Salman Khan Fitness Routine : बॉलीवूड अभिनेता सलमान खान सिकंदर या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात सलमान खानने पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी फार उत्सुकता पाहायला मिळतेय. पण एकीकडे सलमानच्या चित्रपटाविषयी चर्चा रंगत असताना दुसरीकडे तो त्याच्या फिटनेसमुळेही चर्चेत आला आहे. अशात त्याचा फिटनेस ट्रेनर असलेला राकेश आर. उदियार याने अभिनेता सलमान खानच्या फिटनेसबाबत अनेक खुलासे केले आहेत. राकेश उदियार खूप वर्षांपासून सलमान खानचा पर्सनल ट्रेनर म्हणून काम करतोय.
राकेशने सांगितले की, तो २० वर्षांपेक्षा अधिक काळ सलमान खानला फिटनेस ट्रेनिंग देत आहे. त्यामुळे त्याला सुपरस्टारच्या शिस्तीसह फिटनेसमधील सातत्याबाबत बरीच माहिती आहे. राकेशने ‘लाइव्ह मिंट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, सलमान खान आजही जुन्या काळातील सामान्य बॉडीबिल्डिंग ट्रेनिंग प्रोसेस फॉलो करतो, ज्याला जायंट सेट, असे म्हणतात.
सलमान खान कोणते व्यायाम प्रकार करतो? (Salman Khan Fitness Tips)

तो छातीचे जवळपास १० वेगवेगळे व्यायामप्रकार करतो. त्यात इनक्लाइन, पुश-अप, फ्लाय आणि बऱ्याच व्यायामप्रकारांचा समावेश आहे. सलमान खान आठवड्यातील सहा दिवस व्यायाम करतो आणि एक दिवस विश्रांती घेतो.

पण कधी जेव्हा त्याला एखादा अॅक्शन सीन शूट करायचा असतो किंवा जास्त डान्स करायचा असतो, त्या दिवशी व्यायाम करताना तो कार्डिओ करणं काही वेळा टाळतो. पण, त्याचे रोज वेट ट्रेनिंग सुरू असते.

राकेशने पुढे सांगितले की, सलमान खानला हेवी वर्कआउट करायला आवडते. तो व्यायाम करताना हाय इंटेसिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) पद्धतीचा वापर करतो आणि ब्रेक न घेता एक व्यायामप्रकार संपताच, लगेचच दुसरा व्यायामप्रकार सुरू करतो.

तो व्यायाम करताना वेटलिफ्टिंग करीत नाही; पण तो व्हॉल्यूम ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करतो. व्यायाम करताना तो मधे-मधे पाणी पितो.

व्यायामादरम्यान तो ब्रेक कधी घेतो, या प्रश्नावर राकेश म्हणाला, “जेव्हा तुम्ही एका व्यायामप्रकारातून दुसरा व्यायामप्रकार करण्यासाठी जाता तेव्हा तो नीट करण्यासाठी ३० सेकंदांचा वेळ लागतो. हा कालावधीच एक प्रकारे विश्रांतीचा काळ असतो. या ३० सेकंदांत शरीरास पुरेशी विश्रांती मिळते. दरम्यान, HIIT या व्यायामप्रकारात तुम्हाला खूप जास्त घाम येतो, लवकर थकवा जाणवतो आणि कमी वेळेत शरीरातील जास्त कॅलरीज बर्न होतात.”

सलमानच्या फिटनेस रुटीनमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्यायाम करताना कधीही एसी किंवा पंखा चालू ठेवत नाही. सलमानला व्यायाम करताना पंखा किंवा एसी वापरणे आवडत नाही. कार्डिओदरम्यानही तो उन्हात चालणे पसंत करतो.

राकेश पुढे सांगतात की, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक कार्डिओ रूम आहे; पण तिथला एसी नेहमीच बंद असतो.

शरीराला समजून घेणे

सलमानला ३०-४० वर्षांच्या सातत्यपूर्ण ट्रेनिंगनंतर स्वतःच्या शरीराबद्दल अनेक गोष्टी माहीत झाल्या आहेत. त्यामुळे तो शरीरातील प्रत्येक बदलाकडे लक्ष देतो. त्याचं असं मत आहे की, ४५ मिनिटांपासून एक तासाच्या आत तुमचा व्यायाम पूर्ण झाला पाहिजे; जे वैज्ञानिकदृष्ट्या बरोबरही आहे.

राकेश सांगतो की, मी फिटनेस इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच सलमान खान फिटनेस ट्रेनिंग घेत होता. तो ३०-४० वर्षांपासून रोज व्यायाम करतो. त्यामुळे तो त्याच्या शरीरास चांगल्या प्रकारे जाणतो आणि समजतो. तो नेहमी शरीराचं ऐकतो. जेव्हा बॉडी शॉटची गरज असते, तेव्हा तो आक्रमकपणे ट्रेनिंग घेतो आणि गरज पडल्यास तो आरामही करतो.

सलमान खानचा डाएट प्लॅन (Salman Khan Diet Plan)

राकेशने खुलासा केला की, सलमानला त्याची आई सलमा खाननं घरी बनवलेलं जेवणच खायला आवडते. “तो फक्त त्याच्या आईनं बनवलेलं घरचं जेवणच खातो. तुम्ही त्याला कोणतंही बाहेरचं अन्न आणलं तरी तो म्हणतो की, मला घरचं जेवणच पाहिजे. आईनं जे बनवलं आहे, तेच जेवण आणा. तेच मी खाणार” असे राकेशने स्पष्ट केले.

अनेक सेलिब्रिटींप्रमाणे तो ट्रेंडी फॅड डाएट फॉलो करीत नाही. सलमान एका संतुलित आहार खातो. तो दिवसातून पाच वेळा खातो.

ट्रेनरने सलमानच्या दैनंदिन आहाराबद्दल सविस्तरपणे सांगितले, “सकाळी तो ओट्स, अंडी आणि फळं खातो. दुपारी तो घरी शिजवलेलं जेवण जेवतो आणि त्यानंतर मासे असो वा चिकन खातो.”

सलमानचा संतुलन आणि पौष्टिक आहारावर अधिक भर असतो. “सलमान दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात थोडा भात खातो; पण तो वरण-भाताबरोबर जास्त भाजी खाणं पसंत करतो. तसेच जेवणाबरोबर त्याला सॅलडही अधिक आवडते.

अॅक्शन सीनची तयारी करताना मात्र तो दोन महिने आधीच त्याचं जेवण कमी करायला सुरुवात करतो. शूट पूर्ण झाल्यावर तो पुन्हा सामान्य आहार सुरू करतो. तो कोणताही विशिष्ट डाएट प्लॅन फॉलो करीत नाही. त्यामुळे तो खरा निरोगी माणूस आहे, असे राकेश म्हणाला.

फसव्या जेवणातही शिस्तबद्ध salman khan diet plan

सलमान खान आवडीचे पदार्थही खातो; पण त्याचबरोबर कॅलरीज बर्न करण्यासाठीही तो प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या कॅलरीजचे प्रमाण कधीही २,००० कॅलरीजपेक्षा जास्त होत नाही. बिर्याणी हा सलमानचा सर्वांत आवडता पदार्थ आहे. त्यामुळे वाढदिवस असो वा कोणताही कार्यक्रम तो ती खातोच.

इतर सेलिब्रिटींप्रमाणे कोणताही कडक डाएट प्लॅन फॉलो करण्याऐवजी तो स्वत:चा सरळ साधा डाएट प्लॅन फॉलो करतो. त्याला जे आवडते, ते तो खातो, असेही राकेश म्हणाला.