What to do for improve memory : घरात असताना, बाहेर वावरताना, ऑफिसमध्ये काम करताना लहान लहान गोष्टींचा विसर पडतो. एखाद्या वेळेस काही विसरलं असेल, तर गोष्ट वेगळी. पण कामांच्या बाबतीत, घरातल्या वस्तूंच्या बाबतीत विसरभोळेपणा जर सततच होत असेल, तर अशा विस्मरणाकडे दुर्लक्ष नको. ज्या युगात मल्टीटास्किंग आणि सतत कनेक्टिव्हिटी काळाची गरज झाली आहे. संभाषणादरम्यान एखादे नाव आठवत नाही किंवा आपण आपल्या गाडीच्या चाव्या कुठे सोडल्या हे लक्षात ठेवणे असो, दैनंदिन जीवनात स्मृती टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अधूनमधून गोष्टी विसरणे सामान्य असले तरी काही सवयी अंगीकारणे तुमच्या मेंदूची माहिती साठवण्याची आणि पुनर्प्राप्तीची क्षमता वाढवण्यास मदत करू शकते. पण, स्मृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वांत प्रभावी सवयी कोणत्या आहेत आणि तुम्ही त्या तुमच्या दिनक्रमात कशा समाविष्ट करू शकता? जाणून घेऊयात.
सलुब्रिटास मेडसेंटर येथील वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट प्रमुख, डॉ. कदम नागपाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. “मेमरी ही अशी प्रक्रिया आहे की, ज्याद्वारे माहिती साठवली जाते, संग्रहित केली जाते आणि मेंदूमधून पुनर्प्राप्त केली जाते. या प्रक्रियेत स्मृती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण- ती व्यक्तींना भूतकाळातील घटना आठवण्यास, त्या समजून घेण्यास आणि वर्तमानातील वर्तन सुधारण्यास मदत करते.
डॉ. नागपाल सांगतात की, स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे लक्ष. “आजच्या व्यग्र जगात अनेकांना लक्ष केंद्रित करणे कठीण होते. जर एखाद्याचे लक्ष विचलित झाले असेल, जसे की मल्टीटास्किंग करताना असेल किंवा एका वेळी अनेक कामं करताना एकाही कामात लक्ष केंद्रित होत नाही. अशा वेळी स्मरणशक्ती कमी होते.
रोजच्या ६ सवयी ज्या नैसर्गिकरीत्या स्मरणशक्ती सुधारू शकतात
डॉ. नागपाल स्मरणशक्ती सुधारण्यासाठी खालील रोजच्या सवयींची यादी करतात :
नियोजन करा : दैनंदिन नियोजन ठेवल्याने महत्त्वाची कामे विसरणे टाळण्यास मदत होते. तसेच रोज लेखन करावे, लेखन मेंदूला गोष्टी अधिक तपशीलवार लक्षात ठेवण्यास उत्तेजित करते.
पुरेशी झोप घ्या : स्मरणशक्ती वाढवण्यासाठी शांत झोप लागणं, झोप पूर्ण होणं आवश्यक असते. ६ ते ८ तास झोप घेतल्यास मेंदू ताजातवाना होतो. विस्मरणाची सवय कमी होते. चांगल्या आणि पुरेशा झोपेमुळे स्मरणशक्ती वाढते.
लक्ष केंद्रित करून व्यत्यय कमी करा : हातातील कामाकडे लक्ष देऊन आणि मल्टीटास्किंग टाळून, एका वेळी एक काम याप्रमाणे प्रत्येक काम व्यवस्थित करा.
मानसिक व्यायामाचा सराव करा : मेंदूला उत्तेजित करणाऱ्या क्रियाकलाप जसे की कोडे सोडवणे, वाचणे किंवा नवीन कौशल्ये शिकणे, मेंदूच्या क्रियाकलापांना चालना देत मजबूत केल्याने स्मरणशक्ती सुधारू शकते.
पुरेसा रक्तपुरवठा – सतत विस्मरण होणे याचा अर्थ असा की, आपल्या मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाहीये. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. शारीरिक हालचाली आणि शारीरिक व्यायाम वाढवला, तर संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह चांगला होत राहतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठाही शारीरिक व्यायामामुळे सुधारतो. चालणं, पळणं, अॅरोबिक्स करणं, सायकल चालवणं, योगसाधना करणं यांसारख्या शारीरिक क्रियाकलापांतून मेंदूकडील रक्तपुरवठा वाढून, स्मरणशक्ती सुधारते.
पोषणयुक्त आहार घेतल्यास मेंदूची पोषक घटकांची गरज पूर्ण होते. आहारात फळे, सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, डाळी, कडधान्ये, प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा.