Cholesterol Level in Winter : हिवाळा आला की, शरीराला जास्त विश्रांती हवी असते. शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे शरीर उबदार राहावे म्हणून कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते. हे कॅलरीयुक्त पदार्थ अनेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात, असे न्युट्रसी लाईफस्टाईलच्या सीईओ न्युट्रिशनिस्ट डॉ. रोहिणी पाटील सांगतात.
तज्ज्ञ सांगतात की, कोलेस्ट्रॉल हा एक फॅटी पदार्थ आहे, जो रक्तात असतो. “अति प्रमाणात रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. एवढंच काय, तर वेळेवर उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि स्ट्रोकचासुद्धा धोका वाढतो,” असे डॉ. रोहिणी पाटील पुढे स्पष्ट केले.
डॉक्टरांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या ही तुमच्या पूर्वजांना असेल, तर ती तुम्हालासुद्धा असू शकते. पण, अनेकदा अयोग्य जीवनशैली आणि पोषक आहाराच्या कमतरता यांमुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल, तर त्यांनी नियमित ३०० ग्रॅमपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करू नये आणि ज्या व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त असेल, त्यांनी दररोज २०० ग्रॅमपेक्षा कमी सेवन करावे, असे डॉ. रोहिणी सांगतात.
हिवाळ्यात खालील गोष्टी खाऊ नये
साखरयुक्त गोड पेये-
हिवाळ्यात आईस्क्रीम आणि इतर गोड पदार्थ खाणे टाळावे. “आईस्क्रीम, केक, पेस्ट्री व कुकीज यांसारख्या बेक केलेल्या वस्तूंमध्ये साखर मिसळली जाते. भाजलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट मुबलक प्रमाणात असते. त्यात साखरेचा समावेश केल्यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल)ची पातळी कमी होते. सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसमध्ये साखरयुक्त पदार्थ असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकत. परिणामी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा वाढू शकते,” असे डॉ. रोहिणी सांगितले.
कुकीज, केक व पेस्ट्री हे पदार्थ लोणी आणि साखरेचा वापर करून तयार केले जातात. त्यामुळे या पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. पण, गोड पदार्थ पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही बेकिंग करता तेव्हा लोण्याऐवजी सफरचंद किंवा केळ्याचा वापर का. गोड पदार्थासाठी बेरीसह कमी फॅट्सयुक्त थंड दही वापरा.
लाल मांस –
हिवाळ्यात लाल मांस खाणे टाळा. “इतर कोणत्याही मांसापेक्षा कोकराचे मटण आणि डुकराचे मांस यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात आधीच खूप जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असेल, तर या पदार्थांचे सेवन धोकादायक ठरू शकते आणि जर त्यांना हृदयविकाराशी संबधित समस्या असेल, तर हे पदार्थ अतिशय घातक ठरू शकतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असलेले मासे आणि भाजलेले चिकन वरील पदार्थांना उत्तम पर्याय आहे.
तळलेले पदार्थ –
भजी, फ्राइज, बटाटा चिप्स, चिकन विंग्स इत्यादी तळलेले पदार्थ हिवाळ्यात खूप आवडीने खाल्ले जातात; पण तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. हे पदार्थ चवीला चांगले असले तरी ते धोकादायक ठरू शकतात.
जर तुम्हाला तळलेले अन्नपदार्थ आवडत असतील, तर एअर फ्रायर वापरा आणि ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा.
जर तुमच्या शरीरात LDL (खराब कोलेस्ट्रॉल) असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल, तर तुम्ही पाणी प्या, फायबरयुक्त पदार्थ आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. त्याशिवाय व्यायामामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.