आज अनेकांना ‘नाईट आऊल’ होण्यास आवडते, तर फिटनेसबाबत जागरूक असणारे ‘अर्ली बर्ड’ होणे निवडतात. ‘नाईट आऊल’ म्हणजे, ज्यांना रात्री उशिरापर्यंत जागण्यास आवडते ते आणि ‘अर्ली बर्ड’ म्हणजे सकाळी लवकर उठून दैनंदिन कामांना सुरुवात करतात ते. मुळात लवकर उठणे चांगले की उशिरापर्यंत जागून काम करणे चांगले यावर कायम वाद होत असतात. जीवनशैली , निरोगी आरोग्य आणि एकंदरीत योग्य दिनचर्या कोणती यासंदर्भात कायम चर्चा होत असते. रात्री उशिरा जागणारे रात्रीची शांतता आणि त्यामुळे वाढणारी सर्जनशीलता याचे समर्थन करतात. लवकर उठणारे शिस्त, झोपेच्या चांगल्या सवयी यांचे समर्थन करतात. त्यामुळे ‘नाईट आऊल’ चांगले की ‘अर्ली बर्ड’ होणे चांगले यासंदर्भात तज्ज्ञांनी काही मते मांडली आहेत. ती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
नाईट आऊल की अर्ली बर्ड : कोणता चांगला पर्याय आहे आणि का?
दिल्लीच्या धरमशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, पल्मोनरी आणि स्लीप मेडिसिन, डॉ. नवनीत सूद म्हणाले, “नाईट आऊल किंवा अर्ली बर्ड होणे, हे बहुतांशी वैयक्तिक गरजा, जीवनशैलीवर ठरत असते. व्यक्तीची दिनचर्या त्याला नाईट आऊल किंवा अर्ली बर्ड घडवते. ‘नाईट आऊल’ लोक अधिक सजग, सर्जनशील असतात, तर ‘अर्ली बर्ड’ लोक वेळेच्या बाबतीत शिस्तबद्ध असतात. या दोन्ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ आहेत. व्यक्तीनुसार आणि आनुवांशिकरित्या त्या बदलतात.”
या मताला सहमती दर्शवत डॉ. जे. हरिकिशन, वरिष्ठ जनरल फिजिशियन म्हणाले की, ” या दोन्ही प्रकारांचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. दोघांनी जर विरुद्ध दिनचर्या आचारण्यास सुरुवात केली तर त्यांना त्रास होऊ शकतो. काहींना रात्र सर्जनशील वाटते, तर काहींना पहाट ही योग्य वेळ वाटते.”
नाईट आऊल आणि अर्ली बर्ड : फायदे
‘नाईट आऊल’ म्हणजे रात्री उशिरा जागणाऱ्या लोकांच्या शरीराचे घड्याळ त्यानुसार काम करत असते. रात्रीच्या वेळी त्यांना दिवस असल्याप्रमाणे ताजेतवाने वाटते आणि ते अधिक काम करू शकतात. संशोधन असे सूचित करते की, ‘नाईट आऊल’मध्ये रात्रीच्या त्यांच्या कामकाजाच्या वेळांमध्ये सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधिक दिसून येते. संध्याकाळच्या क्रियाकलापांमध्ये ते अधिक चांगली कामगिरी करतात. रात्री वेळ असल्यामुळे त्यांना परस्परांशी संपर्क ठेवणे संवाद साधणे अधिक सोप्पे वाटते.
अर्ली बर्ड्स म्हणजे सकाळी लवकर उठणारे लोक पहाटेच्या वेळी सक्रिय असतात. योग्य निर्णय घेणे किंवा कृती करणे त्यांना पहाटेच्या वेळी, सकाळच्या वेळी अधिक जमते. त्यांच्या दिनचर्येत कायम सातत्य असते. त्यांना पारंपरिक दिनचर्या अवलंबायला आवडते. सकाळचा सूर्यप्रकाश, प्रसन्न वातावरण त्यांना सकारात्मक ठेवू शकते.
तथापि, या दोन्ही जीवनशैलींमध्ये तोटेही आहेत.
हेही वाचा : दुपारी जेवणाच्या ‘या’ सवयी वाढवू शकतात तुमचा मधुमेह; रक्तातील साखर कशी ठेवाल नियंत्रणात ?
नाईट आऊल आणि अर्ली बर्ड : तोटे
‘नाईट आऊल’ लोक रात्रीच्या वेळी सर्जनशील काम करत असली, तरी या जीवनशैलीचे तोटेही आहेत. या लोकांना सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागतो. कारण, त्यांचे वेळापत्रक हे सामान्य लोकांच्या विरुद्ध असते. त्यामुळे सामाजिक संबंध प्रस्थापित करताना अडचणी येऊ शकतात. झोपेची कमतरता त्यांना भासू शकते. रात्रीची पुरेशी झोप त्यांना मिळत नाही. त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. नाईट आऊल लोकांना मूड डिसऑर्डर, नैराश्य येण्याची शक्यता असते.
अर्ली बर्ड म्हणजे सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांना संध्याकाळचा वेळ वापरता येत नाही. सकाळी लवकर उठायचे असल्याने संध्याकाळी किंवा रात्रीच्या कार्यक्रमांना त्यांना उपस्थित राहता येत नाही. अर्ली बर्ड लोक कमी प्रमाणात लवचिक असतात. वेळ, परिस्थिती, काळ यांना अनुरूप ते स्वतःमध्ये बदल करू शकत नाहीत.
हेही वाचा : आठवणी नक्की कुठे साठवल्या जातात ? काय सांगते नवीन संशोधन
अर्ली बर्ड आणि नाईट आऊल म्हणजे लवकर उठणारे आणि रात्री उशिरापर्यंत जागणारे या दोन्ही दिनचर्येचे फायदे-तोटे आहेत. गरजेनुरूप आणि शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील, अशी दिनचर्या अंमलात आणावी.