लोकांना सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी हवा असतो चहा. काही लोकांचा चहाशिवाय दिवस सुरु होत नाही तर काही लोकांना वेळोवेळी चहा घेतल्याशिवाय काम होत नाही. असा हा चहा भारतीयांचं सर्वात आवडतं पेय आहे. चहाचा एक घोट घेतला की तुम्हाला क्षणार्धात ताजंतवानं वाटतं. काहीजण तर दिवसातून अनेक कप चहा पितात. मात्र काही लोक चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पितात. काहींना ही सवय बरी वाटते. पण त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया.
चहा प्यायल्यावर लगेच पाणी का पिऊ नये?
अनेक ज्येष्ठ व्यक्ती चहा प्यायल्यानंतर पाणी पिणे टाळतात. पण काहींना चहावर पाणी पिण्याचा मोह टाळता येत नाही. यानंतरही जर तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. थंड आणि गरम अन्न खाल्ल्यानेही दाताला झिणझिण्या येतात. केवळ एवढेच नाही तर चहावर पाणी पिण्याचे इतरही अनेक तोटे आहेत, जाणून घेऊया…
दातांच्या समस्या उद्भवू शकतात –
गरम चहा प्यायला नंतर त्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने तोंडातील तापमानात होणाऱ्या या अचानक बदलामुळे दातांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे दातांच्या नसांमध्ये तसेच हिरडयांमध्ये वेदना जाणवू शकतात. चहावर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर दातांमध्ये पिवळेपणा, सेन्सेटिव्हिटी यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. कधी कधी तर दात काढण्याची वेळही येते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि चहावर पाणी पिणं टाळा.
हेही वाचा – मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावे की नाही? जाणून डॉक्टर काय सांगतात
नाकातून रक्तस्त्राव –
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही जणांच्या नाकातून रक्त येऊ लागते. अशी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. आणि या चुकीतून धडा घेत ही वाईट सवय सोडून दिली पाहिजे. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. घसादुखीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे चहानंतर पाणी पिण्याची चूक करू नका.
अल्सरची समस्या –
चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही लोकांना अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लोक अँटासिड्सचा वापर करतात. नंतर या समस्येचे रूपांतर अल्सरमध्ये होते. त्यामुळे अन्ननलिकेत जखमा होऊ शकतात.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)