आमच्या बाह्यरुग्ण विभागात येणार्या रुग्णांपैकी कंबरदुखी आणि गुडघेदुखी पाठोपाठ सगळ्यात जास्त संख्या असलेले रुग्ण म्हणजे मानदुखी चे रुग्ण.
२०२०मध्ये जागतिक स्तरावर मानदुखी असलेल्या व्यक्तींची संख्या २०३ दशलक्ष इतकी होती. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक होती. २०५० पर्यंत ही संख्या २६९ दशलक्ष इतकी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मानदुखीचं प्रमाण सर्वाधिक आहे. तीव्र मानदुखीचा परिणाम कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर होतो त्यामुळे कंबरदुखी प्रमाणेच मानदुखी ही देखील जगभरात एक आर्थिक भार निर्माण करणारी समस्या ठरते आहे.
साधारणपणे मानदुखी प्रमुख दोन प्रकारात विभागली जाते, पहिला प्रकार ज्यात वेदना या फक्त मानेमध्ये किंवा मानेच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये जाणवतात, आणि दुसरा प्रकार ज्यात मान तर दुखतेच त्यासोबत एका किंवा दोन्ही हातांमधे वेदना जाणवतात, मुंग्या येतात किंवा हात सुन्न पडल्यासारखे वाटतात. या प्रमुख दोन प्रकारांव्यतिरिक्त अपघातानंतर होणारी मानदुखी, फक्त मानेच्या आजूबाजूचे स्नायू आखडणे किंवा दुखणे, चक्कर, डोकेदुखी यासह होणारी मानदुखी असे इतर प्रकार ही आढळून येतात. बहुतेकवेळा मानदुखी ही एका विशिष्ट कारणामुळे न होता अनेक कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून होते, (याला अपवाद अपघातानंतर होणारी मानदुखी).
वाढत्या वयानुसार मानेच्या मणक्यामधे आणि दोन मणक्यामधल्या गादीत होणाऱ्या बदलांमुळे मानदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो, आणि पुढे जाऊन एका किंवा दोन्ही हातात जाणाऱ्या नसांना त्रास होऊ शकतो. सध्याच्या जीवनशैलीमुळे हे बदल अगदी ३०व्या वर्षापासून देखील दिसून येतात. बैठी जीवनशैली, वाढलेला स्क्रीन टाइम, वेगवेगळ्या स्क्रीन्सकडे बघण्याच्या चुकीच्या पद्धती, शरीरात होणारं डिहायड्रेशन, कामाच्या ठिकाणी पुरेशा सुविधांचा अभाव, मानेच्या आणि वरच्या पाठीच्या स्नायूंचा कमकुवतपणा, अयोग्य बसण्याच्या सवयी, कंबरेच्या वरच्या भागात किंवा छातीच्या भागात असणारं अतिरिक्त चरबीचं प्रमाण, सतत डोक्यावर वजन उचलणे, अति श्रमाची कामे करणे, सतत आणि लांब अंतरावर चारचाकी किंवा दुचाकी चालवणं, अयोग्य उशीचा वापर, पाठीवर खूप जास्त वजन असमान पद्धतीने किंवा एकाच खांद्यावर घेणं, खूप वेळ मान खाली वाकवून वाचन किंवा लिखाण, शिवणकाम करणे. अतिरिक्त मानसिक ताण, नैराश्य किंवा पुरेशी झोप न मिळणं. यापैकी अनेक घटकांचा एकत्रित परिणाम मानेच्या आरोग्यावर होतो. मणक्यांच्या आणि गादीच्या आरोग्यात होणारे बदल हे अपरिवर्तनीय असतात. मात्र स्नायूंचं आरोग्य हे कुठल्याही वयात सुधारता येऊ शकतं आणि जीवनशैलीतील बदल हे कुठल्याही वयात करता येऊ शकतात.
मानदुखीचे फिजिओथेरेपी उपचार
१. वेदनाशामक उपचार : विविध अद्ययावत उपकरणांद्वारे वेदनाशमन (हा उपचार केवळ वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी केला जातो. वेदनेची तीव्रता कमी झाल्यामुळे रुग्णाला व्यायाम करायला प्रोत्साहन मिळतं)
२ विशिष्ट स्नायूंचे व्यायाम : फिजियोथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखाली होणारे विविध व्यायाम हे मानदुखीच्या प्रदीर्घ व्यवस्थापनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे व्यायाम सौम्य स्वरूपात सुरु करुन हळूहळू वाढवत न्यायचे असतात. मान हा मानवी शरीरातील अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा भाग असल्यामुळे हे व्यायाम फक्त आणि फक्त फिजियोथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखालीच व्हायला हवेत आणि हे प्रत्येक रुग्णागणिक वेगळे असतात.
३ कामाच्या ठिकाणी करावयाचे बदल : मानदुखीचे ९०% रुग्ण हे बरेच तास एका स्थितीत बसून काम करणारे असतात. कामाच्या टेबलची उंची, फुट रेस्ट, हॅंड रेस्ट यासारख्या सोयी फिजियोथेरेपिस्टच्या मार्गदर्शनाखाली अमलात आणल्या तर उपयोग होतो. योग्य उशी कोणती असावी ह्याचा सल्लाही जरुर घ्यावा.
४ हे सगळे उपाय प्रत्यक्ष फिजियोथेरेपिस्टची भेट घेऊन करता येतात मात्र दैनंदिन आयुष्यात आपण काही सोपे बदल केले तर मानदुखी व्यवस्थापनात मदत होऊ शकते.
१. रोज ४५ मिनिटे तुम्हाला आवडणारा एरोबिक व्यायाम करा उदा चालणं, पोहणं, सायकल चालवणं
२. २० मिनिटांपेक्षा जास्त एका स्थितीत मान ठेवू नका
३. भरपूर पाणी प्या
४. मोबाईल, लॅपटॉप्स, कंप्युटर्सच्या स्क्रीन डोळ्याच्या लेव्हलला ठेवा, मान झुकवून स्क्रीनकडे बघू नका (प्रत्येक वेळी आपण मान झुकवून स्क्रीन बघतो तेव्हा आपल्या डोक्याचं वजन कैकपट वाढतं आणि हे वजन मानेच्या मणक्यांना पेलावं लागत. त्यांच्यावर अतिरिक्त भार येतो)
५. चष्मा असल्यास त्याचा वापर करा
६. प्रवासात मानेची विशेष काळजी घ्या. खूप काळ सलग दुचाकी किंवा चारचाकी चालवताना अधून मधून ब्रेक घ्या.
७. आपलं वर्क डेस्क आरामदायी आणि मानेवर ताण येणार नाही असं डिझाइन करून घ्या
८. खूप जड आणि कडक किंवा खूप मऊ आणि पातळ उशी वापरू नका, फिजियोथेरेपिस्टच्या मदतीने योग्य उशीची निवड करा.
९. एका खांद्यावर बॅग किंवा सॅक अडकवणं टाळा.
१०. मानदुखीच्या व्यवस्थापनासाठी तर फिजियोथेरेपी उपचार घ्याच पण प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा जाणून घ्या आणि अमलात आणा.
© IE Online Media Services (P) Ltd