रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे जेव्हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सांगितले जाते त्यावेळी सर्वांत आधी उपचारात्मक उपाय म्हणून जीवनशैलीत बदल केला जातो; ज्यामध्ये व्यायाम आणि आहाराचा प्रामुख्याने समावेश असतो. पण, जर का जीवनशैलीमध्ये बदल करूनही कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत नसेल, तर मग त्यासाठी औषधे घेतली जातात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने हृदयाचे आरोग्य चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी काही आहार सुचवले आहेत. त्यामध्ये भूमध्य, डॅश व पेस्केटेरियन अशा तीन प्रमुख आहारांचा समावेश आहे. भूमध्य आहारात भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, सोयाबीन, काजू व बियांचा समावेश आहे. डॅश (DASH) आहारात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर व प्रथिने येतात. तर, पेस्केटेरियन आहार हा सीफूड डाएट म्हणून ओळखला जातो.
हेल्थ स्टडी अॅण्ड द हर्ट प्रोटेक्शन स्टडी याद्वारे केलेल्या सर्वेक्षणात एक लाख ३० हजार लोक सहभागी झाले होते. या अभ्यासाचे सर्वेक्षण करणाऱ्या परिचारिकांनी सांगितले की, अनेक लोकांनी पोर्टफोलिओ डाएटला प्राधान्य दिले होते. पोर्टफोलिओ डाएटमध्ये हृदयविकाराचा धोका कमी करण्याची क्षमता का आहे आणि तो शरीरासाठी उत्तम कसा ठरतो याबाबतची सविस्तर माहिती डॉक्टर प्रदीप हरानाहल्ली, हृदयरोगतज्ज्ञ- इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली आहे ती जाणून घेऊ.
पोर्टफोलिओ डाएट म्हणजे काय?
अनेक लोक विशिष्ट पदार्थांवर मर्यादा घालण्याऐवजी त्यांचा आहारात समावेश करू शकतात. पोर्टफोलिओ डाएट (रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला उपचारात्मक वनस्पतींवर आधारित आहार) प्रामुख्याने सोया किंवा शेंगांपासून मिळणाऱ्या वनस्पतींवर आधारित प्रथिने, भेंडी किंवा वांगी यांसारख्या उत्पादनांमधून मिळणारे फायबर्स, नट्स व वनस्पती स्टिरॉल्स यावर लक्ष केंद्रित करतो.
पोर्टफोलिओ डाएटचा फायदा काय?
हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग, विशेषत: एथेरोस्क्लेरोटिक रक्तवहिन्यासंबंधी रोग, शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी संबंधित आहेत. अनेक अभ्यासांत असे आढळून आले की, उच्च कोलेस्ट्रॉलच्या पातळीमुळे रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याची शक्यता असते.
हेही वाचा- Power of protein : वृद्धांनी आहारात अधिक प्रथिनांचे सेवन का केले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
पोर्टफोलिओ डाएट LDL (खराब) कोलेस्ट्रॉल प्रभावीपणे कमी करतो- जे रक्तवाहिन्यांमधील एथेरोस्क्लेरोटिक प्लेक्सचे मुख्य कारण आहे आणि HDL (चांगल्या) कोलेस्ट्रॉलची पातळी व फायबर्सचे सेवन वाढण्यास मदत करतो. तसेच या आहारात कोंबड्या आणि माशांचे सेवन करण्यास पूर्णपणे विरोध नाही; परंतु त्याचा कमी प्रमाणात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काही अभ्यास असे सांगतात की, पोर्टफोलिओ डाएटमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित मृत्यूमध्ये १४ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेज जे लोक शाकाहारी आहेत किंवा शाकाहारी आहाराचे पालन करतात त्यांनाही या आहाराचा फायदा होऊ शकतो. या आहाराचे दीर्घकालीन फायदे आहेत. वरील निष्कर्ष जवळपास ३० वर्षे सहभागी झालेल्या लोकांचे निरीक्षण करून काढण्यात आला आहे.
पोर्टफोलिओ डाएटमध्ये तुम्ही काय खाऊ शकता?
ठरावीक पोर्टफोलिओ डाएटमध्ये दररोज ४२ ग्रॅम काजू, ५० ग्रॅम वनस्पतींवर आधारित प्रथिने सोया उत्पादने, सोयाबीन, मटार किंवा मसूर, भाज्या व धान्यांपासून २० ग्रॅम विरघळणारे स्निग्ध फायबर आणि ओट्स, बार्ली, तसेच यामध्ये फळांची शिफारस केली जाते. तसेच वांगी, भेंडी, संत्री, सफरचंद व अॅव्होकॅडोमधून दररोज दोन ग्रॅम फायटोस्टेरॉल अशा पद्धतीचा आहार तुम्ही घेऊ शकता.