ड्रमस्टिकच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल तर चहाऐवजी शेवग्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायला सुरुवात करावी.
शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग खूप फायदेशीर ठरते. या शेवग्याच्या शेंगा, साल आणि पानामध्ये मधुमेहाला प्रतिबंधित करणारे गुणधर्म आहेत. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते,” असेही त्या सांगतात. फक्त शेवग्याच्या शेंगाची ताजी पाने किंवा शेंगाचा पावडर पाण्यात घाला, ते भिजू द्या आणि गाळून घ्या. हा एक हायड्रेटिंग पेय म्हणून त्याचा आनंद घ्या. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात, म्हणून शेवग्याचे पाणी सुपरफूड मानले जाते, असेही त्या नमुद करतात.