देशात करोना विषाणूचा उद्रेक थांबण्याचे नाव घेत नाही. सातत्याने त्याचे वेगवेगळे उपप्रकार विविध देशांमध्ये शिवाय भारतातही आढळून येत आहेत. त्यात आता पुन्हा एकदा करोनाचा उपप्रकार असलेल्या BA.2.86 च्या जातीतील JN.1 हा नवा विषाणू केरळच्या काही भागांमध्ये पसरत आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य यंत्रणांसमोर तो रोखण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे.
INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) या प्रयोगशाळेने केरळमध्ये सध्या अमेरिका आणि चीनमध्ये पसरत असलेल्या करोनाचा JN.1 हा नवा उपप्रकार आढळून आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर आयसीएमआरचे डीजी डॉ. राजीव बहल म्हणाले की, केरळमधील काराकुलम, तिरुवनंतपुरम येथे ८ डिसेंबर रोजी झालेल्या RT-PCR चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह नमुन्यात JN.1 हा विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी काही नमुन्यांची RT-PCR चाचणीही पॉझिटिव्ह आली. रुग्णामध्ये इन्फ्लूएंझासारखी सौम्य लक्षणे होती. परंतु, काही दिवसांनी हे रुग्ण बरे झाले आहेत.
करोनाचा JN.1 हा नवा विषाणू देशभरात पसरू नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रत्येक राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. तसेच प्रवेशाच्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेच्या उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी नियमित अभ्यासाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे. ही मोहीम १८ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
काही आठवड्यांपासून केरळमध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चाचणीसाठी संदर्भित केल्या जाणार्या ILI प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण, यापैकी बहुतेक प्रकरणे वैद्यकीयदृष्ट्या सौम्य आहेत. तसेच ते त्यांच्या घरी स्वतःहून बरे होत आहेत.
या वर्षी जगभरात करोना रुग्णांची संख्या साधारणपणे कमी राहिली असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) डॅशबोर्डनुसार, डिसेंबरच्या सुरुवातीला किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. सुट्यांच्या अगोदर अनेक देशांमध्ये विशेषत: यूएस, चीन व सिंगापूरमध्ये JN.1 उपप्रकाराची वाढ दिसून आली. त्यामुळे ही वाढ कायम राहणार की काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
करोना विषाणूचे उपप्रकार हे अनेक देशांसाठी पूर्णपणे नवीन नाहीत. कारण- काही महिन्यांपासून अनेक देशांमध्ये कमी-अधिक संख्येने करोनाच्या विविध उपप्रकारांचे रुग्ण आढळून येत आहेत.
JN.1 हा विषाणू नेमका काय आहे?
करोनाचा JN.1 हा उपप्रकार BA.2.86 प्रकाराशी संबंधित आहे. सामान्यतः तो पिरोला म्हणून ओळखला जातो. करोनाचा हा नवा उपप्रकार आधीच्या उपप्रकारांच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये फक्त एक अतिरिक्त उत्परिवर्तन करत आहे. पिरोलाचे आधीच्या उपप्रकारांच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये ३९ पेक्षा जास्त उत्परिवर्तन होत आहे. यामुळे शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून होते. Sars-CoV-2 च्या स्पाइक प्रोटीनवरील उत्परिवर्तने महत्त्वपूर्ण आहेत. कारण ते मानवी पेशींवरील रिसेप्टर्सला जोडतात आणि व्हायरसला त्यात प्रवेश करू देतात.
JN.1 मुळे रुग्णसंख्या वाढ होऊ शकते का?
पिरोला अधिक प्रभावीपणे प्रतिकारशक्तीला शह देत त्वरीत पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात होती, मात्र, तसे झालेले नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, देशात उपलब्ध अद्ययावत लसींमुळे पिरोला संसर्ग प्रभावीपणे रोखता येऊ शकला. पण तरीही लोकांनी JN.1 पासूनही स्वत:चे संरक्षण केले पाहिजे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पूर्वीच्या संसर्गामुळे निर्माण झालेली रोग प्रतिकारशक्ती आणि लसीकरणामुळे करोनाच्या नवीन प्रकारांपासूनही स्वत:चे संरक्षण होत असल्याची शक्यता आहे. खरे तर, WHO तांत्रिक सल्लागार गटाने कोविड-19 लसीच्या रचनेवर केलेल्या मूल्यांकनात असे दिसून आले आहे की, पिरोला आणि JN.1 हे दोन्ही संसर्ग कोरोनाविरोधी लस घेतलेल्या व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा परिणाम करत नाही. परंतु, प्राण्यांचे यांपासून संरक्षण होईलच याची शक्यता नाही. पण माणसामध्ये लसीकरणामुळे वाढलेल्या रोग प्रतिकारशक्तीच्या एकत्रित परिणामामुळे हे शक्य होऊ शकले, असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या मूल्यांकनात म्हटले आहे.
JN.1 उपप्रकाराचे रुग्ण का वाढत आहेत?
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेय की, GISAID या जागतिक डेटाबेसवर अपलोड केलेल्या Sars-CoV-2 अनुक्रमांपैकी पिरोला आणि त्यांच्या वंशजांचा वाटा १७ टक्के आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण डिसेंबरच्या सुरुवातीस JN.1 चे होते. जागतिक डेटाबेसवर JN.1 च्या किमान तीन हजार रुग्णांची माहिती अपलोड केली गेली होती. त्यातील बहुतेक रुग्ण अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांमधून आले होते. “BA.2.86 आणि JN.1 सारखी नवीन रूपे लक्ष वेधून घेत असताना, सध्या SARS-CoV-2 प्रकारांपैकी ९९ टक्के भाग हा XBB गटाचा भाग आहे, असेही US CDC ने म्हटले आहे.
JN.1 उपप्रकारापासून कसे कराल स्वतःचे संरक्षण?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की Sars-CoV-2 चे नवीन उपप्रकार येतच राहतील. श्वासोच्छवासाच्या विषाणूपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रकरणांची संख्या वाढत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे बंद करा आणि जाणारच असल्यास मास्क घाला. हवेशीर जागेत राहिल्याने संसर्गाचा प्रसार कमी होतो. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवा आणि सामाजिक अंतर ठेवा.