Five nutrition mistakes : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळा हा असा ऋतु आहे जो अनेकांना आवडतो. हिरव्या निसर्गाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पावसाळ्यात अनेक जण घराबाहेर पडतात. पण, त्याचबरोबर पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केस ओले न ठेवणे, उबदार कपडे घालणे, नेहमी छत्री बरोबर ठेवणे इत्यादी गोष्टी तुम्ही पाळत असाल; पण पावसाळ्यात तुम्ही काय खाता, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळा हा जरी अतिशय सुंदर वाटत असला तरी या दरम्यान आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो.
द इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात फिटेलोचे (Fitelo) संस्थापक आहारतज्ज्ञ मॅक सिंग यांनी पावसाळ्यात खाण्याच्या बाबतीत खालील चुका करू नका, असा सल्ला दिला आहे.
लिंबूवर्गीय फळे खाणे टाळणे
लिंबूवर्गीय फळे हे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहेत. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती टिकवून ठेवते, पण अति आंबटपणामुळे अनेक जण पावसाळ्यात लिंबूवर्गीय फळे खाणे टाळतात, ज्यामुळे त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर होतो.
जर तुम्हाला लिंबूवर्गीय फळे खायला आवडत नसतील तर तुम्ही पदार्थांवर लिंबू पिळा किंवा लिंबाचे पेय बनवा. याला पर्याय म्हणून तुम्ही पेरू, पपईसुद्धा खाऊ शकता. यामध्येसुद्धा व्हिटॅमिन सी हा एक उत्तम स्त्रोत आहे.
प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक पदार्थ टाळणे
लिंबूवर्गीय फळांप्रमाणेच लोक दहीसारखे प्रोबायोटिक पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळतात. पावसाळ्यात तुम्ही जेव्हा तुमच्या आतड्यांना आनंद देणारा आहार घेता, तेव्हा तुमच्या प्रतिकारशक्तीचीदेखील काळजी घ्या. दही, ताक, लोणचे यांसारखे पदार्थ आतड्यातील खराब बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.
फ्रिजचे पाणी पिणे
जर तुम्हाला पावसाळ्यात तुमचा घसा निरोगी ठेवायचा असेल तर फ्रिजचे पाणी पिणे टाळा. फ्रिजच्या थंड पाण्यामुळे आपल्या घशात इनफेक्शन होऊ शकते. त्याऐवजी मडक्यातील पाणी प्या. हे पाणी आपली तहान भागवते व त्याचबरोबर हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते आणि सनस्ट्रोकपासून वाचवते.
हंगामी फळे, भाज्यांकडे दुर्लक्ष करणे
हंगामी फळे, भाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे; कारण जेव्हा तुमच्या भागात पिकवलेली हंगामी फळे किंवा भाज्या तुम्ही खाता, तेव्हा तुम्हाला आरोग्यास फायदा मिळू शकतो. बाहेरून आयात केलेली फळे किंवा भाज्या या कृत्रिमरित्यासुद्धा बनवल्या जातात. त्यामुळे अशा भाज्या किंवा फळांपासून फायदा मिळेलच, हे सांगता येत नाही.
अतिप्रमाणात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे
पावसाळ्यात तळलेले पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. अनेक जण चहाचा स्वाद द्विगुणित करण्यासाठी त्याबरोबर पकोडेसुद्धा खातात. तळलेल्या पदार्थांमुळे अनेकदा पोट खराब होते. तसेच पावसाळ्यात फार तहान लागत नाही, त्यामुळे बऱ्याचदा आपण खूप जास्त पाणी पित नाही; ज्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते, पण दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
© IE Online Media Services (P) Ltd