प्रत्येक जण आपापल्या सोईनुसार गरम, थंड तर कधी कोमट पाणी पितात. काही जण तर फ्रिजमधून बाटली काढतात, एका ग्लासमध्ये त्यातील पाणी ओततात. मग ते प्यायल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की, हे पाणी खूपचं थंड आहे. मग आता पुढे काय करणार? म्हणून अनेक जण या पाण्यात गरम पाणी मिसळतात. बरोबर ना? पण, आरोग्य तज्ज्ञ या गोष्टीला पाठिंबा देत नाहीत. होय, तुम्ही बरोबर वाचलंत… पण असं ‘का’, असा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल. तर याचे उत्तर शोधण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने ईशा हठ योग स्कूलमधील शिक्षिका श्लोका जोशी (Isha Hatha Yoga teacher Shlloka Joshii) यांच्याशी संवाद साधला. श्लोका जोशी यांच्या मते, गरम आणि थंड पाणी कधीच मिसळून पिऊ नये.
योग शिक्षिका श्लोका जोशी यांच्या मते…
१. थंड पाणी पचायला जड आणि गरम पाणी पचायला हलके असते. त्यामुळे थंड आणि गरम पाणी तुम्ही एकत्र करून प्यायलात, तर अपचन होऊ शकते.
२.गरम आणि थंड पाणी असं दोन्ही मिसळून प्यायल्याने आरोग्यास त्रास होऊ शकतो.
३. गरम पाणी वात आणि कफ शांत करते; तर थंड पाणी दोन्ही वाढवते. म्हणून गरम आणि थंड पाणी मिसळून प्यायल्याने पित्त दोष वाढू शकतो आणि आम (ama) निर्माण होतो.
४. गरम आणि थंड पाणी मिसळून प्यायल्याने नीट पचन होत नाही. मग त्यामुळे सूज येते आणि पोषक घटकांचे शोषण होण्यासही अडथळा निर्माण होतो.
५. गरम पाणी रक्तवाहिन्या रुंद करण्यास व साफ करण्यास मदत करते; तर याउलट थंड पाणी त्यांना संकुचित करते. थंड आणि गरम पाणी मिसळून प्यायल्यानंतर वरील सर्व शारीरिक क्रियांमध्ये अडथळे येऊ शकतात किंवा रक्तवाहिन्यांच्या समस्या दूर करण्यात अपयश येऊ शकते.
हेही वाचा…शकिराचे प्रसिद्ध ‘हिप्स डोन्ट लाय’ गाणे एखाद्याचा जीव वाचवू शकते? कसे ते जाणून घ्या डॉक्टरांकडून…
याचसंबंधित अधिक माहिती देताना योग शिक्षिका श्लोका जोशी पुढे म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही गरम आणि थंड पाणी मिसळता, तेव्हा पाणी गरम करून पिण्याचे फायदे मिळत नाहीत. गरम पाण्याप्रमाणे मिश्रित पाण्याचे सेवन चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याला पूर्णपणे प्रोत्साहन देत नाही. त्यामुळे होते असे की, गरम पाण्याची पचनक्रिया सुधारण्याची आणि शरीर शुद्ध करण्याची जी क्षमता आहे ती मिश्रित पाण्यामुळे कमी होते. त्यामुळे पचनास मदत करणे आणि दोषांचे संतुलन राखणे यांची परिणामकारकता कमी होते. त्याशिवाय गरम आणि थंड पाणी मिसळल्याने तापमानात विसंगती निर्माण होऊ शकते; ज्यामुळे पाचन तंत्र गोंधळून जाते. कारण- त्यांना एकसमान तापमान हाताळण्याची सवय असते. तर अशा चुकीच्या कृतीमुळे पचनशक्ती आणि पोषक घटकांचे शोषण या दोन्ही बाबी कमी होऊ शकतात.
रक्तवाहिन्या रुंद करून, कार्यक्षम रक्ताभिसरणाला चालना देणे आणि पोषक घटकांचे सहज शोषण सुलभ करून शारीरिक कार्ये वाढविणे हे गरम पाण्याचे गुणधर्म आहेत. तर याउलट थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि पचन प्रक्रिया मंदावते. तसेच या पाण्याचे मिश्रण केल्यावर या विरोधी गुणधर्मांची एकमेकांशी टक्कर होऊ शकते. मग त्यामुळे गरम व थंड पाणी असे दोघांचेही फायदे कमी होऊ शकतात, असे योग शिक्षिका श्लोका यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच उकळते पाणी हे केवळ जीवाणूंपासून मुक्त करण्याची प्रक्रिया करीत नाही, तर ते उपचारात्मक गुण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आणि संपूर्ण आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने मदत करते. जर हेच गरम पाणी तुम्ही थंड पाण्यात मिसळले, तर हे गुण लक्षणीयरीत्या कमी होतात. त्यामुळे असे हे मिश्र पाणी आरोग्यासाठी कमी फायदेशीर ठरते, असे योग शिक्षिका श्लोका यांनी नमूद केले आहे.
यावर उपाय काय ?
तुमची तहान भागविण्याचा उत्तम उपाय म्हणजे मातीचे मडके वापरणे. “मातीचे मडके नैसर्गिकरीत्या पाणी थंड व शुद्ध ठेवते आणि शरीरातील खनिज सामग्रीदेखील सुधारते.” मातीचे भांडे पाण्याचे तापमान मध्यम ठेवते. या बाबी आयुर्वेदिक तत्त्वांशी अधिक जुळतात. मातीचे मडके सौम्य बाष्पीभवनास परवानगी देते; जे पाणी थंड ठेवते. हे पाणी पिण्यासाठी उत्तम ठरते; विशेषत: उष्ण हवामानात. कारण- ते तुमच्या पचनक्रियेमध्ये अडथळा न आणता, किंवा कफ दोष न वाढविता, तुमचे शरीर थंड ठेवते, अशी माहिती योग शिक्षिका श्लोका यांनी दिली आहे.