देशातल्या आयटी क्षेत्रातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती हे त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांबरोबर बेधडक विधानांमुळेही नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपाशी राहण्यासंदर्भात एक अनुभव शेअर केले. ५० वर्षांपूर्वी युरोपमध्ये हिचहायकिंग करताना ते जवळपास १२० तास उपाशी राहिले होते; ज्याचा अनुभव त्यांनी शेअर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…म्हणून नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी

नारायण मूर्ती म्हणाले की, तुमच्यापैकी अनेकांना उपाशी राहण्याचा जितका अनुभव नसेल तितका मला आहे. ५० वर्षांपूर्वी जेव्हा मी युरोपातील बल्गेरिया (तेव्हा युगोस्लाव्हिया आणि आजचे सर्बिया)मधील सीमेवर असलेल्या निश नावाच्या ठिकाणी हिचहायकिंग करताना मी १२० तास उपाशी होतो. काही न खाता हा प्रवास सुरू होता.

‘अचिव्हमेंट्स इन फूड सिक्युरिटी : इंडियाज स्ट्राइड्स टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या सत्राला संबोधित करताना त्यांनी हा अनुभव शेअर केला. पण, अशा प्रकारे एखादी व्यक्ती उपाशी राहिली, तर त्याचे तिच्या शरीरावर काय परिणाम होतात? याबाबत आपण डॉक्टरांचे मत जाणून घेऊ….

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल यांनी सांगितले की, पाच दिवसांपेक्षा जास्त किंवा १०० तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहिल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

जर एखादी व्यक्ती केवळ पाणी पीत राहिली; पण अन्न खात नसेल, तर तिचे शरीर ऊर्जा मिळविण्यासाठी ऊतींचा वापर करण्यास सुरुवात करते. जेव्हा शरीरातून फॅटी अॅसिडचे प्रमाण घटते तेव्हा शरीर प्रोटीनवर काम सुरू ठेवते. पण, आठवडाभर उपाशी राहिलेल्या व्यक्तीचे शरीर शेवटी प्रोटीन मिळविण्यासाठी सक्रियपणे स्नायूंच्या उतींचे विघटन करण्यास सुरुवात करते, असे पुण्यातील बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलचे सल्लागार व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ. प्रसाद भाटे म्हणाले.

खूप दिवसांपासून उपाशी असलेल्या व्यक्तीचा मेंदू केटोन बॉडीज वापरण्यास सुरुवात करतो, हे केटोन, जे चरबीच्या विघटनाने तयार होतात. मेंदू केटोन्सवर कार्य करू शकतो; परंतु ते ग्लुकोजइतके कार्यक्षम नाही. पण, मेंदू दीर्घकाळ केटोनवर अवलंबून असेल, तर मेंदूचे स्नायू कमजोर होऊ शकतात, असे दिल्लीतील पीतमपुरा येथील मधुबन डायट क्लिनिकचे आहार सल्लागार निमिषा जैन यांनी सांगितले.

डॉ. जैन पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत चयापचय, वाढ व तणावाचे नियमन करणाऱ्या संप्रेरकांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, शरीर तणाव संप्रेरक कॉर्टिसॉलचे अधिक उत्पादन तयार करते; ज्यामुळे स्नायूंचे नुकसान होते आणि चरबीचा संचय होऊ लागतो. पण, खूप दिवस उपाशी राहिल्याने नैराश्य, चिंता, चिडचिडेपणा वाढण्यासह मूड बदलू शकतो. त्यामुळे मेंदूची कार्यपद्धती बिघडू शकते.

त्यावर डॉ. सिंघवाल यांनी एखादी व्यक्ती उपाशी राहिल्यास तिच्या शरीरात काय परिणाम होतात हे समजून सांगितले आहे.

खूप दिवस उपाशी राहिल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

१)पौष्टिक घटकांची कमतरता

खूप दिवस उपाशी राहिल्यास शरीरास आवश्यक पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होते, जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने, कर्बोदकांमध्ये व चरबी यांसारख्या मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ शकते. अवयवांचे कार्य बिघडू शकते आणि संपूर्ण शरीराची आरोग्य यंत्रणा विस्कळित होऊ शकते, असे डॉ. सिंघवाल म्हणाले.

२) अशक्तपणा

शरीरास पुरेसे अन्न न मिळाल्याने शरीर ऊर्जा मिळविण्यासाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन करण्यास सुरुवात करते. त्यामुळे स्नायू कमजोर होऊ लागतात. परिणामी अशक्तपणा, थकवा आणि शारीरिक कार्य करताना अडचणी येतात, असे डॉ. सिंघवाल म्हणाले.

३) चयापचय क्रियेत बिघाड

दीर्घकाळ उपाशी राहिल्याने शरीरातील चयापचय क्रियेत बिघाड होऊ शकतो; ज्यात शरीरात ऊर्जा वाचविण्यासाठी चयापचय क्रिया मंदावते. डॉ. सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, उपाशी राहण्यामुळे वजन कमी होण्यासह आणि दीर्घकाळपर्यंत स्नायूंचे प्रमाण राखणे कठीण होऊ शकते.

४) इलेक्ट्रोलाइट असंतुलन

खूप दिवस उपाशी राहिल्यास शरीरातील सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे कार्य असंतुलित होते. सिंघवाल यांनी नमूद केले की, यामुळे चक्कर येणे, हृदयाचे अनियमित ठोके व स्नायूंमध्ये पेटके यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

५) अवयवांचे नुकसान

दीर्घकाळ उपाशी राहिल्याने हृदय, यकृत व मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर ताण येतो. सिंघवाल म्हणाले की, कालांतराने यामुळे अवयवांचे नुकसान होऊ शकते आणि आरोग्याला त्रास होण्याचा धोका वाढू शकतो.

६) मानसिक आणि भावनिक प्रभाव

डॉ. सिंघवाल यांच्या मते, उपाशी राहिल्याने मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो; ज्यामध्ये मूड बदलणे, चिडचिड, नैराश्य व लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.

एकंदरीत, उपाशी राहिल्याने शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात; जे टाळले पाहिजे. संतुलित आहार राखण्यासह दीर्घकाळ अन्नाची कमतरता जाणवत असल्यास वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे, असे डॉ. सिंघवाल म्हणाले.