“ तू मला हेल्दी खायला सांगितलंस कि मला त्रास झालाच समज. फळ खायचं म्हणून मी रोज मला पचत नाही तरी सफरचंद खातेय “ प्रियाला पचनाचा त्रास होत होता आणि स्वाभाविकच तिचा सूर तक्रारीचा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ पण पचत नाही म्हणजे काय होतं ?” इति मी.

“ मला सफरचंद खाल्लं कि खूप गॅसेस होतात. पोट बिघडतच. मी म्हणते, सफरचंद माझं पोट साफ कर आणि माझं पोट मला म्हणतं – बाई मला माफ कर “ तिच्या त्या तक्रारी सुरातलं यमक जाणवून आम्हा दोघींनाही हसू आलं.

सफरचंद या फळाचा तंदुरुस्तीशी सहज संदर्भ लावला जातो . त्याला “an apple a day keeps doctor away” ही प्रचलित असणारी म्हण देखील कारणीभूत आहे.

अलीकडेच जागतिक सफरचंद दिवस साजरा झाला त्यानिमित्ताने या बहुगुणी, सगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध असणाऱ्या फळाबद्दल!

सफरचंद म्हणलं की काश्मिरी लाल , गोड खरपूस चवीचं फळ आपल्या डोळ्यासमोर येतं.

हेही वाचा… Health Special: शरद ऋतूमध्ये पित्तप्रकोप का होतो?

सफरचंदामध्ये तंतूमय पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे ज्यांना आतड्याचे विकार आहे पचनाचे विकार आहेत त्यांना सफरचंद गुणकारी आहे. मात्र सफरचंदामध्ये असणाऱ्या सॉर्बिटॉल साखरेमुळे काही लोकांना गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

सफरचंदामधील आणखी एक महत्वाचे पोषणमूल्य म्हणजे त्यातील हरितके ( फायटोकेमिकल्स ) क्वारसेटिन , कॅटचिन , क्लोरोजनिक आम्ल, अँथोसायनिन! या फ्लॅव्होनॉइड्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पेशींचे आरोग्य सुधारते . विविध प्रकारचे कॅन्सर आणि आतड्याच्या विकारांपासून दार राहण्यासाठी हे पोषणमूल्य मदत करतात.

शरीराला आवश्यक ऊर्जा पुरविणे , माफक शर्करेचा परिणाम शरीरावर करणे यासारख्या गुणांमुळे सफरचंद गुणकारी फळांमधील महत्वाचे फळ आहे.

बाजारात विविध प्रकारची सफरचंदं उपलब्ध आहेत. सफरचंदाचा गोडवा आणि आकार यामुळे सफरचंदापासून बनविले जाणारे विविध पदार्थ देखील भारतीय आहारात आणि पाश्चात्त्य पाकशास्त्रात महत्वाचे आहेत. भारतातील बऱ्याच भागात सफरचंद संपूर्ण फळ म्हणून खाल्ले जाते. पाश्चात्य देशांमध्ये बेकरी पदार्थांमध्ये सफरचंदाचा वापर केला जातो.त्यासाठी लालसर पिवळ्या रंगाचे सफरचंद वापरले जाते. बेकरी पदार्थ तयार करताना वापरले जाणारे सफरचंद चवीने नेहमीच्या सफरचंदाच्या प्रजातीपेक्षा जास्त गोड असते.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बदललेल्या जीवनशैलीचा आजार ‘थायरॉइड’

सफरचंद निवडताना त्यावर असणारे केमिकल्स, खतं याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. बाजारातून आणलेले कोणतेही फळ स्वच्छ धुवून घेणे हा त्यातील महत्त्वाचा भाग. ऑर्गनिक पद्धतीने उगविले जाणारे सफरचंद देखील स्वछ धुवूनच त्याचा खाण्यासाठी वापर करावा. अनेक जण सफरचंदाच्या स्वच्छतेसाठी त्याचे साल काढून टाकतात. मात्र या सालीत तंतुमय पदार्थ सर्वाधिक असतात. त्यामुळे सफरचंद स्वच्छ धुवून घेणे ही उत्तम प्रक्रिया आहे.

दाताचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सफरचंद उपयुक्त फळ आहे . मधुमेहाचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा मधुमेह रोखण्यासाठी सफरचंद अत्यंत गुणकारी आहे. एका संशोधनात असेदेखील आढळून आले आहे की अनेक लोकांच्या आहारात सफरचंदाचा समावेश शून्य असतो. अनावश्यक कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी क्वारसेटिन अत्यंत उपयुक्त असते. सफरचंदामधील क्वारसेटिनचे मुबलक प्रमाण कोलेस्ट्रॉलच्या आरोग्यदायी प्रमाणाला कारणीभूत ठरू शकते. सफरचंदापासून तयार केले जाणारे ऍपल सीडार पोटाच्या विकारांसाठी अत्यंत उपयुक्त असते.

मुतखड्याचा त्रास होताना यकृत अनेकदा कोलेस्ट्रॉल सोबत मुतखड्याचे प्रमाण वाढविते. अशावेळी आहारातील तंतुमय पदार्थ वाढविण्याचा सल्ला दिला जातो . मात्र सफरचंदाच्या नियमित सेवनाने हा त्रास होणे टाळले जाऊ शकते.

सफरचंद भूक शमविणारे समग्रतेने संतुलन राखणारे आणि शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित करणारे फळ आहे. यातील पोटॅशिअम रक्तप्रवाह आणि रक्तदाब दोघांसाठी अत्यावश्यक आणि उपयुक्त आहे. अनेक शोधाअंती असे आढळून आले आहे की नियमित सफरचंदाचे सेवन करणाऱ्या वृद्धांमध्ये पार्किन्सन्स , स्मृतिभ्रंश यासारखे आजार होत नाहीत. असे बहुगुणी आणि सहज आहारात समाविष्ट करता येणारं फळ तुम्ही तुमच्या आहारात कधी समाविष्ट करताय ?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multi purpose apple with benefits of health hldc dvr
Show comments