डॉ. गिरीश महाजन
जगभर साधारणपणे दोन वर्षांपूर्वी सर्वांची झोप उडविणारा कोरोना विषाणूचा एक चुलता म्हणजेच व्हेरिएंट होता ‘ओमायक्रॉन. त्याचे नाव पुन्हा एकदा ऐकू येऊ लागले, विशेषतः त्याच्या पुढील उत्क्रांत व्हेरिएंट विषयी म्हणजेच  JN.१. (जेएन.१).  हा  व्हेरिअंट सर्व प्रथम ऑगस्ट २०२३ मध्ये डेन्मार्क आणि नंतर अमेरिकेत आढळला. कालांतराने जेएन.१ची प्रकरणे काही युरोपीय देशांमध्ये, सिंगापूर, चीनमध्ये आणि अगदी अलीकडे केरळ, महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही राज्यांमध्ये आढळून आली आहेत. साहजिकच या कोरोनाच्या नव्या रूपाच्या बातम्या ऐकून भारतातील सर्वांच्या भुवया उंचावल्या. काय हे आता नवीन? काय पण नाव!! आणि पुन्हा याचे २०१९ प्रमाणे डिसेंबर च्या थंडीत आगमन!!!! चॅनेल, सोशल मीडिया आणि वृत्तपत्रे यांची मरगळ झटकली गेली. हा जेएन.१ नेमका काय आहे आणि एकूणच कोरोनाच्या विविध व्हेरिएंटवर सविस्तर भाष्य करणारा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हेरिएंटची निर्मिती

बदल आणि उत्क्रांती हे सजीवांच्या जीवनाचे दोन प्रमुख पैलू आहेत. त्यामुळेच पृथ्वीवर जीवांची विविधता आढळते आणि सजीव सतत विकसित होत असतात. अर्थातच, विषाणू याला अपवाद नाहीत. विषाणूंसारख्या अतिसूक्ष्म जीवांमध्ये हे बदल त्यातील अतिशय कमी लांबीच्या डी.एन.ए. (डिऑक्सिरायबोझ न्यूक्लीक आम्ल) अथवा  आर.एन.ए. (रायबोझ न्यूक्लीक आम्ल) मुळे लगेच जाणवू लागतात. त्यात भर म्हणजे कोरोना म्हणजेच ‘सार्स-कॉव्ह-२’या विषाणूमध्ये प्रमुख नियंत्रक यंत्रणा डी.एन.ए. नसून, आर.एन.ए. आहे.

हेही वाचा >>> इंटरमिटेन्ट फास्टिंग हे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर आहे का?

जेव्हा आर.एन.ए. हा केंद्रस्थानी असलेल्या विषाणूंचे यजमान (माणसासारख्या इतर जीवांच्या) पेशीत पुनरुत्पादन होते, तेव्हा आर.एन.ए.च्या शृंखला तयार होताना अनेक त्रुटी तयार होत असतात. डी.एन.ए.युक्त विषाणूंच्या तुलनेत, आर.एन.ए.युक्त विषाणूंमध्ये या त्रुटी ओळखून त्या दुरुस्त करण्याची यंत्रणा कमकुवत असते. साहजिकच त्या विषाणूच्या आर.एन.ए.मध्ये त्रुटी राहिल्याने, त्यापासून विषाणूची उत्परिवर्तित प्रतिरूप तयार होतात. हे विषाणू अतिशय सौम्य प्रमाणात  काही नवीन लक्षणे  दर्शवितात. अर्थात या बदलामुळे त्या विषाणूला काही जास्त इजा होत नाही अथवा त्याच्या जीवन चक्राला फार धक्का पोहचत नाही. तो उत्परिवर्तनाचं चक्र चालू ठेवतो. जेव्हा अनके सौम्य बदल एकत्र येऊन मोठे बदल दिसू लागतात तेव्हा त्या विषाणूच्या काही क्षमतेमध्ये बदल घडलेला असू शकतो. म्हणजेच त्या मूळ विषाणूचा नवीन भाऊ (variant, व्हेरिअंट) तयार झालेला असतो. हा नवीन बंधू-विषाणू यजमान पेशीला अथवा पोशिंद्या प्राण्याला जास्त मारक ठरू शकतो.

असे उत्परिवर्तन कोरोनाने संक्रमित केलेल्या प्रत्येक पोशिंद्यातील या विषाणूच्या प्रत्येक पुनरुत्पादन चक्रात घडत असते. गेल्या कित्येक महिन्यात कोरोनाची अशी कित्येक प्रतिरूपे तयार झाली असावीत. सर्व उत्परिवर्तित प्रतिरूपे घातक असतातच असे नाही. पण त्यातील काही उत्परिवर्तने अशी पण असू शकतात, जी मूळ विषाणूपेक्षा वेगळी प्रथिने निर्माण करतात आणि त्या विषाणूच्या संक्रमण क्षमता, घातकपणा, प्रतिकूल पर्यावरणात चिकाटीने टिकून  राहण्याची क्षमता इत्यादीमध्ये बदल झालेले असतात. असे विषाणू अधिक घातक असतात. कारण आपण लस घेतली असली तरीही या नव्या उत्परिवर्तित कोरोनाला आपली लस प्रेरित रोगप्रतिकार-प्रणाली सहज ओळखू शकत नाही. कोरोनाच्या विषाणू मध्ये तो आर.एन.ए.युक्त असल्याने त्यात इतके बदल घडत असतात कि त्या सगळ्यांची पूर्ण नोंदी ठेवण्यासाठी व तुलनात्मक  अभ्यास करण्यासाठी त्या व्हेरिअंटचे नियोजित पद्धतीने नामकरण आणि वर्गीकरण करणे आवश्यक असते.  उत्परिवर्तनाचा दर अनके बाह्य घटकांमुळे वाढू शकतो व त्यात मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. कोरोनाच्या विषाणूने त्याच्या जागतिक व्याप्तीमुळे हे सर्व गुणधर्म सिद्ध केले आहेत. 

हेही वाचा >>> १२१ किलोच्या इन्फ्लुएन्सर तरुणीने पालटलं रूप; ४० किलो वजन कमी करतानाचा डाएट व ‘चीट डे’ ची हॅक केली शेअर

जेएन.१ व्हेरिएंट:

कोरोनाच्या व्हेरिएंटची नावे ही वर्णाक्षरे आणि अंक यांच्या किचकट क्रमांतून मांडली जातात. उदा. अल्फा (बी.१.१.७ आणि Q वंश),  बीटा (बी.१.३५१ ), म्यु (बी.१.६२१), झेटा (पी.२), डेल्टा  (बी .१.६१७.२ and AY वंश), ओमिक्रोन  (बी.१.१.५२९ and BA वंश), पायरोला (बीए .२.८६) इत्यादी. सर्व व्हेरियंट्सची, नावे सहज लक्षात राहावी म्हणून त्यांच्या किचकट शास्त्रीय क्रमांक व इंग्रजी वर्णाक्षरसहित नावाबरोबर त्या प्रत्येकाला डब्लू.एच.ओ.(WHO)ने एक सोपे ग्रीक वर्णाक्षर  नाव म्हणून वापरले आहे. आल्फा ते म्यु या पहिल्या १२ वर्णाक्षरांचा वापर बी .१.१.५२९ पूर्वी झालेला होता. क्रमाने येणारी पुढील वर्णाक्षरे न्यू (nu, [Ν]) आणि एक्साय (Xi, [Ξ]) होती. परंतु “न्यू” या नावात नावीन्य  अभिप्रेत असेलेले असल्याने ते सर्वसामान्यांमध्ये  गोंधळ निर्माण करू शकते. तसेच चीन मधील बऱ्याच लोकांची नाव  एक्साय अशी असतात. त्यामुळे असे सर्व गोंधळ टाळण्यासाठी डब्लू.एच.ओने पंधरावे ग्रीक वर्णाक्षर ओमायक्रॉन (Omicron, [O]) ची निवड केली.

ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा उगम सार्स-कॉव्ह-२, या वुहान मध्ये सर्वप्रथम आढळणाऱ्या कोरोना प्रजातीच्या विषाणू पासून झाला.  एक्स बी बी.१.५. हा ओमायक्रॉन पासून उगम पावलेला व्हेरिएंट आहे. यात बदल होऊन जन्म झाला पायरोला म्हणजेच व्हेरिएंट बीए.२.८६. यातील केंद्रकीय आम्लात “सिंगल म्युटेशन” (केवळ एका जनुकातील एक बिंदूपाशी झालेला उत्परिवर्तन) मुळे एका नवीन व्हेरिएंट जगासमोर आला. त्याच नाव आहे, जेएन.१. थोडक्यात याचा उगमक्रम खालील प्रमाणे असेल. 

[सार्स-कॉव्ह-२ (मूळ कोरोना विषाणू)]   [ओमायक्रॉन (बी .१.१.५२९)]  [एक्स बी बी.१.५.] [पायरोला (बीए.२.८६.)] [ जेएन.१.]

कोरोना विषाणूची बाह्यरचना अशी असते की जणू एखाद्या पोकळ रबरी चेंडूला पूर्ण पृष्ठभागावर टाचण्या लावल्या आहेत. या टाचण्यांना तंतूमय स्पाईक प्रथिने असे म्हणतात. या तंतूमय टाचण्यांच्या साहायाने हा विषाणू प्राणीपेशीत प्रवेश करू शकतो. जणू तंतूमय स्पाईक प्रथिने प्राणीपेशीच्या पटलात शिरण्यास  आवश्यक चाव्या असतात. जेएन.१ मधील बहुतेक बदल स्पाइक प्रथिनांमध्ये मध्ये आढळतात, ज्याचा संसर्ग आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या वाढीशी संबंध असू शकतो. जेएन.१  मधील ही सर्व उत्परिवर्तने इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अतिशय वेगळी आहेत.

अमेरिकेतील कोरोना इंटरएजन्सी ग्रुप (SIG) यांनी कोरोना उत्परिवर्तित व्हेरियंट्सचे चार वर्ग केले आहेत, ते असे : 

१. व्हेरिअंट बीइंग मॉनिटर्ड (व्ही.बी.एम), २. व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (व्ही.ओ.आय.), ३. व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (व्ही.ओ.सी.), ४. व्हेरिएंट ऑफ हाय कॉनसिक्वेन्स (व्ही.ओ.एच.सी.).

हेही वाचा >>> एका महिन्यासाठी मद्यपान सोडले तर शरीरावर काय परिणाम होईल? Dry January Challenge आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल का?

व्ही.ओ.आय गटात, पोशिंदा पेशींच्या रिसेप्टर बंधनामधील बदलांशी संबंधित असलेल्या विशिष्ट अनुवांशिक मार्करयुक्त उत्परिवर्तित विषाणूंचा समावेश होतो. या गटातील व्हेरियंट पासून संसर्ग झाल्यास एफ.डी.ए (FDA) मान्यताप्राप्त  उपचार किंवा निदान चाचण्यांची कमी परिणामकारकता दिसून येते. मागील कोरोना  संसर्ग किंवा लसीकरणाविरूद्ध निर्माण झालेल्या प्रतिपिंडे या गटातील व्हेरियंटचे निष्प्रभावीकरण कमी प्रमाणात करतात. या विषाणूंमुळे संक्रमण किंवा रोगाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता असते.  काही महिन्यांपूर्वी  या गटात कोणत्याही सार्स-कॉव्ह-२ उत्परिवर्तित रूपांचा समावेश नव्हता. परंतु आज इजी .५, एफएल.१.५.१, एक्सबीबी.१.१६.६., जेएन.१ या व्हेरियंटसचा यात समावेश आहे.

जेएन.१ व्हेरिएंटचे काही गुणधर्म

विशेष म्हणजे, जेएन.१ च्या बहुतेक नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये सौम्य वैद्यकीय लक्षणे दिसून येतात, ज्यामुळे रुग्णांना विशेष वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय घरीच बरे करता येते. ताप, नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि जठरोगविषयक किरकोळ समस्या यांचा लक्षणांमध्ये समावेश होतो. आरोग्य तज्ज्ञ असे सुचवतात की स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करणारी लस जेएन.१ प्रकाराविरूद्ध प्रभावी ठरू शकते. जे नक्कीच सुखावह आहे. या व्हेरिएंट संबंधित कोणत्याही घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी दक्षता आणि देखरेख महत्त्वपूर्ण राहणार आहे. कोरोनाच्या अशा विविध व्हेरियंटचा उगम असा अधूनमधून होताच राहणार असे विषाणू तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून आपल्या निरामय आरोग्यासाठी, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा नियमित वापर, सॅनिटायझरचा वापर, बाहेरून घरी आल्यावर हात किमान २० सेकंद साबणाने धुणे, प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार व जीवनशैली, यासारख्या गोष्टी सातत्याने पाळाव्या लागणार आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New coronavirus variant jn 1 how it was created coronavirus variant jn 1 name hldc zws
Show comments