Perfect Time To Walk, Morning or Evening: तुम्हाला माहीत आहे का, जगभरात सर्वाधिक लोकसंख्येकडून नवीन वर्षाला ठरवली जाणारी एक गोष्ट म्हणजे पुढील वर्षात वजन कमी करायचं, योग्य आहार घ्यायचा व जीवनशैलीत बदल करायचे. काही जण हा संकल्प एक- दोन दिवस पाळतात, तर काहींचा संयम एक दोन आठवडे, महिने टिकतो. अगदी निवडक मंडळी हा निरोगी आरोग्याचा संकल्प वर्षभर पाळतात. अनेकांचे संकल्प पहिल्या दुसऱ्या दिवशी तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण अगदी जोशात सुरुवात करतो आणि मग त्यामुळेच स्वतःला दमवून टाकतो. याउलट जर आपण साधी- सोपी सुरुवात केली तर तुमचे प्रयत्न अधिक दिवस टिकून राहू शकतात. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर धावायला लागण्याआधी आपण चालायला हवं. खरंतर मंडळी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे असेही म्हटले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर आपण चालण्याची वेळ योग्य निवडली तर त्याचा आणखी फायदा होऊ शकतो. नेमकं सकाळच्या वेळी चालावं की संध्याकाळी हा प्रश्न अनेक वर्षे वादात आहे आज आपण तज्ज्ञांकडून या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मितेन ककैय्या , फिटनेस प्रशिक्षक आणि संस्थापक, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग(उच्च-तीव्रता मध्यांतर प्रशिक्षण) (HIIT) ही दीर्घकालीन आरोग्याची गुरुकिल्ली असू शकत नाही. तुमच्या दिनचर्येत ताण न घेता व्यायामाची सवय जर आपण समाविष्ट केली तर तुम्ही आनंदाने व जोमाने व्यायाम करू शकता. त्यामुळे अमुकच वेळी चालावं असा नियम करणे कदाचित प्रत्येकाला साजेसे असणार नाही. त्याचे फायदे कमी अधिक फरकाने वेगेवेगळे असू शकतात पण हा नियम करणे उपयुक्त ठरेलच असे नाही.

ककैय्या सांगतात की, सकाळची हवा असो किंवा संध्याकाळचा शांत वारा तुमच्या चालण्याची दिवसाची वेळ तुमच्या आयुष्याला पूरक असली पाहिजे, गुंतागुंतीची नाही. व्यायाम किंवा आरोग्यादायी पथ्यांचा ताण घेणे हे तुमच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम करू शकते, शरीराशी असणारं नातं सुदृढ ठेवायचं असेल तर तुमच्या रुटीनमधील योग्य वेळ तुम्ही स्वतः ओळखावी.

कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीजचे तंदुरुस्ती आणि आरोग्य प्रमुख, डॉ कार्तियायिनी यांनी स्पष्ट केले. शक्य असेल तेव्हा, अनवाणी चालणे निवडावे. यामुळे वृद्ध व लहान मुलांमध्ये संवेदना सक्रिय होतात. शरीराची कमान व पोश्चर नीट विकसित होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. अनवाणी चालल्याने पायातील गुरुत्वाकर्षण सेन्सर ऍक्टिव्ह होऊन संतुलित वाढीस प्रोत्साहन देतात.

डॉ कार्तियायिनी यांच्या मते, आपले शरीर सर्केडियन रिदमनुसार कार्य करते, दुपारी २. ३० नंतर कोणत्याही हालचालीसाठी स्नायूंची अधिक ताकद आवश्यक असते. तेव्हा आपले शरीर सर्वोत्तम समन्वयात असते व उत्तम प्रतिसाद देते. तर, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद सर्वाधिक असते. त्यामुळे आपले शरीर संध्याकाळी चालण्यासाठी अधिक सक्षम असते. पण अन्य महत्त्वाची बाब अशी की संध्याकाळच्या वेळी हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण अधिक असू शकते. त्या तुलनेने रात्रीच्या वेळी प्रदूषित हवा स्थिरावते व पहाटे प्रदूषणाचे प्रमाण त्यामुळेच कमी असते. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता, सकाळी चालणे हे अधिक फायदेशीर असू शकते.

सकाळ विरुद्ध संध्याकाळचा गोंधळ दूर जाण्यासाठी, ककैय्या यांनी चालण्याला दिवसभर करावी अशी एक क्रिया म्हणून सुचवले. यामुळे आपण सातत्याने कॅलरी बर्न करून वजन अधिक प्रभावीपणे नियंत्रणात ठेवू शकतो. दिवसभर चालायचे म्हणजे तुम्ही कधी चालता यापेक्षा किती चालता याला महत्त्व द्यायचे, दिवसभरात पूर्ण केलेल्या स्टेप्सची संख्या मोजून धोका कमी करता येतो.

चालताना ‘हे’ दोन निकष विसरू नका!

डॉ कार्तियायिनी सांगतात की, दरम्यान, चालण्याच्या बाबत वय हा एक महत्त्वाचा निकष आहे, वयानुरूप होणारे आजार हे चालण्यावर बंधने आणू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याला उच्च रक्तदाब (बीपी) असल्यास, पहाटेच्या वेळेस बीपीमध्ये शारीरिक वाढ होते, त्यामुळे व्यक्तीने खूप लवकर चालू नये, विशेषत: जर त्यांचे बीपी नियंत्रित होत नसेल तर थोडे उशिराने चालणे निवडावे.

हे ही वाचा<< भाजलेले चणे रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञांनी सांगितले फायदे, तोटे, खाण्याची योग्य पद्धत व प्रमाण

हिवाळ्यात, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सकाळी लवकर फिरणे टाळावे. जेव्हा हवामान खूप थंड नसते तेव्हाच वृद्ध लोकांनी बाहेर पडावे. त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशाचा फायदा होण्यासाठी सकाळी ८ नंतर मॉर्निंग वॉक सुरू करणे चांगले. ‘ड’ जीवनसत्त्वाचा सर्वाधिक फायदेशीर डोस मिळविण्यासाठी संध्याकाळी ४.०० ते ४.३० वाजेच्या सुमारास चालणे निवडावे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning or evening perfect time to walk that will help you loose weight control blood pressure and blood sugar steps count svs
Show comments