Home Remedy for Vertigo: जर तुम्हाला सतत मानदुखीचा त्रास होत असेल किंवा बसून उठल्यावर अचानक घेरी येत असेल तर हे सर्वाइकल व्हर्टिगो या आजाराचे लक्षण असू शकते. अनेकांना हा आजार नैसर्गिक वाटू शकतो पण यामागे मुख्य कारण तुमची जीवनशैली असते. जर तुम्ही बसून करायची कामे अधिक वेळ करत असाल तर यामुळेच अनेकदा सर्वाइकल व्हर्टीगोचा त्रास बळावतो. या व्हर्टिगोमुळे सुरु होणारी मानदुखी ही आयुष्यभर सतावत राहू शकते. तसेच यामुळे पाठीच्या मणक्यावरही ताण येण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहीत असेल आपल्या पाठीच्या मणक्यात मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्या असतात परिणामी मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे हे जीवावरही बेतू शकते.
मेडीकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. शिवशंकर दलाई यांच्या माहितीनुसार, जर आपल्याला मणक्याला काही दुखापत झाली असेल किंवा तुमची जीवनशैली बैठी असेल तर तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वाइकल व्हर्टिगो ओळखण्यासाठी आज आपण लक्षणे व उपाय जाणून घेणार आहोत.
सर्वाइकल व्हर्टिगोची लक्षणे (Cervical Vertigo symptoms)
- तुम्हाला व्हर्टिगोचा त्रास असल्यास सतत मानदुखी जाणवते.
- एकग्रतेला मारक असा हा आजार आहे.
- एका जागी बसल्यावर अचानक उठतात डोळ्यासमोर अंधारी येणे
- सरळ उभे राहता न येणे
- डोकेदुखी, मळमळ व उलटी
- तोल जाणे
- आराम करूनही थकवा जाणवणे
सर्वाइकल व्हर्टिगोवर उपचार (Treatment On Cervical Vertigo)
आवळा व धणे
जर तुम्हाला सर्वाइकल व्हर्टिगोमुळे किंवा अन्यही आजरांमुळे उलटी किंवा मळमळीचा त्रास जाणवत असेल तर यावर धण्याचे पाणी परिणामकारक ठरू शकते. आपल्याला प्रवासातही गाडी लागण्याचा त्रास असेल तर धण्याचे पाणी किंवा आवळ्याचे सरबत नेहमी घेऊन जा. जर आपल्याला शक्य असेल तर आवळा व धण्याचे दाणे रात्री एका ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवावे व सकाळी हेच पाणी गाळून प्यावे. यामुळे सकाळी उठल्यावर जाणवणारा थकवा व मळमळ दूर होण्यास मदत होते.
आल्याचं चॉकलेट
जर तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर अशावेळी एक आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळावा. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो व मेंदूला आराम मिळण्यासही मदत होते. जर तुम्हाला सतत जीव घाबराघुबरा होण्याची किंवा मळमळ जाणवण्याची तक्रार असेल तर त्यावरही आल्याचा छोटा तुकडा उत्तम उपाय ठरू शकतो.
पुदिन्याचा चहा
आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी हे पदार्थ खूप आस्वादतात पण अनेकदा या उत्तेजक पेयांचे सेवन केल्यावर अधिक मळमळ जाणवू शकते. किंवा सतत मनात भीती वाटणे हा त्रासही अनेकांना होऊ शकतो. अशावेळी चहाचाच एक हेल्दी पर्याय ठरू शकतो. पुदिन्याची काही पाने आपण कोमट पाण्यात भिजवून ठेवू शकता काहीवेळाने हेच पाणी गाळून व वाटल्यास थोडं उकळून चहाप्रमाणे सेवन करू शकता.
हे ही वाचा<< युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम
दरम्यान या सगळ्यावर एक उत्तम उपाय म्हणजे तुमच्या जीवनशैलीतील बदल व नियमित किमान व्यायाम. या दोन सवयी लावल्यास तुम्ही कोणत्याही आजारावर मात करू शकता.
(टीप: वरील लेख हा आयुर्वेदिक माहितीवर आधारित आहे, गंभीर प्रकरणात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)