Weight Loss : प्रत्येकाला आरोग्यदायी जीवन जगावेसे वाटते. अनेक जण व्हिटॅमिन्सचा मुबलक स्रोत मिळावा यासाठी मल्टीव्हिटॅमिन घेतात; पण जर मोड आलेले कडधान्य तुम्ही दररोज खाल्ले, तर तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनची काहीही आवश्यकता भासणार नाही. मोड आलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे भरपूर प्रमाणात असताच. त्याशिवाय ते पचायलाही तितकेच सोईस्कर असतात.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते. १०० ग्रॅम मोड आलेल्या मिश्र
कडधान्यांमध्ये जवळपास ३२ कॅलरीज असतात; पण यामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याविषयी अपोलो हॉस्पिटलच्या पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.
खनिजे
शारीरिक कार्य करताना ज्याप्रमाणे व्हिटॅमिन्स गरज भासते त्याचप्रमाणे खनिजेसुद्धा गरजेची असतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत असतो. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात आणि दातांचे आरोग्य चांगले राहते. मॅग्नेशियम स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते. लोह रक्तातील ऑक्सिजन पातळी सुरळीत ठेवण्यास मदत करते; तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हेही वाचा : फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….
एन्झाइम
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये एन्झाइमची मात्रा सर्वाधिक असते. या एन्झाइममुळे पचनसंस्थेला अन्नातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत होते. पचनाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा आवर्जून समावेश करावा.
अँटिऑक्सिडंट्स
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फ्लेव्होनॉइड्स व पॉलिफेनॉल्स (flavonoids and polyphenols)सारखी अँटिऑक्सिडंट्स असतात. ही अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या रॅडिकल्सचा सामना करतात. या कडधान्यांच्या सेवनाने हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
प्रीबायोटिक्स
या कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते; त्यामुळे ती प्रीबायोटिक म्हणून काम करतात. प्रीबायोटिक्स हे असे पदार्थ असतात की, जे तुमच्या आतड्यांसाठी आवश्यक असलेल्या जीवाणूंचे पोषण करतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते.
हेही वाचा : How to Stop Snoring : तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका!
मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात कसा समावेश करावा?
- सकाळच्या नाश्ता म्हणून तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करू शकता. ऑम्लेटमध्ये ताजी कडधान्ये घाला. तुम्ही दह्याबरोबरही याचं सेवन करू शकता.
- दुपारच्या जेवणात तुम्ही सॅलडमध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करू शकता.
- मोड आलेल्या कडधान्यांचा डबा नेहमी तुमच्या फ्रिजमध्ये ठेवा. स्नॅक्ससाठी हा एक चांगला हेल्दी पर्याय आहे. चांगल्या चवीसाठी तुम्ही दह्याबरोबरही हे खाऊ शकता.
मोड आलेली कडधान्ये आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, याचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. नेहमी ताजी कडधान्ये खरेदी करा आणि वापरण्यापूर्वी ती पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्या.
ही कडधान्ये अत्यंत पौष्टिक असतात. शरीराला ती भरपूर ऊर्जा पुरवतात; ज्याचा आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदा होतो. वजन नियंत्रित ठेवण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत हे अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश करा. तु्म्हाला फरक दिसून येईल.