नवरात्रोत्सवात उत्साह आणि जल्लोषात गरबा किंवा दांडिया खेळला जातो. कित्येक तरुण- तरुणी आवडीने सहभागी होतात; पण गेल्या काही वर्षांत गरबा किंवा दांडिया खेळताना तरुण-तरुणी अचानक बेशुद्ध पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सन २०१९ रोजी गुजरातमध्ये गरबा खेळताना एका २५ वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आल्याची घटना घडली होती. त्यानंतर सन २०२२ मध्ये मुंबईमध्ये दांडिया खेळताना एक ३० वर्षीय महिला बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. गरबा वा दांडियासारखे अचानक काही दिवसांसाठी सुरू केलेले नृत्य हा एक तीव्र व्यायामाच प्रकार आहे. जर एखाद्याला हृदयाशी संबंधित गंभीर आजार किंवा निदान न झालेल्या आरोग्याच्या समस्या असतील, तर नवरात्रीत गरबा किंवा दांडिया यांसारखे खेळ खेळताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण- त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो आणि हृदयाशी संबंधित विकारांचा धोका वाढू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्रीमध्ये गरबा किंवा दांडियासारखे खेळ खेळण्यापूर्वी हृदयाची आरोग्याची स्थिती लक्षात घेणे का महत्त्वाचे आहे? विशेषत: ज्यांना रक्तदाब व हृदयविकाराशी संबंधित त्रास आहे त्यांनी हृदयाच्या आरोग्य स्थितीकडे का लक्ष दिले पाहिजे? हे सविस्तर जाणून घेऊ.

उच्च रक्तदाब आणि ज्यांना बैठी जीवनशैलीची सवय आहे; त्यांना गरबा वा दांडिया खेळण्याबाबत सल्ला देताना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर केदार कुलकर्णी यांनी सांगितले, “गरबा वा दांडिया हा उच्च तीव्रतेचा अ‍ॅरोबिक व्यायाम आहे.”

गरबा वा दांडियासारखे खेळ हे अ‍ॅरोबिक व्यायामाप्रमाणेच आहेत; ज्यामध्ये व्यक्तीला सातत्याने हालचाल करावी लागते आणि त्यासाठी भरपूर ऊर्जा वापरली जाते. सातत्याने नाचत राहिल्यास किंवा अ‍ॅरोबिक व्यायाम करताना हृदयाला आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक घटकांची गरज असते; ज्याची पूर्तता करताना हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो.

एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराशी संबंधित त्रास असतील तर किंवा विशेषत: कोरोनरी आर्टरी डिसीज असतील (Coronary Artery Disease), तर अशा रुग्णांनी जास्त काळजी घ्यावी. कारण- नाचण्यासह कोणत्याही प्रकारचा तीव्र व्यायाम केल्यास उच्च रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण वाढतो. परिणामी हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. सातत्याने नाचत राहिल्यास हृदयासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक घटकांची गरज आणखी वाढते.

म्हणूनच सामान्यत: प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: ज्यांना बैठ्या जीवनशैलीची सवय झाली आहे अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा तीव्र व्यायाम किंवा नृत्य करण्यापूर्वी सामान्य इको आणि स्ट्रेस टेस्ट (हृदयविकाराच्या निदानात मदत करणारी महत्त्वाची तपासणी) करण्याची शिफारस केली जाते.

हेही वाचा – नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?

ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशा व्यक्तीला नवरात्रीमध्ये गरबा वा दांडियासारखे खेळ खेळताना कोणता संभाव्य धोका असू शकतो?

गरबा अथवा दांडियासारखे खेळ खेळताना उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या व्यक्तीला अतिरिक्त ताण येतो, प्रचंड धावपळ होते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाची गती अनियंत्रित होते. त्यामुळे हृदयातील विद्युत आवेग (Electric Impulses म्हणजे विद्युत उत्तेजना निर्माण होणे)देखील अनियंत्रित होऊन अचानक हृदय बंद पडू शकते. त्याला सडन कार्डियाक अरेस्ट (Sudden Cardiac Arrest) असे म्हणू शकतो.

कोणतीही सामान्य व्यक्ती आणि विशेषत: कोरोनरी आर्टरी डिसीज असलेली व्यक्ती जेव्हा अ‍ॅरोबिक व्यायाम करते, तेव्हा स्नायू कार्यरत असतात. अशा वेळी रक्तप्रवाह हृदयाकडे न जाता कार्यरत स्नायूंकडे वळतो; ज्यामुळे हृदयाची ऑक्सिजन आणि रक्ताची पातळी कमी होते.

हायपरकोग्युलॅबिलिटी (Hypercoagulability) म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या निर्माण करण्याची क्षमता वाढणे आणि अ‍ॅट्रियल फायब्रिलेशन (Atrial Fibrillation) म्हणजेच हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे. अशा हृदयाविकाराच्या समस्या असलेल्या व्यक्तीने नवरात्रीमध्ये गरबा वा दांडिया केल्यास रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

आणखी एक धोका म्हणजे झोप पूर्ण होत नाही (Sleep Deprivation). त्यामुळे स्नायूंना दुरुस्तीसाठी वेळ मिळत नाही आणि सतत घाम येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. परिणामी रक्त गोठले जाते आणि शरीरामध्ये रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला अडथळा निर्माण होतो.

हेही वाचा – तुम्ही रोज दही खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

गरबा वा दांडियासारखे नृत्य करताना काय काळजी घ्यावी?


नवरात्रीमध्ये गरबा वा दांडियासारखे नृत्यामध्ये सहभाग घेण्याऱ्यांना स्वत:ची शारीरिक क्षमता लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थकवा, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडथळा येणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर यापैकी एकही लक्षण दिसत असेल, तर थोडा वेळ विश्रांती घेणे, पाणी पिणे आणि गरज असल्यास डॉक्टरांसह संवाद साधणे आवश्यक असू शकते.

गरबा वा दांडिया खेळताना हृदयाच्या आरोग्य जपताना, सोप्या व योग्य डान्स स्टेप्स निवडणे, थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घेणे आणि पाणी पिणे महत्त्वाचे का ठरते?

सामान्य रक्तप्रवाह सुरळीत राहावा, रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी नवरात्रीमध्ये गरबा वा दांडिया खेळताना अतिरिक्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. नृत्य करण्यापूर्वी, नृत्य करताना आणि नृत्य केल्यानंतर पाणी पीत राहा. नृत्य करताना, विशेषत: जेव्हा श्वास घेता येत नसेल किंवा खूप थकल्यासारखे वाटत असेल तेव्हा नियमितपणे थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घ्या; जेणेकरून हृदयाचे ठोके नियंत्रणात राहतील आणि हृदयावर अतिरिक्त ताण येणार नाही.

याशिवाय हृदयाचे आरोग्य जपत नवरात्रोत्सव साजरा करायचा असेल, तर गरबा वा दांडिया यांसारखे भरपूर ऊर्जा वापरले जाणारे नृत्य करण्यापूर्वी तुमच्या क्षमतेनुसार योग्य त्या डान्स स्टेप्स कोणत्या आहे हे जाणून घेणे आणि आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नवरात्रोत्सवात गरबा वा दांडिया हे खेळ अत्यंत उत्साह आणि चैतन्य निर्माण करीत असले तरी तुमच्या हृदयाचे आरोग्य जपण्याला प्राधान्य द्या आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळीच योग्य ती पावले उचला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2023 can you have heart attack while garba dandiya sessions are tou fit for dandiya why a basic heart check up is a must to prevent risk of heart attack snk