Natasa Stankovic Opens Up About Being Judged After Divorce : नताशा स्टॅन्कोविक ही एक सर्बियन मॉडेल, अभिनेत्री व नृत्यांगना आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून तिने २०१२ मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याबरोबर आधी लग्न आणि त्यानंतर घटस्फोटामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. गेल्या वर्षी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिने सांगितले होते की, लोकांच्या जजमेंटचा इतरांवर कसा सहज परिणाम होऊ शकतो. विशेषत: त्यांना संपूर्ण गोष्टीविषयीची माहिती नसते आणि तरीसुद्धा ते मत व्यक्त करतात.
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट झाल्याचे सांगत तिने काही वेळानंतर हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती पुढे सांगते की, माणूस म्हणून आपण खूप जास्त सहानुभूती दाखवली पाहिजे आणि इतर लोकांशी अधिक संयमाने वागणे शिकले पाहिजे.
“आपल्याला काय घडले ते माहीत नाही, संपूर्ण गोष्टीमागे नेमकं कारण काय आहे, संपूर्ण प्रकरण काय आहे, परिस्थिती काय आहे ते माहीत नाही. त्यामुळे आपण कमी जजमेंटल राहू या, जास्तीत जास्त निरीक्षण करू या, अधिक सहानुभूती बाळगू या आणि लोकांना धीर देऊ या” असे नताशा सांगते.
“भारतीय समाजात घटस्फोट अजूनही निषिद्ध मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात घटस्फोटांचे प्रमाण सर्वांत कमी आहे, हे यावरून स्पष्ट होते. समाजाच्या जजमेंटल वागणुकीमुळे जोडप्यांना जजमेंट टाळण्यासाठी त्यांचे भावनिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात घालून इच्छा नसताना दु:खी वैवाहिक जीवन जगावे लागते”, असे सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेहजाबिन दोर्डी सांगतात.
पुरुष आणि महिलांना ‘जजमेंट’चा समान त्रास होतो का?
दोर्डी सांगतात की, घटस्फोटादरम्यान महिलांना विशेषतः पत्नी आणि आई म्हणून अनेकदा कठोर सामाजिक जजमेंटला सामोरे जावे लागते. विवाह टिकवून ठेवण्यात अपयश आल्याने महिलांना पुरुषांपेक्षा अधिक टीका सहन करावी लागते. पुरुषांनासुद्धा लोक ‘जज’ करतात; पण त्यांना खूप कमी चौकशीला सामोरे जावे लागते. या असमानतेमध्ये लिंगीय भूमिका आणि अपेक्षा महत्त्वाची असते, ज्यामध्ये महिलांचा थेट संबंध कुटुंब आणि घराच्या जबाबदारीशी जोडला जातो.
घटस्फोटाबद्दलची विचारधारणा गेल्या काही वर्षांत बदललीय का?
हो, घटस्फोटाबद्दलची विचारधारणा बदलत असून, हळूहळू प्रगती होत आहे. घटस्फोटाबद्दलचा सामाजिक दृष्टिकोन अधिक स्वीकारार्ह झाला आहे. घटस्फोटांचे वाढते प्रमाण आणि या विषयावर सार्वजनिक चर्चा वाढल्याने लोकांची धारणा किंवा मत बदलण्यास मदत झाली आहे. दोर्डी सांगतात की, अनेक संस्कृती आणि समुदायांमध्ये अजूनही घटस्फोटाबद्दल चुकीचे मत आहे आणि त्यांचे विचार घटस्फोटासंबंधीच्या मतांवर परिणाम करीत आहेत.
घटस्फोट झाल्यानंतर सामाजिक दृष्टिकोनाचा व्यक्तीवर परिणाम होतो का?
“हो, घटस्फोट झाल्यानंतरही सामाजिक दृष्टिकोनाचा व्यक्तीवर परिणाम होऊ शकतो. या चुकीच्या मतांमुळे घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीमध्ये लाज, अपराधीपणा व अपुरेपणाची भावना निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम नातेसंबंध, आत्मसन्मान व सामाजिक संवाद यांवर दिसून येतो”, असे दोर्डी सांगतात.
एखाद्या व्यक्तीवर किती प्रमाणात परिणाम होतो हे त्याच्या वैयक्तिक वृत्ती, सपोर्ट सिस्टीम आणि ते कोणत्या सांस्कृतिक व सामाजिक संदर्भांचा भाग आहेत, यावर अवलंबून असते. सामाजिक धारणांचा प्रभाव कमी होऊ शकतो; पण त्यामुळे कायमस्वरूपी भावनिक त्रास होऊ शकतो.