आपण आजारी पडलो की, सगळ्यात आधी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर गोळ्या किंवा द्रव स्वरूपातील औषधे आपल्याला लिहून देतात. आपल्यातील बऱ्याच जणांना गोळ्या घेण्याचा कंटाळा येतो. कारण- अनेकदा आकाराने मोठ्या गोळ्या घशात अडकतात. म्हणूनच आपण डॉक्टरांना कफ सिरप किंवा द्रव औषधे देण्याची शिफारस करतो. गोळ्यांच्या तुलनेत द्रव स्वरूपातील औषधे अनेकांसाठी सोईस्कर ठरतात. ती गोळ्यांच्या तुलनेत चवीला चांगली असतात आणि त्यांचे सेवन करणेही अगदीच सोपे असते. द्रव स्वरूपातील ही औषधे घेताना बाटलीसोबत येणारा मापाचा कप किंवा लहान मुलांसाठी ड्रॉपरसुद्धा असते. त्यामुळे तोंडावाटे औषध पोटात जाऊन, जलद कार्य करण्यास सुरुवात करते.
पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, घरातील आई किंवा वृद्ध माणसे द्रवरूप औषधे किंवा बाटलीमधील पातळ औषधाचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नये, असा सल्ला देतात. तर यामागील नेमके कारण काय? द्रवरूप औषधांच्या सेवनानंतर पाणी प्यावे की नाही याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
तर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील स्वाहिता आयुर्वेद क्लिनिकच्या संस्थापक डॉक्टर मनीषा मिश्रा गोस्वामी, पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर शुची शर्मा व नोएडाच्या न्यूबर्ग डायग्नोस्टिक लॅबच्या प्रमुख डॉक्टर विज्ञान मिश्रा यांच्याशी चर्चा केली. द्रवरूप औषध किंवा कफ सिरप घेतल्यानंतर पाणी प्यावे का यावर डॉक्टरांनी त्यांची मते मांडली आहेत.
डॉक्टर मनीषा मिश्रा म्हणतात की, सुका खोकला आणि ओला खोकला या आरोग्य समस्यांवर कफ सिरपमधील मेन्थॉल तात्पुरता आराम देते. पण, हे सिरप थेट घशावर काम करीत नाही, तर त्याऐवजी ते श्वसनसंस्थेवर कार्य करते. तर स्वीट लोझेंज (Sweet lozenges) दीर्घकाळ चघळल्यास लगेच आराम देतात. सिरप एकदा पचल्यानंतर पाण्याचे सेवन त्यांच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम करत नाही. त्यामुळे कफ सिरप किंवा स्वीट लोझेंज घेतल्यानंतर पाणी पिणे उत्तम आहे, असे डॉक्टर म्हणतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या वरच्या गोष्टी सर्व द्रव औषधांनाही लागू होतात. कारण- गोळ्यांच्या तुलनेत द्रव स्वरूपातील औषधे सहज, रुचकर व जलद शोषणासाठी ओळखली जातात.
त्याबद्दल आहारतज्ज्ञ डॉक्टर शुची शर्मा यांनी याबद्दल त्यांचे मत सांगितले आहे. द्रवरूप औषधे किंवा कफ सिरपनंतर पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित असते. कारण- ते फुप्फुसातील श्लेष्मा किंवा कफ काढून टाकण्यास मदत करते. कफ सिरपमध्ये कफ पाडणारे ‘ग्वाईफेनेसिन’ (Guaifenesin) असते; ज्यामुळे घशातील श्लेष्मा काढून टाकण्यासाठी पुरेशा द्रवरूप औषधाचे सेवन प्रभावी ठरते. विशेषतः औषधांच्या गोळ्या गिळण्यात अडचणी असलेल्या रुग्णांसाठी द्रवरूप औषधे फायदेशीर असतात.
याबद्दल डॉक्टर विज्ञान मिश्रा यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कफ सिरप किंवा द्रवरूप औषधे घेतल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये, असे त्यांनी सांगितले आहे. कारण- या औषधांमध्ये अनेकदा घशावर कंट्रोल, चिडचिड शांत करणे व सक्रिय घटकांची प्रभावीता वाढविणाऱ्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे लगेच पाणी प्यायल्याने हे फायदेशीर आवरण जागेच निघून जाईल; ज्यामुळे औषधाची कार्यक्षमता कमी होते. त्यांनी कोणतेही द्रवरूप औषध प्यायल्यानंतर किमान १५ मिनिटे ते अर्धा तास प्रतीक्षा करण्याची शिफारस केली आहे. काही मिनिटांच्या प्रतीक्षेमुळे औषध पूर्णपणे शोषले जाण्यास मदत होते ; असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.