मुंबईत एकीकडे साथीच्या आजारांनी हात पाय पसरले दुसरीकडे आता झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका ७९ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चेंबूरच्या आसपासच्या भागात असलेल्या एम-वेस्ट वॉर्डमध्ये हा रुग्ण आढळून आल्याची माहिती मुंबई महापालिकेनेही दिली आहे. या रुग्णाला १९ जुलैपासून ताप, नाक चोंदणे व खोकला आदी लक्षणे जाणवत होती; पण उपचारानंतर तो बरा झाला आहे. त्याला २ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आता पालिकेने त्याच्या सहवासात आलेल्यांची तपासणी केली, मात्र इतर कोणताही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. पण, यामुळे पुन्हा एकदा झिका विषाणू म्हणजे काय? तो कसा पसरतो? त्याची लक्षणे, त्यावरील उपचारपद्धत नेमकी काय आहे? जाणून घेऊ …
झिका विषाणू हा डासांपासून पसरतो; जो १९४७ मध्ये युगांडाच्या झिका जंगलात प्रथम ओळखला गेला होता. तो अनेक वर्षे तुलनेने तितकासा घातक नव्हता; परंतु २०१५ मध्ये अमेरिकेनंतर विशेषतः ब्राझीलमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला आणि त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले. झिका विषाणूची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दोष निर्माण होऊ शकते. मायक्रोसेफॅली ह एक दुर्मीळ जन्मदोष आहे; ज्यामध्ये बाळाचे डोके अपेक्षेपेक्षा लहान असते. हा दोष मेंदूच्या विकासाच्या समस्यांशी संबंधित असू शकतो.
झिका विषाणूचा कसा होतो फैलाव?
झिका विषाणू प्रामुख्याने एडिस डासांच्या चाव्याद्वारे पसरतो; विशेषतः एडिस इजिप्ती व एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चावण्याद्वारे तो मानवामध्ये प्रसारित होतो. त्याशिवाय झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध, रक्तसंक्रमण आणि गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान संक्रमित आईपासून तिच्या बाळामध्ये पसरू शकतो.
काय आहेत लक्षणे?
झिका विषाणूची लागण झालेल्या बर्याच लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तसेच जेव्हा लक्षणे आढळतात, तेव्हा ती बहुतांशी सौम्य स्वरूपाची असतात. पण यात ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी व डोळे लाल होणे या लक्षणांचा समावेश होतो. झिका विषाणूची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दोन ते सात दिवसांनी दिसतात; जी अनेक दिवस ते एक आठवड्यापर्यंत टिकू शकतात.
काय आहे गुंतागुंत?
झिका विषाणूचा संसर्ग सामान्यतः सौम्य असला तरी गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाल्यास बाळामध्ये ‘मायक्रोसेफली’सारखे जन्मजात दोष, तसेच इतर न्यूरॉलॉजिकल विकार होऊ शकतात. त्यामुळे गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा धोका वाढतो; जो एक दुर्मीळ आजार आहे. या आजारात स्नायू कमकुवत होतात आणि अर्धांगवायू होऊ शकतो.
काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?
१) झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांपासून स्वत:चे संरक्षण करा. त्यामध्ये डास प्रतिबंधक क्रीम वापरा किंवा लांब हातांचे कपडे घाला आणि वातानुकूलित किंवा उजेड असलेल्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा.
२) गर्भवती स्त्रिया किंवा गरोदर होण्याची योजना आखत असलेल्या महिलांनी झिका विषाणूचा संसर्ग वाढणाऱ्या भागात जाणे टाळावे.
३) या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा.
४) रक्ततपासणी व चाचणीद्वारे तुम्ही संक्रमणाचा धोका टाळू शकता.
झिका विषाणू संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाहीत; पण यावर विश्रांती घेणे, हायड्रेट राहणे हाच उपाय आहे. सामान्यत: लक्षणे असलेल्यांसाठी याची शिफारस केली जाते. ज्या गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली असेल, त्यांच्या बाळामध्ये कोणतेही जन्मदोष नाहीत ना हे शोधण्यासाठी त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते.