स्मार्टफोनंतर काय हा प्रश्न जसा आता अत्यंत कळीचा बनलेला आहे तसं समाज माध्यमांचं कुठलं नवं रुपडं आपल्याला बघायला मिळणार आहे याविषयीही जगभर तर्क सुरु आहेत. एकीकडे आपण येत्या काही वर्षात स्मार्टफोनला रामराम करुन वेअरेबल किंवा इन्स्टाल तंत्रज्ञान वापरायला सुरुवात करु असं म्हटलं जातंय तर या वेअरेबल आणि इम्प्लांट फोनमध्ये असलेला सोशल मीडिया आणि इतर ऍप्सही कदाचित आज आपण जसे वापरतो आहोत तसे वापरणार नाही. व्हर्चुअल आणि ऑगमेंटेड रिऍलिटी या तंत्रज्ञानाचा संचार यापुढच्या काळात असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाज माध्यमांचं जे स्वरूप आज आहे तेच उद्या असेल असे सांगता येत नाही. कारण गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्य यात अनेक बदल झाले आहेत. शब्दांपासून निव्वळ छायाचित्रांपर्यंत अनेक विकसित झालेले आहेत. या माध्यमांचा आपल्या जगण्यातील संचार आणि प्रभाव यातही काही ट्रेंड्स दिसून येतात. ज्यामुळे समाज माध्यमांत दिसणाऱ्या माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती कशा बदलत जात आहेत, त्यात कोणकोणते प्रकार प्रामुख्याने दिसतात याचाही अभ्यास करणं शक्य झालं आहे. विशेषतः जेन अल्फा पिढीच्या संदर्भात. कारण त्यांच्या आधी आलेली जेन झी पिढी त्यांच्या मोबाईल वापरातून अनेक गोष्टी स्पष्ट करत गेली आहे, जात आहे. त्यामुळे जेन अल्फा (म्हणजे प्री टीन किंवा किशोरावस्थेच्या अध्यात मध्यात असलेली पिढी) मोबाईल कसा वापरते आहे, आभासी जगाकडे कसं बघते आहे, त्याचे फायदे तोटे या पिढीवर कसे होतायेत हे समजून घेणं तुलनेनं सोपं होतंय, होणार आहे.

आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

आभासी जगात वावरताना वापरकर्ते लहान समूह ते मोठा समूह असाही प्रवास करताना दिसतात. लहान समूहात घडणाऱ्या घडामोडी आणि मोठ्या समूहातून घडणाऱ्या गोष्टी यांमध्येही मुलभूत फरक आणि साम्य दिसून येतं. काही वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ ‘डेनिअल मिलर’ यांनी ‘पॉलीमिडिया’ म्हणजे ‘बहु माध्यमवाद’ ही संकल्पना मांडली होती. यात त्यांनी असे नमूद केले आहे की, कुठलीही व्यक्ती एका समाज माध्यमावर अवलंबून असत नाही. निरनिराळ्या गरजांसाठी आणि कारणांसाठी माणसे निरनिराळी माध्यमे वापरतात. कोण कुठले माध्यम केव्हा वापरेल हे अत्यंत व्यक्तीसापेक्ष असले तरी त्यात सांस्कृतिक घटकांनुसार काही साम्ये दिसून येतात.

समाजशास्त्रज्ञ ‘गॉफमन’ आणि ‘मिलर’ यांच्या निरनिराळ्या थिअरीज नुसार समाज माध्यमांमुळे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे माणसे नवीन गोष्टी शिकत आहेत. प्रत्येक वापरकर्ता त्यांचा उत्कृष्ठ वापर करू शकतोय असं मुळीच नाही. काही संदर्भात आपण नवीन गोष्टी शिकत असतो, काही बाबतीत जन्मापासून मनात रुजलेल्या गोष्टींना आभासी जगाच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळवून देत असतो, व्यक्त होत असतो तर काहीवेळा मनातली विध्वंसाची भावना समाज माध्यमात अधीरेखित करत असतो. माणसांनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत जगायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा: Mental Health Special: अभ्यास नको; युट्यूबच आवडतं? असं का?

ज्या प्रकारे गाडी चालवण्याचे तंत्रज्ञान माणसाने त्याच्या जगण्याचा भाग मानले आहे आणि त्यात त्याला आत कठीण आणि अवघड असे काहीही वाटत नाही तीच गोष्ट आज या आधुनिक तंत्रज्ञानांबाबत सत्य आहे. विचार करा, पहिल्यांदा फेसबुकवर गेल्यानंतर, पहिल्यांदा व्हॉट्स एप डाऊनलोड करून वापरायला सुरुवात केली होती, पहिल्यांदा स्मार्ट फोन घेतला होता तेव्हा वापरायचं कस याचं थोडं, जास्त, खूप जास्त टेन्शन आपल्यापैकी अनेकांना आलेलच असणार. पण वापरून वापरून या तंत्रज्ञानाला आपण रुळले आहोत.

जरा स्वतःच्या मेंदूला ताण देऊन विचार करा, पहिलं इमेल खात कधी, कुठे आणि कस उघडलं होतं? या साऱ्या बदलांना फार काळ लोटलेला नाही, पण आता इमेल वापरणं, समाज माध्यम वापरणं, नवनवीन सुविधा असलेले स्मार्ट फोन वापरणं पोटात गोळा आणणारी गोष्ट उरलेली नाही. हे सारं आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि जेन झी व जेन अल्फा पिढीसाठी ही कधीही पोटात गोळा आणणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे मुलांबरोबर काम करत असताना हे सतत लक्षात घेतलं पाहिजे की या दोन्ही पिढ्या डिजिटल पिढ्या आहेत. त्यांची विचार करण्याची, व्यक्त होण्याची, गोष्टी समजून घेण्याची पद्धत पूर्णपणे निराळी आहे. अशावेळी जुन्या पठडीत जर आपण त्यांना बसवायला जाऊ तर संघर्षाचे मुद्दे तयार होणारच आहे. कुठल्याही दोन पिढ्या समान नसतात अशावेळी मोबाइलशिवाय जन्माला आलेली पिढी आणि मोबाइलबरोबर जन्माला आलेली पिढी यात विलक्षण अंतर असणं स्वाभाविक आहे.

सोशल मीडिया म्हणजे, व्यक्तिगत गरजा लक्षात घेऊन बनवलेल्या, जागतिक पातळीवर निर्मित केलेल्या आणि स्थानिक पातळीवर वाटलेल्या लहान झोपड्यांमध्ये आपण राहतो. प्रत्येकाची वॉल म्हणजेच प्रत्येकाची झोपडी निराळी आहे. तिचा रंग निराळा आहे. पोत वेगळा आहे. आपण वावरतो तो सोशल मिडिया आणि त्यातून दिसणार जग एक जागतिक खेडं नाही तर ‘कस्टमाईज’ बनवलेल्या करोडो बेटांचा एक प्रचंड मोठा पसारा आहे, जिथे शेजारच्या बेटावरच्या झोपडीत नक्की काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नाही. जे दिसतं आणि दाखवलं जात त्यापेक्षा या बेटांचं वास्तव बरंच निराळं असतं.हे समजून घेणं, नव्या पिढ्यांना समजावून सांगणं आणि मग त्याच्या वापराकडे जाणं याला म्हणतात डिजिटल विवेक..डिजिटल विवेक विकसित करणं म्हणजेच माध्यम शिक्षित होणं.