Naturopathic Medical Treatment Home Remedies: जन्माला आला तेव्हापासूनच माणूस त्याच्या प्रकृतीच्या तक्रारीकरिता उपचार शोधतोय. त्याला जमले तसे आपल्या परिसरात मिळणाऱ्या वस्तूंचे, रोजचे जेवण्याखाण्यातील पदार्थाचे औषध म्हणून, रोगांवरच्या उपचारांचे त्याचे प्रयोग चालू असतात. कोणी व्यक्ती सर्दीकरिता तुळशीची पाने सुचवते तर दुसरी व्यक्ती मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या सांगते. कुणी तापाकरिता पारिजातकाच्या पानांचा काढा तर कोणी लंघनाचा आग्रह धरेल. उलटी थांबण्याकरिता कोणी साळीच्या लाह्य़ा खाईल तर कोणी आंबा किंवा जांभळाची कोवळी पाने खाऊन बरे होईल. याच प्रकारे रोग वाढू नये म्हणून काही बंधने पाळली जातात. सर्दी, पडसे, मूळव्याध, त्वचाविकार याकरिता दही चालत नाही, पोटदुखी विकारात पोहे, चुरमुरे, भडंग, भेळ, मिसळ अपायकारक आहे, तापामध्ये जास्त जेवणाने ताप उतरत नाही. मधुमेहात साखर, भात याबरोबरच मीठ कमी केले तर उतार पडतो. एक ना अनेक उपचार आहेत. या उपचारांना पैसे पडत नाहीत. दिवसेंदिवस वैद्यक महागडे होत चालले आहेत. डॉक्टर किंवा हॉस्पिटलांना भरपूर पैसे द्यायचे, पण समाधान नाही. यातून काही मार्ग निघतो का हे शोधण्याचा प्रयत्न या लेखमालेद्वारे केला जाणार आहे.
साधे सोपे उपाय
कोणतेच वैद्यक निसर्गाला सोडून रोगनिवारणाचे कार्य करू शकणार नाही. याकरिता गेल्या पंचवीस वर्षांच्या वैद्यकीय अनुभवात सुचलेले साधे, सोपे, सुटसुटीत उपाय लिहीत आहे. या लेखमालेत दैनंदिन जीवनात उपयुक्त पथ्यकारक, रोगनिवारण करण्याचा, सोप्या, सुटसुटीत, स्वस्त व औषध नाही अशा उपचारांची थोडक्यात माहिती असेल. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात कुपथ्य, रोग वाढविणारे अहितकारक पदार्थ किंवा वागणुकीतील सवयी यांचा विचार केला जाईल. आपण अनुभवा, चांगला अनुभव आला तर इतरांना सांगा, शंका आली तर जरूर विचारा.
निसर्गोपचाराची कास
आपल्या राष्ट्राच्या घटनेत सर्वसामान्य माणसाचे रोगनिवारण करणे, हा मार्गदर्शक तत्त्वांतील एक प्रमुख भाग आहे. त्याकरिता आपले मध्यवर्ती व राज्य सरकार काही प्रयत्न करीत असतात. उद्देश चांगले आहेत, पण अंमलबजावणी नीट होत नाही. त्याला कारण आपले आरोग्य मंत्रालय पाश्चत्त्य विद्याविभूषितांच्या ताब्यात आहे. देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले, पण जाताना आमच्या काही पंडितांना इंग्रजाळलेले करून गेले. सर्वसामान्यांच्या रोगांकरिता आपल्या परिसरातच काही उपचार आहेत, असा विचारच या मंडळींना माहीत नाही. त्यामुळेच कोटय़वधी रुपयांचे बजेट असूनही रोगी, डॉक्टर, सरकार कोणालाच समाधान नाही. त्याकरिता ‘सुजाण समाजा’ने या लेखमालेतील उपाय वापरून, त्यांचा अनुभव घेऊन, शासकांना निसर्गोपचाराची कास धरावयाचा आग्रह करावा, ही माफक अपेक्षा!
तात्पुरता रोग बरा करण्याचे काम औषधांकडे आहे, रोग पुन्हा होऊ नये, शरीर सक्षम व्हावे, रोगप्रतिकारशक्ती वाढावी, म्हणून आहार-विहार यावर आयुर्वेदाचा भर आहे.
गेली पंचेचाळीस वर्षे मी आयुर्वेद क्षेत्रात बऱ्यापैकी रुग्णचिकित्सेचे काम करीत आहे. नशीब, वडिलांची पुण्याई व संघ परिवारातील ज्येष्ठ व लहान अशा कार्यकर्त्यांचे प्रेम यामुळे मला खूप मोठा रुग्ण परिवार लाभला. संघातील अत्युच्च पदापासून ते लहान पातळीवरील, पण अनेक जबाबदारीची कामे पाहणाऱ्या संघाच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधींच्या निमित्ताने संपर्क आला. संघ परिवाराप्रमाणेच सर्वोदय चळवळीतील कार्यकर्ते, लोहियावादी मंडळी, काँग्रेस, समाजवादी महिला सभा व अन्य सामाजिक संस्थांतील धुरीण यांचे आरोग्य व अनारोग्याचे प्रश्न सोडविण्याचे व्यापक भाग्य मला लाभले. लोकनायक जयप्रकाशजी नारायण अत्यवस्थ असताना, भगवान रजनीश यांचा रोग बळावलेला असताना त्यांची स्नेही मंडळी ‘‘आयुर्वेदात काही आहे का?’’ म्हणून विचारणा माझ्याकडे करत होती. अशा घटनांमुळे मला आयुर्वेद व रुग्ण या संबंधात अधिक स्वस्थ व सावधपणे चिंतन करण्याची सवय लागली. पुणे शहरात ‘‘आम्हाला टी.व्ही. नको, भाकरी हवी’’ म्हणून बालगंधर्व रंगमंदिरात पत्रके फेकून आपल्याला पटेल ते ठासून निर्भीडपणे मांडणाऱ्या श्रीपाद व इंदूताई केळकर पती-पत्नींचे वैद्यकीय व्यवस्थेचे काम बघण्यात मोठा आनंद होता. असो. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मला कळलेल्या आहारविहारांच्या नियमाप्रमाणे मी जी काही सल्लामसलत देत आलो त्या सल्लामसलतीमुळे, औषधी उपाययोजनेमुळे रुग्णांच्या तक्रारींचे निवारण बऱ्यापैकी होते, असे अनुभव नित्य जमेस आहेत. असे असूनही काही वेळेस आपल्याकडे कधीमधी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा रोग बळावला आहे. किंवा व्याधीमुळे ते कोणतेही काम करू शकत नाहीत किंवा प्रत्यक्ष मृत्यू झाला आहे, अशी बातमी कानावर आली की, मी चिंतन करतो.
तर टाळता आले असते…
आयुर्वेद उपचारांची यशस्विता व मोठेपणा मी जेव्हा पाहतो, अनुभवतो तेव्हा मला असे वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज, मोठे माधवराव पेशवे व थोर नाटककार राम गणेश गडकरी यांच्या काळात या थोर नेत्यांच्या जवळ नेमके आयुर्वेदीय आहारविहाराचे चांगले-वाईट सांगणारे कोणी नव्हते का? शिवाजी महाराजांनी गुडघी रोगाने जाणे, माधवराव पेशव्यांनी क्षयाची बाधा होऊन अकाली जाणे हे टाळता आले नसते का? तात्त्विक चर्चा करावयाची झाल्यास, आयुर्वेदीय दिनचर्या, ऋतुचर्या, पथ्यापथ्य, प्रज्ञापराध किंवा जाणूनबुजून शरीराचा ऱ्हास करून घेणे हे टाळता यावयास हवे.
पथ्य व कुपथ्य
पथ्य व कुपथ्य हे शब्द वैद्य डॉक्टरांच्या रोजच्याच व्यवहारात आवश्यक शब्द आहेत, पण त्यापेक्षा हितकर व अहितकर, मानवी जीवनाला उपयुक्त व अनुपयुक्त असा विचारही पथ्यापथ्यात हवा. पथ्यापथ्य हे तात्पुरते नसावे. रोग असला तर तो मुळापासून दूर व्हावा ही अपेक्षा पथ्यापथ्य सांगताना असली पाहिजे. कारण तात्पुरता रोग बरा करण्याचे काम औषधांकडे आहे, रोग पुन्हा होऊ नये, शरीर सक्षम व्हावे, रोगप्रतिकारशक्ती वाढावी, म्हणून आहार-विहार यावर आयुर्वेदाचा भर आहे. असे दिनचर्या, ऋतुचर्येला धरून वर्तन झाले तर माणसांचे शरीरस्वास्थ्य दीर्घकाळ टिकते. शरीरस्वास्थ असले तर मन स्वस्थ राहते. मन नुसतेच स्वस्थ असून चालत नाही तर ते प्रसन्न हवे. असे शरीर, मन स्वस्थ व प्रसन्न राहिले तर आत्म्याचे बल टिकाऊ स्वरूपाचे होते. यालाच शास्त्रात, ‘स्वस्थ’ अशी भावपूर्ण व्यापक संज्ञा आहे.
नॉट अॅट इज
इंग्रजी भाषेत रोग या शब्दाला ‘डिस-इज’ ‘डिसीज’ म्हणजे ‘नॉट अॅट इज’ असा प्रतिशब्द आहे. हा शब्द सुटसुटीत आहे. पण या ‘इज’ शब्दात आयुर्वेदाच्या स्वस्थ या व्यापक अर्थाच्या संज्ञेचा फारच थोडा भाग येतो. त्यामुळेच की काय अॅलोपॅथिक शास्त्रात स्वस्थवृत्त, पथ्यापथ्य यांना जवळपास काहीच स्थान नाही. याउलट हा प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाच्या आग्रहाचा; पथ्यापथ्याच्या आग्रहाचा सांगावा, आयुर्वेदात अग्रक्रम असलेला दिसेल.
पथ्ये सति गदार्तस्य भेषजग्रहणेन किम्।
पथ्येऽ सति गदार्तस्य भेषजग्रहणेन किम्॥
अर्थ – पथ्य सांभाळले तर रुग्णाला औषध कशाला? (म्हणजे औषधे न घेताही रोग बरा होऊ शकेल.) आणि पथ्य सांभाळले नाही तर औषध कशाला? (म्हणजे औषध घेऊन काय उपयोग?) म्हणजेच औषध घेतले पण पथ्य सांभाळले नाही तर काहीही उपयोग होणार नाही.
आपल्या दैनंदिन जीवनात ‘स्वास्थ्यरक्षण व रोगनिवारण’ या आयुर्वेदाच्या प्रतिज्ञामंत्राचे अपेक्षित कार्य या लेखमालेद्वारा करता आले, तरच या लेखमालेचा उद्देश सफल होईल. आयुर्वेदप्रेमी वाचकांनी पुढील तपशिलाचे वाचन, मनन, चिंतन व आचरण करून त्याचे कमीअधिक अनुभव मला अवश्य सांगावे, एवढीच माफक अपेक्षा आहे. (यापूर्वी साप्ताहिक लोकप्रभामध्ये २०१५ साली प्रसिद्ध झालेली वैद्य प. य. वैद्य खडिवाले यांची औषधाविना उपचार ही लेखमालिका पुनर्प्रकाशित करत आहोत- पुढील भाग उद्या दुपारी प्रकाशित होईल.)